कराड(पुरोगामी न्युज नेटवर्क)
कराड(दि.28जुल):-श्री. शिवाजी शिक्षण संस्था, कराडचे उच्च शिक्षण मंडळ कराडचे, चेअरमन, माजी सहकार, व पणनमंत्री तथा सातारा जिल्हा पालकमंत्री मा. आमदार श्री बाळासाहेब पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त वेणूताई चव्हाण कॉलेज, कराड येथे एन.एस.एस. आणि एन.सी.सी. विभागाअंतर्गत विद्यार्थ्यांचे आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या निमित्ताने विद्यार्थ्यांमध्ये आरोग्य जनजागृतीसाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास उपजिल्हा रुग्णालय कराड येथील डॉ. अमोल जाधव, डॉ. स्नेहा शेजवळ, डॉ. योगिता कणसे, श्रीमती आरिफा अत्तार यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती उपप्राचार्य आर.ए.कांबळे तर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. एल. जी. जाधव होते.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ. अमोल जाधव म्हणाले की,’ आरोग्य सुदृढ राहण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रयत्नशील राहणे गरजेचे आहे. दररोज व्यायाम, योग्य आहार, योग्य वेळी झोप घेण्यासोबतच फास्ट फूड आणि व्यसनाधीनतेपासून दूर राहणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांनी मोबाईलचा अतिवापर टाळलाच पाहिजे कारण त्याचा विपरीत परिणाम आपल्या मेंदूवर होत असतो. आरोग्याची योग्य वयामध्ये काळजी घेणे गरजेचे आहे. यासोबतच साथीच्या रोगापासून बचावासाठी स्वच्छता आणि व्यायामाची गरज असते. याविषयी मार्गदर्शन केले.
अध्यक्षपदावरून बोलताना प्राचार्य डॉ. एल. जी. जाधव सर यांनी विद्यार्थ्यांना आजार होण्यापूर्वीच आजारी पडू नये म्हणून आपण काळजी घेतली पाहिजे. किशोर वयात आपल्या शरीरात विविध बदल होत असतात. हे बदल ओळखून काही अनुवंशिक आजारावर ही आपण योग्य वयात उपचार केले तर मात करू शकतो. याविषयी मार्गदर्शन केले. तसेच विद्यार्थ्यांनी मोबाईल गेमिंग पेक्षा क्रीडांगणावरील खेळाकडे अधिक लक्ष दिले तर त्यांना चांगल्या आरोग्याची देणगी लाभेल. यासाठी क्रीडांगणावरील खेळ विद्यार्थ्यांनी अधिकाधिक खेळले पाहिजेत असे सांगितले.
कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी श्रीमती एस. पी. पाटील मॅडम व डॉ.डी.पी.जाधव सर यांनी केले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती आर. एस. पाटील मॅडम यांनी केले तर आभार प्रा. एन. पी.पाटील यांनी मांडले या कार्यक्रमास महाविद्यालयातील कनिष्ठ व वरिष्ठ विभागातील विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या नियोजनास संस्थेचे जनरल सेक्रेटरी श्री.अल्ताफहुसेन मुल्ला आणि संस्था सदस्य श्री अरुण पाटील (काका) यांचे मार्गदर्शन लाभले.




