बीड,जिल्हा प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114
बीड(दि.19जुलै):- शहरात मोकाट कुत्र्यांनी धुमाकूळ घातलाय. शहरातील बुंदेलपुरा, बलभीम चौक, भागात एकाच दिवसात कुत्र्यांनी 13 जणांना चावा घेतला आहे. यामुळे नागरिकांमध्ये दहशत पसरलीये. चावा घेतलेल्या नागरिकांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रात्री-अपरात्री 20 ते 25 मोकाट कुत्रे एकत्र येऊन हल्ला करत आहेत. मोकाट कुत्र्यांनी शाळकरी मुलांवर देखील हल्ला केल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळे नगरपालिका प्रशासनाने मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिक करत आहेत. दरम्यान, बीड शहरात मोकाट कुत्र्यांची दहशत निर्माण झाली आहे. कुत्र्यांच्या हल्ल्यात फाहाद इरफान, मोमीन जुबेर, श्रावण सचिन लांडे, सय्यद गौस, शीला प्रदीपसिंग लोहिया, अखिल आतार या ६ जाणांवर मोकाट कुत्र्यांनी हल्ला केलाय. हल्ल्यात जखमी झालेल्यांला बीड जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
भटक्या कुत्र्यांमुळे आजवर काही व्यक्तींना आपला जीव देखील गमवावा लागलाय. काही दिवसांपूर्वी कुत्र्यांमुळे अपघाताची एक घटना घडली होती. या घटनेत दोन महिला आणि एक शाळकरी विद्यार्थी आपल्या स्कूटीवरुन प्रवास करत होते. यावेळी अचानक ५ ते ६ भटक्या कुत्र्यांच्या टोळक्याने त्यांच्यावर हल्ला केला. सर्व कुत्रे त्यांच्या दुचाकीमागे पळू लागले. कुत्रे मागे पळत असल्याने दुचाकी चालकांना महिलेचा वाहनावरील ताबा सुटला आणि ती थेट समोर असलेल्या ट्रकवर आदळली. ट्रकवर आदळल्यावर दोन्ही महिला आणि लहान मुलगा हे सर्वजण हवेत फेकले गेले. अपघात झाल्याचं पाहताच मागच्यामागे या कुत्र्यांनी पळ काढला. या घटनेचा व्हिडिओ देखील समोर आला होता. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. आता देखील बीड शहरात कुत्र्यांनी धुमाकूळ घातला आहे.




