Home महाराष्ट्र किती दिवस दुसऱ्यांचे उंबरे झिजवावे…?

किती दिवस दुसऱ्यांचे उंबरे झिजवावे…?

104

काल कलर मराठीवर आंबेडकरी कलाकारांचा बाबासाहेबांना मानवंदना कार्यक्रम झाला. प्रचंड प्रतिसाद होता. मला अनेक लोकांनी फोन केलेे. इतर कलाकारांना सुद्धा फोन आले असणार !! काही लोक मला म्हणाले, “एवढे चांगले कलाकार आपल्याकडे असताना आपण इकडे तिकडे कुठे फिरत आहोत?” हि प्रतिक्रिया एकाची नव्हती, अनेकांची होती. मलाही अनेक वर्षांपासून वाटते की, प्रबोधनाला वाहिलेला एक चॅनेल आपण सहज उभा करू शकतो पण तो फक्त पैश्याच्या जोरावर उभा राहणार नाही तर तो चळवळीतून उभा राहील !!!
प्रस्थापित लोक बाजारातून तंत्रज्ञान, मनुष्यबळ विकत घेतात आणि बाजारासाठी सांस्कृतिक उत्पादन करतात. आपला रस्ता वेगळा आहे. आपल्याला चळवळी साठी शिस्तबद्ध काम करणारे ध्येयवादी मनुष्यबळ लागेल. ते फक्त संघर्षरत जनता उभे करू शकते. आज चळवळीसाठी काम करणारी युवाशक्ती उभी राहण्याच्या शक्यता अनेक पटीने वाढली आहे. वातावरण खूपच positive आहे. निवडणुकीत काहीही होऊ शकते पण युवशक्तीचा जोश जो नवी दिशा शोधत आहे तिला एक राजकीय वळण तर मिळणारच आहे पण या शक्तीला नवे सांस्कृतिक वळण मिळाले तर अनेक संसाधने उभी राहू शकतात. मला याचे गेल्या काही दिवसात चांगले अनुभव आले, मी पुण्यात एक स्टुडिओचे उद्धाटन आणि काल आमच्या संविधानाच्या अभियानात काम करणाऱ्या कार्यकर्तीच्या एका उद्योगाचे उदघाटन केले. हे सगळे लोक युवा आहेत, यांना काळाची पावले कळायला लागली आहेत .
आपल्याला व्यवस्थेला पर्याय द्यायचा असेल तर आपली पर्यायी संसाधने उभी करावी लागतील. तसे प्रयत्न आम्ही काही सजग कार्यकर्ते गेल्या दोन वर्षांपासून कलासांगिनींच्या माध्यमातून करत आहोत. त्याला यश आले नाही असे म्हणता येत नाही, कारण वातावरण आपल्या बाजूने नव्हते, त्यामुळे गाडी हळू हळू चालू आहे. आज वातावरण आपल्या बाजूने आहे. समविचारी लोक बाजार आणि व्यक्तीवाद सोडून एकत्र आले तर इतिहासाला कलाटणी देणारी नवी प्रबोधनाची चळवळ उभी राहील. हे मी माझ्या 40 वर्षाच्या चळवळीतील अनुभवाने सांगत आहे! पहा, विचार करा !! नवे घडले, हे मला दिसत आहे !! कवीला पुढचे दिसते असे म्हणतात. मी कवी तर आहेच पण भगत ही आहे, देवाचा नाही चळवळीचा!!
लोकशाहीर संभाजी भगत, मुंबई.
मो. ९९३०३३३४७१

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here