Home गडचिरोली दापोरी येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये उन्हाळी छंद शिबिराचे उद्घाटन संपन्न ! ...

दापोरी येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये उन्हाळी छंद शिबिराचे उद्घाटन संपन्न ! विद्यार्थ्यांच्या कलागुणांना चालना देण्याचा प्रयत्न ! शिबिराला शेकडो चिमुकल्या विद्यार्थ्यांचा प्रतिसाद !

113

 

मोर्शी तालुका प्रतिनिधी /
उन्हाळ्याच्या सुट्या म्हणजे मुलांच्या आनंदाचे पर्वच असून या सुट्यांमध्ये मुलांकडे असलेल्या निवांत वेळेचा सदुपयोग व्हावा याकडे पालकांचा विशेष कल असतो. सुटी आणि शिबिरे हे जणू एक समीकरणच आहे. अनेकांचे तर प्लॅनिंगही ठरले असते. याच काळात शहरात अनेक संस्थांकडून उन्हाळी शिबिरे घेतली जातात. अनेक उच्चभ्रु शाळांकडूनच अशी शिबिरे राबविली जातात. मात्र अशा शिबिरांसाठी पैसाही मोजावा लागतो. श्रीमंत मुलांसाठी हे सहज शक्य आहे. मात्र ग्रामीण भागात जिल्हा परिषद शाळांमध्ये शिकणाऱ्या गरीब मुलांसाठी अशी उन्हाळी, छंद शिबिरे कल्पना मात्र असते. अशा वंचित अवस्थेत जीवन जगणाऱ्या मुलांसाठी दापोरी येथील जिल्हा परिषद शाळेच्या संवेदनशील शिक्षकांनी नी:शुल्क उन्हाळी शिबिर सुरू केल्यामुळे दापोरी येथील शेकडो विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण बघायला मिळत आहे.
मोर्शी तालुक्यातील दापोरी येथील जिल्हा परिषद शाळेच्या वतीने उन्हाळी छंद शिबिराचे आयोजन केले आहे. मुलांमध्ये उपजत अगणित कला क्षमता सामावल्या असतात कला गुणांना विकसित करण्यासाठी १७ ते २१ एप्रिल या कालावधीत सकाळी ७ ते ११ यावेळेत शाळेत हे शिबिर होणार असून दापोरी येथील विद्यार्थ्यांना या शिबिरात सहभागी होता येणार असून या उन्हाळी छंद शिबिराचे उद्घाटन सरपंच संगीता ठाकरे, ग्राम पंचायत सदस्य रुपेश वाळके, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अंकिता विघे, केंद्रप्रमुख तथा मुख्याध्यापक गजानन चौधरी, महादेव मसाने, नरेंद्र चौधरी, यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.
सध्या मुलांना टीव्हीपासून व मोबाइल गेम्सपासून लांब ठेवणे हे पालकांसाठी आव्हान बनले आहे. यामुळे मुलांना नवं काही शिकून पाहण्याची इच्छा होत नाही. सुटीचा उपयोग मुलांमधील व्यक्तीमत्व विकासाला चालना देण्यासाठी व्हावा या संकल्पनेतून उन्हाळी शिबिरांची संकल्पना राबवली जाते. चित्रकलेपासून मातीकाम आणि खेळांपासून नव्या गोष्टी बनवण्यातील आनंदपर्यंत मुलांना शिबिरांमध्ये मार्गदर्शन केले जाते. गाणी, कविता, नृत्य, नाटक यामधून मुलांना कलेची जाण व रसिकता याविषयी आवड निर्माण करण्याचे काम शिबिरांमधून होणार आहे. या सर्वांचा बारकाईने विचार करून दोन शेकडो मुलांची मानसिकता, आवड लक्षात घेत अल्फाकिडसच्यावतीने या शिबिराची रचना केली आहे. शिबिरात निर्मितीचा आनंद देणाऱ्या गोष्टींसह विशेष नावीन्यपूर्ण उपक्रम शिकवण्यात येणार आहेत. या शिबिराचा मुलांनी लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक गजानन चौधरी यांनी केले आहे.

छंद शिबिरामध्ये सात दिवसांमध्ये योगा, कला, कार्यानुभव, चित्रकला, प्लास्टिक बंदी, स्वच्छ शाळा स्वच्छ परिसर, बौद्धिक खेळ, रंगभरण स्पर्धा, महिला जनजागृती, स्पर्धा व खेळ, पुष्प प्रदर्शनी, डिश सजावट, कला विष्कार, भावगीत स्पर्धा, यासह विविध स्पर्धा प्रत्यक्षिक बाल मनात रुजविणे, आरोग्य विषयी स्वच्छतेचे महत्व, मनोरंजनात्मक खेळ, विविध स्पर्धा यासह विविध नावीन्यपूर्ण उपक्रम राबऊन पाच दिवस प्रशिक्षण देऊन प्रशिक्षित केले जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here