कायेची, वाचेची व मनाची शुचिता राखणे म्हणजे धम्म होय. जो काया, वाचा, मनाने शुद्ध, निष्पाप, स्वच्छ आणि पावित्र्य युक्त असतो. तो निष्कलंक होय. जीवनात पूर्तता साधने म्हणजे धम्म होय. निब्बाण (निर्वान) प्राप्त करणे हा धम्म आहे. तथागत बुद्धाच्या सर्व सिद्धांतामध्ये निब्बाण हा केंद्रवर्ती आहे. निब्बाण आणि परिनिब्बाण यामध्ये भेद आहे. परिनिब्बाण म्हणजे पूर्णपणे मालविणे, नाहिसे होणे, पण निब्बाण म्हणजे धम्ममार्गावर चालण्याकरिता आपल्या प्रवृत्तीचा पुरेसा ताबा ठेवणे होय.
“निब्बाण म्हणजे निर्दोष जीवन” असे बुद्धाने राध स्थविरला उत्तर दिले होते. निब्बाण म्हणजे अष्टांग मार्गाचे पालन होय. तृष्णा त्याग म्हणजे धम्म होय. लोभ व हाव यांना काबूत ठेवले पाहीजे. सर्व संस्कार अशाश्वत आहेत हे मानणे म्हणजे धम्म होय. सर्व वस्तूंची उत्पत्ती हेतू आणि प्रयत्न यामुळे होते. त्यांना स्वतंत्र अस्तित्व नसते. हेतू प्रत्ययाचा उच्छेद झाला की, वस्तूचे अस्तित्व उरत नाही.
सजीव प्राण्यांचे जीवंत शरीर म्हणजे पृथ्वी, आप, तेज व वायू या चार महाभूतांचा परिणाम आहे. या चार महाभूतांच्या पृथःकरणाने प्राणी जीवंत राहत नाही. विश्व, अनित्य व परिवर्तनशील आहे, त्याच्यात क्षणाक्षणाला बदल होत असतो हे परिवर्तन सर्वच अनित्य असल्यामुळे शक्य आहे.
जगातील नैतिक व्यवस्थेचा आधार कम्म (कर्म) आहे हे मानणे धम्म होय. हा बुद्धाचा कम्म नियम आहे. पार्थिव जगात म्हणजे गृहलोकांच्या गतीत, ऋतुचक्र, बीज, वृक्ष, फळ या सर्वांमध्ये सुव्यवस्था आहे. बुद्ध मतानुसार सृष्टीची नैतिक व्यवस्था ही माणसावर सोपवलेली आहे. नैतिक व्यवस्था वाईट असेल तर मनुष्य अकुशल कर्म करील आणि नैतिक व्यवस्था चांगली असेल तर मनुष्य कुशल कर्मे करील. कम्म (कर्म) नियमांचा संबंध केवळ सर्वसाधारण नैतिक व्यवस्थेशी आहे. व्यक्तीच्या सद्भाग्याशी किंवा दुर्भाग्याशी त्याचा काहीही संबंध नाही.
भंते शाक्यपुत्र राहुल(अकोला)मो:-९८३४०५०६०३




