‘फुल्यांचे खरे शत्रू कोण?’ असा प्रश्न उभा राहतो तेव्हा आजही बऱ्याचशा लोकांच्या मनात सहजपणे एकच उत्तर उमटते “ब्राह्मण समाज.” पण हे उत्तर अर्धसत्य आहे. खरं पाहिलं, तर अशा प्रकारचं सरसकट निष्कर्ष काढणं, हीसुद्धा त्या अज्ञान, अंधश्रद्धा आणि भेदभावाने ग्रासलेल्या मानसिकतेचीच साक्ष आहे. ज्या विरुद्ध महात्मा फुले यांनी अखंड लढा दिला. ‘फुले’ नावाचा चित्रपट प्रदर्शित होण्याच्या आधीच फक्त ट्रेलर पाहून समाजात जे वादळ उठलं, ते केवळ ब्राह्मणांविषयी असलेल्या द्वेषाच्या भीतीतून नव्हे, तर स्वतःच्या इतिहासाशी डोळा भिडण्याची असह्यता दर्शवते. काहींनी या चित्रपटाने ब्राह्मण समाजाची बदनामी होते. असे म्हटले, काहींनी इतिहासाच्या एका बाजूची निवड झाल्याचा आक्षेप घेतला. पण ही प्रतिक्रिया केवळ ब्राह्मण समाजाची नव्हे; ती संपूर्ण भारतीय समाजाची आरशासारखी प्रतिमा आहे. कारण आपण अजूनही एखाद्या कृतीमागील विचार, संकल्पना, मूल्यं समजून घेण्याऐवजी ती कृती कोणी केली ? कोणत्या जातीचा होता? यावरून न्याय करतो.
महात्मा ज्योतिबा फुले यांचा स्वानुभव हा याच मानसिकतेच्या विखाराचा ठळक पुरावा आहे. आपल्या ब्राह्मण वर्ग मित्राच्या वरातीमध्ये सहभागी होण्याच्या केवळ एका कृतीमुळे त्यांच्यावर शाब्दिकच नव्हे, तर सामाजिक अपमानाचा जो कोरडा झणझणीत चाबूक बसला, त्याने त्यांच्या अंतरात्म्यावर आघात केला. त्या प्रसंगाने त्यांना प्रथमच जाणवले ते समाजात ‘शूद्र’ आहेत. आणि इथूनच सुरू झाली एक आग, जी व्यक्ती किंवा समाजावर राग काढणारी नव्हती, तर अन्यायाच्या मुळांवर प्रहार करणारी होती. त्यांनी जर ठरवले असते, तर ज्या व्यक्तीने त्यांचा अपमान केला, त्याला हानी पोहोचवून आपल्या अपमानाचा बदला त्यांनी सहज घेतला असता. मात्र महात्मा जोतिबा फुल्यांनी हे ओळखले होते कि, तो व्यक्ती किंवा त्यांचा समाज शत्रू नसून त्याचा विचार त्यांचा खरा शत्रू आहे.
भारतीय समाज आजही व्यक्तींना दोष देतो, समाजाला दोष देतो, पण त्या वृत्तींना दोष देत नाही. नथुराम गोडसेने गांधीजींची हत्या केली, आणि नथुराम गोडसे हा ब्राह्मण असल्याचे जेव्हा कळले तेव्हा संपूर्ण ब्राह्मण समाजावर ठीक ठिकाणी हल्ले सुरू झाले. त्यातल्या त्यात नथुराम गोडसे हा चित्पावन ब्राह्मण असल्यामुळे महाराष्ट्रात ब्राह्मण समाजावर मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला. पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, नागपूर आणि मुंबई सह अनेक शहरांमध्ये ब्राह्मणांच्या घरावर हल्ले, जाळपोळ, लुटमार आणि हत्या करण्यात आल्या. उदाहरणार्थ,सातारा जिल्ह्यात सुमारे 300 गावांमध्ये 1000हून अधिक ब्राह्मणांची घरे जाळण्यात आली. या हिंसाचारामागे गांधीजींच्या हत्तेचा संताप तर होताच. मात्र ब्राह्मण समाजाविरुद्ध आधीपासून असलेला द्वेष आणि सामाजिक असंतोषही कारणीभूत होता. विशेषत: मराठा समाजात ब्राह्मणांच्या ऐतिहासिक वर्चस्वाविरुद्ध असलेला रोष या हिंसाचारात परावर्तित झाला होता. या घटनांमुळे अनेक ब्राह्मण कुटुंबांना आपली घरे, संपत्ती आणि सामाजिक स्थान गमवावे लागले. या हिंसाचाराच्या घटनांनावर त्या काळातल्या माध्यमांनी फारसे लक्ष दिले नाही. त्यामुळे या प्रसंगाची विस्तृत माहिती आणि दस्तऐवजीकरण मर्यादित आहे. या ऐतिहासिक घटनांचा अभ्यास करताना समाजातील एका व्यक्तींच्या कृतीसाठी संपूर्ण समाजाला दोषी ठरवण्याची प्रवृत्ती किती घातक ठरू शकते हे लक्षात येते. कारण नथुराम गोडसेने गांधीजींची हत्या करण्याअगोदर समस्त ब्राह्मण समाजाला विचारून हा निर्णय घेतला नव्हता. त्यामुळे एकाने केलेल्या चुकीच्या कृत्याचा संपूर्ण समाजाला दोष कसा काय देता येईल..? या प्रश्नाचा विचार जोपर्यंत भारतीय समाज करणार नाही, तोपर्यंत अशा प्रकारच्या घटना घडवून यामध्ये निष्पाप लोकांचे बळी जातच राहतील.
शीख नरसंहार 1984: निष्पापांचा रक्तरंजित इतिहास आणि भारतीय लोकशाहीवरील कलंक 31 ऑक्टोबर 1984. देशाच्या दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येने संपूर्ण भारत हादरला. त्यांच्या अंगरक्षकांनी सतवंत सिंग आणि बेअंत सिंग,जे शीख धर्मीय होते हे कृत्य केल्यानंतर अवघ्या काही तासांत देशभरात शीख समाजाविरुद्ध सूडभावनेने पेटलेली हिंसक लाट उसळली. दिल्लीसह कानपूर, भोपाल, इंदूर, आणि देशाच्या अनेक भागांत, केवळ शीख असल्याच्या नावावर हजारो लोकांचे प्राण घेतले गेले. सरकारी आकडेवारी नुसार, या हिंसाचारात 2,732 लोक मारले गेले, यातील 2,146 केवळ दिल्लीतील होते. पण मानवी हक्क संघटना आणि स्वतंत्र अहवालांचे म्हणणे आहे की ही संख्या 8,000 ते 17,000 पर्यंत असू शकते. या मृत्यूंमध्ये बहुसंख्य निष्पाप, निरपराध, सामान्य जीवन जगणाऱ्या शीख नागरिकांचा समावेश होता. हा हिंसाचार अचानक घडलेला नव्हता, असे अनेक संशोधन अहवालांमधून समोर आले आहे. दंगली ठरवून, नियोजित पद्धतीने झाल्याचे अनेक साक्षीदार सांगतात. शीखांची घरे जाळली गेली, त्यांचे व्यवसाय उद्ध्वस्त झाले, शीख महिलांवर अमानूष अत्याचार केले गेले.. लोकशाही व्यवस्थेतील पोलीस आणि राजकीय यंत्रणा या सर्व प्रकारांमध्ये निष्क्रीय किंवा सहभागी असल्याचे आरोप झाले.
प्रश्न असा की, दोन व्यक्तींनी केलेल्या क्रूर कृतीसाठी संपूर्ण शीख समाज जबाबदार होता का? उत्तर स्पष्ट आहे नाही. भारतीय राज्यघटनेनुसार गुन्ह्याची जबाबदारी व्यक्तिगत असते, सामूहिक नाही. पण 1984 मध्ये याच मूलभूत तत्वाची पायमल्ली झाली. संपूर्ण समाजाला दोषी ठरवण्यात आले आणि त्यांच्या अस्तित्वावर घाला घातला गेला. कोणताही गुन्हेगार किंवा वाईट प्रवृत्तीचा व्यक्ती हा एखादी घटना घडविण्याच्या अगोदर त्याच्या संपूर्ण समाजाला किंवा धर्मीयांना विचारून ही घटना घडवत नसतो तो किंवा एक विशिष्ट गट ही घटना घडविण्यासाठी नियोजनबद्ध योजना आखतात. उदाहरणार्थ, आत्ताच काश्मीरमध्ये घडलेली घटना ज्या अतिरेक्यांनी काश्मीरमध्ये पर्यटनासाठी आलेल्या लोकांना त्यांचा धर्म विचारून गोळ्या झाडल्या, हे करण्यामागचा त्यांचा हेतू हा होता की, भारतामध्ये धार्मिक अशांतता पसरवता येईल व काश्मिरी जनतेबद्दल भारतीय समाजामध्ये असंतोष पसरून संपूर्ण देशामध्ये धार्मिक दंगली पेटवून द्यायच्या. आणि काही ठिकाणी काही महामूर्ख लोकांनी कश्मीरी विद्यार्थ्यांना आणि व्यापार करणाऱ्या लोकांना लक्ष करून त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न केला. जोपर्यंत भारतीय समाज गुन्हेगाराचा गुन्हा काय? आणि त्या मागचा नेमका हेतू काय? हे जोपर्यंत समजून घेत नाही,तोपर्यंत जात, धर्म, वंश, प्रांत, भाषा आणि लिंग याच्या भेदभावाच्या आधारे भारतामध्ये निष्पाप लोकांची बळी जातच राहणार आहे.महात्मा ज्योतिबा फुले यांनी कुठल्याही विशेष वर्गाचा किंवा व्यक्तींचा द्वेष न करता ज्यांच्यामध्ये हा कर्मठपणा आहे. त्यांच्यात परिवर्तन आणण्यासाठी नेमके काय केले पाहिजे ? हे अधोरेखित करून “अज्ञान” हा माणसाचा खरा शत्रू आहे व या अज्ञानाला नष्ट करण्यासाठी माणसाला शिक्षित आणि सुशिक्षित करणे महत्त्वाचे आहे हे ओळखून त्यांनी शाळेची चळवळ सुरू केली.
ब्राह्मण मित्रांच्या सहकार्याने फुलेंची शिक्षणक्रांती उजळली जातीच्या चौकटी मोडणारी बौद्धिक मैत्री 19 व्या शतकात भारतात शिक्षणाचे दार बहुजनांसाठी उघडणारा पहिला मोठा प्रयत्न झाला,तो महात्मा ज्योतिबा फुले यांच्या हातून.स्त्री-शूद्र-अतिशूद्र यांच्या शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी त्यांनी सुरू केलेली चळवळ केवळ क्रांतिकारकच नव्हती,तर समाजमनाला हादरवणारी होती.परंतु या प्रवासात फुले एकटे नव्हते. त्यांच्या या प्रयत्नांना काही पुरोगामी ब्राह्मण मित्रांनी दिलेले पाठबळ अत्यंत मोलाचे ठरले.
साल 1848. पुण्याच्या भिडे वाड्यात महात्मा फुलेंनी पहिली मुलींची शाळा सुरू केली.हे भिडे ब्राह्मण समाजातील होते.स्त्री शिक्षणाच्या विरोधात सगळी सामाजिक व्यवस्था उभी असताना,फुलेंच्या पाठीशी काही ब्राह्मण सहकारी निर्धाराने उभे राहिले. त्यांनी जातीची बंधन झुगारून सामाजिक परिवर्तनासाठी फुलेंच्या कार्यात सक्रिय सहभाग घेतला.त्यात केशव सीताराम ढेरे यांचे नाव विशेष उल्लेखनीय.समाजाच्या रोषाची पर्वा न करता त्यांनी स्वतःच्या घरी फुलेंच्या शाळेसाठी जागा दिली.त्या काळी एका ब्राह्मणाने शूद्र-अतिशूद्र मुलांना शिकवण्यासाठी घर उघडणे, हे धाडसी पाऊल होते.त्याचप्रमाणे, मराठी पत्रकारितेचे जनक मानले जाणारे सदाशिव गोविंद जांभेकर यांनी फुलेंच्या विचारांना वैचारिक पाठबळ दिले.त्यांच्या लेखनातून फुलेंच्या कार्याची गरज आणि सामाजिक उपयोग स्पष्टपणे मांडला गेला.शिक्षणतज्ज्ञ कोल्हटकर,अत्रे आणि भांडारकर यांच्यासारख्या विद्वानांनीही या सामाजिक क्रांतीच्या विचारप्रवाहात आपले योगदान दिले.
महात्मा फुले यांची वैचारिक परिपक्वता ही केवळ त्यांच्याच जिद्दीचा परिणाम नव्हती. त्यांच्या समविचारी मित्रमंडळींनी दिलेला बौद्धिक आणि मानसिक आधार त्यांच्या चळवळीसाठी बळ देणारा ठरला.त्यांनी जातीवर नव्हे,तर जातिप्रेरित अन्यायावर टीका केली. म्हणूनच,त्यांनी कधीच सर्व ब्राह्मणांना एकसंध विरोधक मानले नाही. त्यांची मैत्री आणि सहकार्य फक्त सत्यासाठी होती सत्यशोधनासाठी.आज,जेव्हा आपण सामाजिक समतेच्या वाटेवर वाटचाल करत आहोत,तेव्हा फुले आणि त्यांच्या ब्राह्मण मित्रांची ही ऐतिहासिक भागीदारी एक प्रेरणास्त्रोत ठरते. सामाजिक बदलासाठी फक्त शोषितांचाच नव्हे,तर संपूर्ण समाजाच्या विवेकशक्तीचा सहभाग गरजेचा आहे,हे इथूनच शिकता येत.
महात्मा फुले आणि टिळक: वैचारिक मतभेदांपलीकडे देशहिताचा आदर्श.महात्मा ज्योतिबा फुले आणि लोकमान्य टिळक हे दोघेही आपल्या आपल्या मार्गाने देशासाठी कार्यरत असलेले थोर विचारवंत. जरी त्यांच्या वैचारिक भूमिका परस्परविरोधी होत्या फुले हे सामाजिक सुधारणा,बहुजन शिक्षण आणि “ब्राह्मणवाद” विरोधावर भर देणारे तर टिळक हे राष्ट्रवाद,स्वराज्य आणि परंपरागत हिंदू संस्कृतीचे समर्थक होते तरीही एक प्रसंग असा घडला की जिथे फुलेंनी आपले मतभेद बाजूला ठेवून, टिळकांच्या देशहितासाठी चाललेल्या लढ्याला साथ दिली.
साल 1897 मध्ये राजा राम कृष्ण या वृत्तपत्रात ब्रिटिश सत्तेविरुद्ध लेख लिहिल्याबद्दल टिळकांवर राजद्रोहाचा खटला चालवण्यात आला.तेव्हा टिळकांना तुरुंगात डांबले गेले आणि त्यांच्यासाठी कोणीही जामीनदार पुढे येत नव्हते. अशा कठीण प्रसंगी महात्मा फुले पुढे आले,टिळक आपल्या विचारांचे कट्टर विरोधक असून ते ब्राह्मण आहेत,असा कुठलाही विचार मनात न आणता त्यांनी टिळकांचा जामीन उभा केला.हा प्रसंग केवळ व्यक्तिगत किंवा जातीय मतभेद असून ही,खऱ्या अर्थाने ‘राष्ट्रहित सर्वोपरि’ या तत्त्वाचा आदर्श ठरतो.फुले यांनी स्पष्टपणे दाखवून दिलं की वैचारिक मतभेद हे व्यक्तिगत वैर नसते.जर एखादी व्यक्ती देशासाठी कार्य करत असेल,तर तिच्या बाजूने उभं राहणं हे सामाजिक कर्तव्य आहे.हा ऐतिहासिक प्रसंग आजही आपल्याला शिकवतो की विचारसरणी वेगळी असली तरी एकमेकांच्या देशसेवेला मान्यता देण्याची आणि आवश्यक तेव्हा मदतीचा हात पुढे करण्याची परिपक्वता असावी लागते.
फुलेंची करुणा आणि समतेचा आदर्श: काशीबाई दीक्षित प्रकरण.
महात्मा ज्योतिबा फुले आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे आयुष्य केवळ शूद्र-अतिशूद्र समाजाच्या उद्धारासाठीच नव्हते,तर सर्वच वंचित,पीडित,उपेक्षित घटकांसाठी होते मग ती व्यक्ती कोणत्याही जातीतली का असेना.याच महान माणुसकीचे एक ज्वलंत उदाहरण म्हणजे काशीबाई दीक्षित या ब्राह्मण विधवा महिलेचे जीवन वाचवण्याचा आणि तिच्या मुलाला दत्तक घेण्याचा प्रसंग.काशीबाई ही एक विधवा ब्राह्मण स्त्री होती,जिला समाजाने तिच्या पतीच्या मृत्यूनंतर एकटी, उपेक्षित आणि बेघर करून सोडले होते.गर्भवती अवस्थेत तिने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला होता.ही बातमी समजताच सावित्रीबाई फुले धाव घेत त्या महिलेला स्वतःच्या घरी घेऊन आल्या.तिला मानसिक आधार दिला,घर दिलं आणि सुरक्षितता दिली.
नंतर काशीबाईने एका गोंडस बाळाला जन्म दिला. त्या मुलाचे नाव ठेवले गेले.”यशवंतराव फुले”. फुलेंनी त्या मुलाला दत्तक घेतले आणि मोठ्या प्रेमाने वाढवले. यशवंतराव पुढे एक डॉक्टर झाले आणि सामाजिक कार्यात सक्रिय राहिले.ही घटना सिद्ध करते की महात्मा फुले दांपत्याने कधीही जातीय द्वेषाच्या आधारावर आपले कार्य केले नाही.त्यांनी ब्राह्मणवाद म्हणजे जातीच्या आधारे असलेले अन्यायकारी वर्चस्व—याचा विरोध केला; परंतु एका ब्राह्मण स्त्रीला आधार देऊन तिच्या मुलाला दत्तक घेणे हे त्या पातळीवरचा माणुसकीचा सर्वोच्च आदर्श ठरतो.शत्रू व्यक्ती नव्हे, तर विचार! फुलेंचा संदेश समजून घ्या, समाज विभाजन नव्हे, विवेक वाढवा..!
सध्या प्रदर्शित झालेल्या ‘फुले’ या चित्रपटामुळे अनेकांच्या मनात नव्याने विचारमंथन सुरू झाले आहे. काहीजणांनी चित्रपट पाहून ब्राह्मण समाजाबाबत नकारात्मक भावना व्यक्त केल्याचाही आवाज ऐकू येतो.मात्र,हे चित्रपटातील खरे आणि गाभ्याचे संदेश समजून न घेता केलेले सवंग निष्कर्ष आहेत.‘फुले’ हे केवळ एका व्यक्तीचे चरित्र नाही,तर एका विचारधारेचा,एका माणुसकीच्या लढ्याचा इतिहास आहे.महात्मा फुले यांचे खरे शत्रू कोणी व्यक्ती नव्हते, कोणी विशिष्ट समाज नव्हता.त्यांच्या आयुष्यातील तीन मुख्य शत्रू होते अज्ञान,अंधश्रद्धा आणि भेदाभेद.या त्रयीविरुद्ध त्यांनी निवडलेले शस्त्र होते शिक्षण, सत्यशोधन,आणि समानता.त्यांनी कधीही जातीआधारित द्वेषाचा प्रचार केला नाही. उलट,अनेक ब्राह्मण सहकाऱ्यांनी त्यांच्या कार्यात मोलाचे योगदान दिले.विधवा ब्राह्मण महिला काशीबाई दीक्षित हिचा जीव वाचवून तिच्या पोटी जन्मलेल्या बालकाला दत्तक घेणाऱ्या फुलेंनी माणुसकीचा सर्वोच्च आदर्श जगाला दाखवून दिला.जर फुले खरोखरच कोणत्याही समाजाचे द्वेषी असते,तर हा प्रसंग घडू शकला नसता.म्हणूनच, ‘फुले’ चित्रपट पाहून जर कोणी “समस्त ब्राह्मण समाज वाईट” असा निष्कर्ष काढत असेल, तर ही विनम्र विनंती आहे हा चित्रपट पुन्हा पाहा. फुलेंनी जे जिवंत ठेवायचा प्रयत्न केला तो विवेकाचा आणि करुणेचा दिवा आहे. त्यांनी समाजाच्या विवेकशील घटकांना आपल्या चळवळीत सामील केलं.आज आपल्याला खऱ्या शत्रूंविरुद्ध अंधकारमय विचारांविरुद्ध लढायचं आहे,ना की कोणत्याही विशिष्ट समाजाविरुद्ध.जर आपण व्यक्ती वा समाजाला दोष देत बसलो,तर आपणही त्यांच्या संघर्षाच्या गाभ्याला हरवत आहोत.”आपण लढा उभा करूया विचारांच्या विरोधात,व्यक्तींविरोधात नव्हे.फुलेंचा खरा शत्रू समजून घेऊया, आणि त्यांच्या शिकवणीला न्याय देऊया.अन्यथा, त्यांच्या ऐतिहासिक बलिदानाचा अपमान करणारे आपणच ठरू.”
किरण रामी बाबुराव (मोहिते)
मो.9561883549, नाशिक.




