_रायगडावर दि.६ जून १६७४ रोजी झालेला शिवराज्याभिषेक सोहळा हा त्या गडावर आलेल्या प्रत्येकासाठी जणू दसरा-दिवाळी उत्सवासारखाच होता. आपल्या लाडक्या राजाला सिंहासनावर बसलेला पाहण्यासाठी असंख्य जनता आसुसून तेथे उपस्थित होती. हा सोहळा ज्यांनी “याचि देही, याचि डोळा” अनुभवला त्या प्रत्येकाच्या मनात आपण धन्य झालो, ही एकच भावना होती. या सोहळ्यात अशा काही खास गोष्टी करण्यात आल्या, ज्या केवळ ऐकून तुमच्या अंगावर रोमांच उभा राहिल्याखेरीज राहणारच नाही. ज्या ऐकून तुम्हाला कदाचित तुमच्या डोळ्यासमोर या शिवराज्याभिषेक सोहळ्याची हलकीशी छटा सुद्धा निर्माण होईल, चित्रफितीसारखी! अशा या नयनरम्य सोहळ्याचे सुंदर शब्दचित्रण श्री कृष्णकुमार आनंदी-गोविंदा निकोडे गुरूजींच्या या लेखात बघा… संपादक._
रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळ्याची तयारी कित्येक महिन्यांपासून सुरु होती. या सोहळ्याच्या नऊ दिवस आधी या राज्याभिषेकाशी संबंधित अनेक विधी पार पडले. दि.६ जून १६७४ रोजी राज्याभिषेक झाला. या दिवशी पहाटे उठून, मंत्रोच्चार आणि संस्काराबरोबर आंघोळ करून, कुलदेवतेला स्मरून, राज्याभिषेक सुरू झाला. गागाभट्ट आणि इतर ब्राह्मणांना यावेळीही आभूषणे आणि वस्त्रे भेट देण्यात आली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी शुभ्र वस्त्रे परिधान केली होती. गळ्यात फुलांच्या माळा इकडून तिकडे व तिकडून इकडे रूळत होत्या. राज्याभिषेकात महाराजांचे अभिषेक आणि डोक्यावर छत्र धरणे, हे दोन प्रमुख विधी होते. दोन फूट लांब व दोन फूट रुंद अशा सोन्याने मढवलेल्या मंचकावर छत्रपती शिवाजी महाराज बसले, शेजारी रेशमी उपरण्याला भरजरी साडीचे टोक बांधलेली सोयराबाई दुसऱ्या मंचकावर, तर बाल शंभूराजे नटूनथटून थोडेसे मागे बसले होते. अष्टप्रधान मंडळातील आठही प्रधान गंगेसारख्या विविध नद्यांतून आणलेले पाण्याचे जलकुंभ घेऊन उभे होते. त्यानंतर त्या जलकुंभांनी छ.शिवाजी महाराजांवर अभिषेक झाला. त्यावेळी मंत्रोच्चारण आणि आसमंतात विविध मंगल सुरवाद्य निनादत होते. सोळा सुवासिनींनी पंचारती ओवाळली. यानंतर छ.शिवाजी महाराजांनी लालरंगाचे वस्त्र परिधान केले. जडजवाहिर, अलंकार परिधान केले. गळ्यात फुलांचे हार घातले. एक रुबाबदार राजमुकूट घातला. आपली ढालतलवार आणि धनुष्यबाण यांची पूजा केली. या शुभ मुहूर्ताच्या वेळी राजसिंहासनाच्या दालनात रुबाबात प्रवेश केला.
राज्यभिषेकाचे दालन हिंदू परंपरेनुसार ३२ शुभशकुन चिन्हांनी सजवलेले होते. सभासदबखर म्हणते त्याप्रमाणे ३२ मण सोन्याचे भव्य सिंहासन सोन्याच्या पत्र्याने मढवलेले होते. छत्रपती शिवाजीराजे सिंहासनावर दिमाखात आरुढ झाले. सोळा सवाष्णींनी त्यांना ओवाळले. ब्राह्मणांनी मोठ्या स्वरात मंत्रांचे उच्चारण केले. प्रजेनी महाराजांना शुभाशीर्वाद दिला. “छत्रपती शिवाजी महाराज की जय! छत्रपती शिवाजी महाराज की जय!!” असा जयघोष करण्यात आला. सोन्याचांदींची फुले उधळली गेली. विविध- ढोल, नगारे, तुतारी, सनई आदी तालवाद्यांच्या निनादाने व सूरवाद्यांच्या मंगलसुरांनी आसमंत दुमदुमून गेले. आधीच ठरविल्याप्रमाणे प्रत्येक गडावरून “धडाक धूम…” तोफा डागल्या गेल्या. मुख्य पुरोहित गागाभट्टांनी पुढे येऊन राजांच्या डोक्यावर मोत्यांची झालर ठेवत “शिवछत्रपती” म्हणून उच्चार केला. छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व जनांना खुप धनधान्य भेट म्हणून दिले. त्यांनी एकून सोळा प्रकारचे महादान केले. त्यानंतर विविध मंत्रिगणांनी सिंहासनापुढे जाऊन राजांना अभिवादन केले. शिवछत्रपतींनी त्यांना या प्रसंगी विविध पदे, नियुक्तिपत्रे, धन, घोडे, हत्ती, रत्ने, वस्त्रे, शस्त्रे दान केलीत. हे सर्व सकाळी आठ वाजेपर्यंत संपले. समारंभ संपल्यावर छत्रपती शिवाजी महाराज पहिल्यांदाच एका देखण्या घोड्यावर स्वार होऊन जगदीश्वराच्या मंदिराकडे गेले. तिकडून हत्तीवर स्वार होऊन त्यांची मिरवणूक रायगडावर निघाली. इतर दोन हत्तींवर जरीपटके आणि भगवे झेंडे घेऊन सैन्यांचे प्रतिनिधी होते. सोबत अष्टप्रधान मंडळ आणि इतर सैन्यदळ होते. रायगडावर ही मिरवणूक जात असताना सामान्य जनांनी फुले, चुरमुरे उधळले; दिवे ओवाळले. रायगडावरील विविध मंदिरांचे दर्शन घेऊन राजे महालात परतले.
राज्याभिषेकाच्या दिवसापासूनच स्वराज्यातील राजपत्रांवर “क्षत्रिय कुलावतंस श्री राजा शिवछत्रपती” असे नमूद करणे सुरु झाले. शिवरायांनी राज्याभिषेकाच्या दिवसापासून नवीन शक सुरु केले आणि छत्रपती शिवराय शककर्ते राजे झाले. याच शकाला शिवराज्याभिषेक शक संबोधले जाते. शिवरायांनी आपल्या स्वतःच्या स्वराज्यात स्वतःच्या नावाची नाणी पाडली. तांब्याच्या पैश्याला- शिवराई व सोन्याच्या पैश्याला- शिवराई होन म्हटले जाऊ लागले. स्वराज्यात अधिकृतरीत्या शिवरायांनी अष्टप्रधान मंडळाची नेमणूक केली. अनेक सरदार व मंत्री यांना स्वराज्याची कामे आणि जबाबदाऱ्या वाटून दिल्या. रायगडावर दि.६ जून १६७४ रोजी झालेला शिवराज्याभिषेक सोहळा हा त्या गडावर आलेल्या प्रत्येकासाठी जणू दसरा-दिवाळी उत्सवासारखाच होता. आपल्या लाडक्या राजाला सिंहासनावर बसलेला पाहण्यासाठी असंख्य जनता आसुसून तेथे उपस्थित होती. हा सोहळा ज्यांनी “याचि देही, याचि डोळा” अनुभवला त्या प्रत्येकाच्या मनात आपण धन्य झालो, ही एकच भावना होती. या सोहळ्यात अशा काही खास गोष्टी करण्यात आल्या, ज्या केवळ ऐकून तुमच्या अंगावर रोमांच उभा राहिल्याखेरीज राहणारच नाही. ज्या ऐकून तुम्हाला कदाचित तुमच्या डोळ्यासमोर या शिवराज्याभिषेक सोहळ्याची हलकीशी छटा सुद्धा निर्माण होईल, चित्रफितीसारखी!
!! शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय !! अतिव ओढ असणाऱ्या अतिव गोड अशा या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा !!
– संकलन व सुलेखन –
श्री कृष्णकुमार आनंदी-गोविंदा निकोडे गुरूजी.
पोटेगावरोड, पॉवरस्टेशनच्या मागे, गडचिरोली.
फक्त व्हॉट्सॲप नं. ९४२३७१४८८३.