साकोली : ग्रामीण भागातील महिला पुरुष कामगारांची नोंदणी व नुतनीकरण सहज सुलभ व तत्परतेने करा असे शासकीय परीपत्रक असतांनाही काही गावांतील ग्रामसेवक कामगारांना फार्मवर सह्या देत नसून विनाकारण हेलपाट्या मारायला लावतात. याने महिला पुरुष कामगार संतप्त होऊन मंगळवार ( १३ फेब्रु.) ला साकोली पंचायत समितीवर धडकले. येथे सुरू असलेल्या बैठकीत सभापती, उपसभापती व पं.स. सदस्यांनी या गंभीर विषयी तातडीने कामगार मजूरांना शासनाच्या गृहपयोगी वस्तुंचा लाभ मिळावा यासाठी सर्व ग्रामसेवकांना सह्या देण्यासाठी येथे सर्वानुमते ठराव मंजूर करण्यात आला.
महाराष्ट्र शासन इमारत व बांधकाम कामगारांना सध्या शासनाकडून गृहपयोगी वस्तुंचे वाटप सुरू आहे. नविन बांधकाम व नुतनीकरण करण्यासाठी ग्रामीण भागातील महिला पुरुष कामगार हे एकापेक्षा जास्त मालकांकडे काम करतात, त्यांचे काम अस्थायी, सातत्य नसलेले व दैनंदिन असल्याने अशा कामगारांना समंधीत ग्रामसेवक यांना नोंदणी अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. पण साकोली तालुक्यातील कुंभली, सानगडी, मोखे/किन्ही, गुढरी गटग्रामपंचायत, बोंडे आणि काही गावात कामगारांना सह्या देऊन सहकार्य करीत नसल्याचे निदर्शनास आले. यात सर्व संतप्त झालेल्या महिला पुरुषांनी थेट पंचायत समिती गाठली. येथे कामगारांची गर्दी पाहून सभापती गणेश आदे, उपसभापती सरीता करंजेकर, पंचायत समिती सदस्य होमराज कापगते, अनिल किरणापूरे, अर्चना ईळपाते, करूणा वालोदे, ललित हेमणे, छाया खर्डेकर यांनी गटविकास अधिकारी पी. व्ही. जाधव यांना सुरू असलेल्या बैठकीतच ठराव मंजूर करून घेतला यात सर्व ग्रामसेवकांनी कामगारांना सह्या देऊन त्यांची शासन आदेशानुसार नोंदणीची जबाबदारी पार पाडावी. तसा पंचायत समिती कडून लवकरच आदेश पत्र निघणार असल्याचे यावेळी सभापती गणेश आदे व सर्व पं. स. सदस्यांनी सांगितले. कारण शासनाच्या गृहपयोगी किचन सेटचा सर्व कामगार लाभार्थ्यांना लाभ घेता येईल असे सभापती दालनात सर्व महिला पुरुष कामगारांना आश्वासन देण्यात आले. याप्रसंगी कुंभली, सानगडी, मोखे किन्ही, गुढरी, बोंडे व ज्या गावातील ग्रामसेवक सह्या न देता मनमानी कारभार करतात अश्या गावातील ४० ते ५० महिला पुरुष कामगार उपस्थित होते. कारण हे संतप्त प्रकरण कामगार कॉंग्रेस जिल्हा अध्यक्ष मार्कंडराव भेंडारकर यांपर्यंत गेले व कॉंग्रेस कामगार सेल याबाबद आंदोलन करण्याच्या तयारीत होते.




