




किशोर राऊत
तालुका प्रतिनिधी महागाव
दिवाळी सण म्हटला की फटाक्यांची आतिषबाजी आलीच. मोल मजुरी करणारा मजूरदारवर्ग सुद्धा दरवर्षी हजारोची फटाके घेऊन आपली दिवाळी साजरी करतो. दरवर्षी या फटाका व्यवसायामध्ये लाखोंची उलाढाल महागाव शहरामध्ये होते. मात्र नागरिकांच्या जिवास व पर्यावरणास हानिकारक असलेल्या फटाका हा बिनधास्तपणे कोणतेही निर्बंध न पाळता विकला जातो. शहरांमध्ये फटाका व्यवसायिक आपली दुकाने बाजारपेठेलगत थाटत असल्याने बाजारपेठेत आग लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. फटाका व्यवसाय मुख्य बाजारपेठेत दुकान लावत असल्याने एखाद्या जरी फटाक्याचा स्फोट झाला तर संपूर्ण बाजारपेठेची राख रांगोळी होउ शकते. पैसे कमावण्याच्या लालसे पोटी या फटाका व्यवसायिकाना नागरिकांच्या जिवाचे व इतर व्यवसायिकांचे काही देणे घेणे राहिले नाही तसेच शासनाने घालून दिलेले फाटक्याच्या वजनाचे माप सुद्धा कोणत्याच व्यावसायिक पाळत नाही. नियमानुसार यांना किलोप्रमाणे बारूद व फटाके विक्रीची परवानगी असते मात्र सर्व नियम धाब्यावर बसवून मनमानीपणे फटाक्याची विक्री महागाव शहरात होत आहे. काही व्यवसायिक तर वर्षभर सुद्धा फटाके विकत असून त्यांची फटाक्याची गोदामे ही शहरातच आहेत. त्यांच्या या लापरवाहीमुळे शहरात एखाद वेळेस मोठे आगतांडव घडू शकते . फटाका व्यवसायिकांकडे नगरपंचायत सुद्धा जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असून यात काही देवाण-घेवाण तर नाही ना अशी शंका नागरिकांच्या मनात आता येत आहे. तरी प्रशासनाने या बाबीला गांभीर्याने घेऊन सर्व फटाक्याचे दुकाने शहराच्या बाहेर लावण्याचे व तसेच यांच्या दुकानांची तपासणी करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.

