Home मुंबई बांधकाम कामगारांचे कल्याणकारी मंडळासमोर जोरदार धरणे आंदोलन!

बांधकाम कामगारांचे कल्याणकारी मंडळासमोर जोरदार धरणे आंदोलन!

48

 

मुंबई (विशेष प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने 25 ऑक्टोबर रोजी मुंबई बांद्रा येथील महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या कार्यालयासमोर सकाळी 11 ते दुपारी तीन वाजेपर्यंत जोरदार धरणे आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्रातील सध्या 35 लाख नोंदीत बांधकाम कामगारांच्यापैकी वीस लाख बांधकाम कामगारांचे सर्व प्रलंबित अर्ज ताबडतोब निकाली काढा !महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळावर कामगार संघटनांचे प्रतिनिधी नेमा, महाराष्ट्रातील बांधकाम कामगारांच्या साठी मंडळाने घोषित केल्यानुसार घर बांधणी योजना त्वरित राबवा. महाराष्ट्रातील नोंदीत बांधकाम कामगारांच्या दोन मुलीच्या विवाहसाठी प्रत्येकी 51 हजार रुपये आर्थिक सहाय्य द्या. महाराष्ट्रातील सर्व बांधकाम कामगार एकजुटीचा विजय असो! इत्यादी घोषणा धरणे आंदोलनामध्ये जोरदारपणे देण्यात आल्या या महत्त्वाच्या धरणे आंदोलनामध्ये महिला बांधकाम कामगारांची संख्या लक्षणीय होती.

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे सचिव श्री विवेक कुंभार यांना शिष्टमंडळाच्या वतीने निवेदन देण्यात आले. शिष्टमंडळाच्या वतीने बोलताना कॉ शंकर पुजारी यांनी सांगितले की सर्व प्रलंबित अर्ज त्वरित मंजूर करावेत. घोषित केल्यानुसार बांधकाम कामगारांची घरबांधणी योजना त्वरित राबवावी. कामगारांची नोंदणी व नुतनीकरण सुलभ करावी.
यासंदर्भात बोलताना बांधकाम कल्याणकारी मंडळाचे सचिव श्री विवेक कुंभार यांनी स्पष्ट केले की, सध्या महाराष्ट्रामध्ये जे सर्व प्रलंबित बांधकाम कामगारांचे अर्ज आहेत ते सर्व अर्ज 30 नोव्हेंबर 2023 पर्यंत तपासून पूर्ण निकाली करण्यात येणार आहेत. असे ठोस आश्वासन बांधकाम कल्याणकारी मंडळाचे सचिव श्री विवेक कुंभार यांनी दिले. त्यांनी असेही सांगितले की नवीन नोंदणीची प्रक्रिया अत्यंत सोपी केलेली असून फक्त आधार कार्ड वर कामगारांची नोंदणी करण्यात येईल. बांधकाम कामगारांच्या घरकुल योजनेबद्दल त्यांनी सांगितले की याबाबत बांधकाम कल्याणकारी मंडळाने नुकतेच नियम केले असून डायरेक्ट घर बांधणीचे दोन लाख रुपये बांधकाम कामगारांना शहरी व ग्रामीण भागात देण्यात येतील.
नोंदीत बांधकाम कामगारांच्या दोन मुलींना आर्थिक सहाय्य देणे बरोबर आहे असे सांगून याबाबत शिफारस करण्यात येईल असे त्यांनी सांगितले. इतर मागण्या संबंधी बोलताना त्यांनी स्पष्ट केले की या मागण्या शासन पातळीवरील असल्यामुळे या मागण्या शासनाकडे त्वरित पाठवण्यात येतील. शिष्टमंडळात कॉ शंकर पुजारी, साथी सागर तायडे, साथी सुरेश पाटील,कॉ रमेश जाधव, कॉ सुनील पाटील, साथी विनिता बाळेकुंदरी, श्री दीपक थोरात, कॉमेड संभाजी भैरे,कॉम्रेड विशे, आयु धनंजय वाघमारे, कॉ कुट्टी, आयु पदमाकर अहिरे,योगिता घाडगे, विजय दाभाडे, बेबी नाईक, स्वाती खिलारी यादींनी सहभाग घेऊन विविध समस्या मांडल्या.
शिष्टमंडळाबरोबर चर्चा झाल्यानंतर कल्याणकारी मंडळाच्या ऑफिस समोर झालेल्या सभेमध्ये कॉ शंकर पुजारी, साथी सागर तायडे, साथी सुरेश पाटील, कॉ रमेश जाधव, कॉ सुनील पाटील, साथी विनिता बाळेकुंदरी, श्री दीपक थोरात,कॉमेड संभाजी भैरे, कॉम्रेड विशे ठाणे ,कॉ.उस्मान शेख,आयु.धनंजय वाघमारे, कॉ कुट्टी, आयु पद्माकर अहिरे नंदकुमार महाडिक रविंद्र सूर्यवंशी इत्यादींची भाषणे झाली.या आंदोलनामध्ये विविध संघटनांचे कामगार प्रतिनिधीक स्वरूपात उपस्थित होते, त्यात कर्जत,खपोली,उल्हासनगर, कल्याण बदलापूर ठाणे, पालघर,रायगड, औरंगाबाद,परभणी, सांगली, कोल्हापूर,मुंबई,नवी मुंबई, येथून इमारत बांधकाम कामगार आणि आदिवासी भागातील महिलांची लक्षवेधी मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here