




सचिन सरतापे (प्रतिनिधी म्हसवड) मोबा.9075686100
म्हसवड : माण तालुक्यातील आंधळी या ठिकाणी पती पत्नीचा धारदार शस्त्राने खून करून फरार झालेला आरोपी अखेर पोलिसांना सापडला आहे. अवघ्या चार तासात तपासाची चक्रे गतिमान करत पोलिसांनी या घटनेतील आरोपीस ताब्यात घेतले आहे.सकाळी घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यावेळी संजय रामचंद्र पवार(वय-५०) व मनीषा संजय पवार (वय-४५) यांचा मध्यरात्रीच्या सुमारास शेतात खून करून आरोपी बापूराव शहाजी पवार हा फरार झाला होता. पूर्व वैमनस्यातून आणि वादातून त्याने हा खून केल्याचे तपासाअंती निष्पन्न झाले.
स्वतःचा सख्खा चुलत भाऊ आणि भावजय ही दहा वाजण्याच्या सुमारास लाईट आल्यानंतर शेतात भिजवण्यासाठी गेले असता त्याने धारदार शस्त्राने त्यांच्यावर वार करून त्यांची हत्या केली. सकाळी अचानक लोक जमा झाल्याने हा खूनाचा प्रकार पोलिसांना समजला. सकाळी नऊ वाजल्यापासून दहिवडी पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला. यावेळी श्वान पथकही पाचारण करण्यात आले होते. स्थानिक गुन्हे शाखेचेही कर्मचारी उपस्थित होते.
घटनेची माहिती मिळाल्यापासून दहिवडी पोलिसांनी आपल्या तपासाची चक्रे गतिमान करत त्याचा माग काढला. त्यानुसार पहिल्यांदा तो फलटण येथे असल्याचे समजले,मात्र त्यानंतर तो फलटणहून येऊन आंधळी परिसरातच असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले. घटनेची माहिती मिळाल्यापासून अवघ्या काही तासातच पोलिसांनी आरोपीस शिताफीने पकडल्यामुळे त्यांचे कौतुक होत आहे.

