




कराड :(प्रतिनिधी, दि. १७) “कराड नगरीचे भाग्यविधाते व शिल्पकार आदरणीय पी. डी. पाटीलसाहेब यांनी कराड व परिसराचा सर्वांगीण विकास केला. त्यांनी कराडमध्ये विविध शैक्षणिक संकुले, भूमिगत गटार, पाणीपुरवठा मंडळ इत्यादींची स्थापना केली व कराडच्या सर्वांगीण विकासामध्ये मोलाची भर टाकली. तसेच त्यांचे कृषी आणि क्रीडा क्षेत्रातही बहुमोल असे योगदान आहे.” असे मत लायन्स क्लब ऑफ कराडचे अध्यक्ष अँड. श्री विराग जांभळे यांनी व्यक्त केले. ते आदरणीय पी. डी. पाटील साहेब यांच्या 15 व्या पुण्यस्मृती दिनानिमित्त रविवार दिनांक 17 सप्टेंबर 2023 रोजी श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या उच्च शिक्षण मंडळ कराडच्या वेणूताई चव्हाण कॉलेज, कराड येथे आयोजित ‘मोफत भव्य नेत्र चिकित्सा शिबिराच्या उदघाटन प्रसंगी बोलत होते.
याप्रसंगी माननीय श्री. अरुण पाटील (काका) विश्वस्त सदस्य, श्री शिवाजी शिक्षण संस्था कराड यांनी या शिबिराचे उद्घाटन केले. याप्रसंगी लायन्स क्लब ऑफ कराडचे डॉ. सौ. योगिता पाटील, श्री संतोष विभूते, श्री सतीश पाटील, श्री अविनाश भिसे, श्री सुप्रीम तावरे, श्री वाघमोडे व संस्थेचे सचिव डॉ.एस बी केंगार उपस्थित होते.
सदर नेत्र चिकित्सा शिबिरामध्ये कराड, कोपर्डे, सैदापूर, बनवडी, पार्ले व विद्यानगर परिसरातील ग्रामस्थ सहभागी झाले होते. तसेच वेणूताई चव्हाण कॉलेज, कराड, यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ सायन्स, कराड या महाविद्यालयातील वरिष्ठ व कनिष्ठ विभागातील विद्यार्थी, शिक्षक, प्राध्यापक, प्राध्यापिका, शिक्षकेतर कर्मचारी यांनी नेत्र चिकित्सा करून घेतली.
या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक जिमखाना उपाध्यक्ष डॉ. सौ. एस. आर. सरोदे यांनी केले व उपप्राचार्य श्री. आर.ए. कांबळे यांनी उपस्थितांचे आभार मानले. या कार्यक्रमासाठी व शिबिरासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

