




✒️पुणे(पुरोगामी न्युज नेटवर्क)
पुणे(दि.17ऑगस्ट):-महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे संस्थापक, प्रबोधनाच्या चळवळीतील कृतिशील विचारवंत, ध्येयवादी संघटक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाला येत्या २० ऑगस्ट रोजी १० वर्षे पूर्ण होत आहेत. शहीद डॉ नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाच्या तपासात, तपास यंत्रणांनी अक्षम्य दिरंगाई केली आहे, राज्य आणि केंद्र सरकारला याचे गांभीर्यच राहिले नाही, याचा आम्ही संघटनेच्या वतीने तीव्र संताप निषेध नोंदवत आहोत. आमच्या संघटनेच्या वतीने दरवर्षी प्रमाणे राज्यभर शाखा, जिल्हा, राज्य पातळीवर निषेधाचे कार्यक्रम आयोजित केले आहेत. या प्रकरणात तातडीने तपास पूर्ण होऊन आरोपींना शिक्षा व्हावी, खुनाचे सूत्रधार माहीत असूनही कारवाई होत नाही. त्यांचा शोध घेवून त्यांना तत्काळ अटक करून त्यांचेवर कायदेशीर कडक कार्यवाही करावी.
या अक्षम्य विलंबाबाबत राज्य व केंद्र सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी. या मागन्यासाठी तहसीलदार, जिल्हाधिकारी यांच्या मार्फत राष्ट्रपती, प्रधान मंत्री, केंद्रीय गृहमंत्री, मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांना निवेदने देणार आहोत, गेली दहा वर्षे हे चालूच आहे याअगोदर तर देश पातळीवरही नवी दिल्ली येथे अनेकवेळा धरणे आंदोलने केली व निवेदने देण्यात आली आहेत. अशी माहिती राज्य कार्याध्यक्ष माधव बावगे यांनी दिली आहे.
यावेळी राज्य प्रधानसचिव डॉ. ठकसेन गोराणे, माधुरी गायकवाड, विशाल विमल उपस्थित होते.
दि.२० ऑगस्ट २०१३ रोजी पुण्यात डॉ. दाभोलकरांचा खून हा सनातनी व कट्टरपंथी, मूलतत्ववादी विचारधारेने प्रशिक्षित केलेल्या लोकांवकरावी केला आहे. कांहीं संशयित मारेकऱ्यांना पकडण्यात आले आहे. मात्र या खुनाचे सूत्रधार पकडण्यात तपास यंत्रणा सपशेल अपयशी ठरलेल्या आहेत. राजकीय इच्छशक्तीचा अभाव असल्यानेच गेल्या दहा वर्षात डॉ.दाभोलकरांच्या खून प्रकरणात फारशी प्रगती नाही. डॉ.दाभोलकर यांच्या खुनाच्या तपासात गती घेवून तातडीने त्यांचेवर कारवाई झाली असती तर पुढील तीन विचारवंतांचे खून झाले नसते, असे आम्हाला वाटते. डॉ.दाभोलकरांच्या खुनानंतर कॉ. गोविंद पानसरे, माजी कुलगुरू डॉ. एम एम कलबुर्गी, निर्भिड पत्रकार गौरी लंकेश यांचेही त्याच पद्धतीने खून करण्यात आले आहेत. सध्या तपासात पुढे आलेल्या गोष्टीमध्ये या चौघांचे खून हे विशिष्ट कट्टर पंथीय सनातन संस्थेने केलेले आहेत.
डॉ.कलबुर्गी, पत्रकार गौरी लंकेश यांच्या खूनाचा तपास ज्या गतीने, गांभीर्याने झाला आहे, तेवढे गांभीर्य डॉ. दाभोलकर, कॉ. पानसरे यांच्या खुनाच्या तपासात दिसले नाही. पुरोगामी महाराष्ट्रात विचारवंतांचे खून झाले हे सर्वासाठी लाजिरवाणी बाब आहे. याचा आम्ही सतत दहा वर्षे निषेध करत आहोत. महा. अं नि स सातत्याने, शांततेने संयमाने या घटनेचा निषेध व संताप व्यक्त केला आहे. संविधानिक मार्गाने निषेध मोर्चे, फेऱ्या, धरणे आंदोलने केली आहेत. आणखी कुठवर वाट पाहायची?
डॉ.दाभोलकरांचा खून झाल्या नंतरही अंधश्रध्दा निर्मूलनाचे काम थांबेल, त्याची गती कमी होईल असे मारेकऱ्यांना व त्यामागील सूत्रधाराला वाटले असेल मात्र आम्ही कार्यकर्त्यांनी डॉ. दाभोलकर यांच्या विचाराचे स्मरण ठेवून, माणूस मारून विचार संपत नाहीत हे आमच्या कृतीतून दाखवले आहे. अंधश्रध्दा निर्मूलनाचे काम आजही पूर्वी इतक्याच जोमाने सुरू आहे. एका बाजूला खुनाच्या तपासात प्रगती नाही, याचे दुःख उरी बाळगून, अं नि स चे कार्यकर्ते विवेकी विचार रुजविण्याचे काम राज्यभर अगदी जोमाने करीत आहेत. पुण्यामध्ये डॉ. दाभोलकर शहीद दिनाच्या निमित्ताने त्यांच्या विचारांचा कृतिशील जागर करण्याचे ठरवले आहे.
*१९ व 20 ऑगस्ट रोजी पुण्यात विविध कार्यक्रम*
१) शनिवार दि.१९ ऑगस्ट २०२३ रोजी सायंकाळी ५.३० वाजता महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पूल पुणे येथे पूर्वसंध्येला स्मृती जागर करण्यात येणार आहे. प्रबोधन गीते गायली जातील, मेणबत्या, मशाली पेटवून विचार जागर करण्यात येणार आहे.
२) रविवार दि.२० ऑगस्ट २०२३ रोजी शहीद दिनी महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पूल पुणे येथे सकाळी सात वाजता डॉ.नरेंद्र दाभोलकर यांना अभिवादन करण्यात येणार आहे. अभिवादन व परिवर्तनवादी गीते सादर केली जातील. अभिवादन झाल्यावर पुलापासून एस एम जोशी सोशलिस्ट फाउंडेशन पर्यंत मूक मोर्चा काढण्यात येणार आहे.
3) २० ऑगस्ट रोजी सकाळी ९.३० ते १.३० या वेळेत पुणे येथील एस एम जोशी सभागृहात राज्यस्तरीय विवेकी निर्धार मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्यात प्रसिद्ध विचारवंत, लेखक डॉ.राम पुनियानी, मुक्त पत्रकार हेमंत देसाई, सामाजिक कार्यकर्त्या रझिया पटेल, संघटनेचे कार्याध्यक्ष माधव बावगे, प्रधान सचिव संजय बनसोडे आदी मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्य अध्यक्ष अविनाश पाटील असतील. अधिक माहितीसाठी 7276559318 विशाल विमल पुणे यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती अविनाश पाटील (अध्यक्ष), माधव बावगे (कार्याध्यक्ष),राज्य प्रधानसचिव संजय बनसोडे, नंदकिशोर तळाशीलकर, डॉ. ठकसेन गोराणे, गजेंद्र सुरकार, राज्य सरचिटणीस कृष्णात स्वाती, सुधाकर काशीद, बबन कानकिरड, संजय शेंडे, विनायक सावळे, राज्य सरचिटणीस : शहाजी भोसले, रुक्साना मुल्ला, विजय परब, सचिन थिटे,मानव कांबळे (पुणे जिल्हा अध्यक्ष), सम्यक वि. म. (जिल्हा कार्याध्यक्ष), संजय बारी (जिल्हा प्रधान सचिव) लालचंद कुंवर (शिवाजीनगर शाखा अध्यक्ष), विनोद लातूरकर (शाखा कार्याध्यक्ष), श्याम येणगे (शाखा सचिव) यांनी केले आहे.

