Home चंद्रपूर नशीब शेतकऱ्यांचे!

नशीब शेतकऱ्यांचे!

124

कांद्याच्या दरवाढीमुळे सत्ता गमवावी लागल्याचे उदाहरण देशाच्या इतिहासात आहे. तेव्हापासून कांद्याचे दर वाढले की, केंद्र सरकार लगेच पावले उचलते आणि ते नियंत्रणात आणण्यासाठी कंबर कसते, सत्ताधारी पक्षाच्या शाखा ठिकठिकाणी दुकाने मांडून कांदा स्वस्तात उपलब्ध करून देतात. कांदा डोळयातून नुसता पाणी काढत नाही तर सत्ताधाऱ्यांना रस्त्यावर आणुन वेलकम चित्रपटातील नाना पाटेकरांप्रमाणे “आलु ले लो, कांदा ले लो” अशा आरोळ्या द्यायला लावतो, कांद्याच्या दरवाढीची आठवण करून देणारी परिस्थिती सध्या देशभरात टमाटरने निर्माण केली आहे,

किरकोळ बाजारात दिडशे रुपये किलोपर्यंत पोहोचलेला टमाटर सर्वसामान्य माणसाच्या जेवणातून कधीच बाहेर फेकला गेला आहे. एवढेच नव्हे तर बड्या बड्या हॉटेलमधुनही टमाटरशी संबंधीत पदार्थ हद्दपार होत आहे. तरुण पिढीची संपत्ती असलेल्या काही साखळी रेस्टॉरंटमधुन टमाटरला खरेदी करणे बंद केले असुन त्यांच्या बर्गर आदी पदार्थातूनही तो बाहेर गेला, टमाटर हे हंगामी पीक असल्याचे कारण त्यासाठी देण्यात आले आहे. एकुण या दरवाढीचे सामान्य माणसांच्या स्वयंपाक घरापासून बडया साखळी हॉटेलांपर्यंत कसे परिणाम झाले हेच या उदाहरणावरुन दिसुन येते. सर्वसामान्य माणसांची दोन घासांसाठी रोजची लढाई असल्याने त्याला या टमाटरला दरवाढीचे फारशे कौतुक नसले तरी ही दरवाढ विविध समाजघटकांवर कुठे ना कुठे परिणाम करत असतेच.

मध्यवर्गीयांकडुन नेहमीप्रमाणे टमाटरच्या दरवाढीबद्दल संताप व्यक्त करण्यात येत आहे. परंतु हे सगळे होत असताना तीन आठवडयापूर्वी पाच रुपये किलोने विकला जाणारा टमाटर अचानक एवढा का वधारला?, याचा विचार कुणी करताना दिसत नाही. ज्यावेळी टमाटर मातीमोल भावाने विकला जाती, तेव्हा शेतकरी देशोधडीला लागत असतो. मग असे दर आभाळाला भिडतात तेवहा त्याच्या नुकसानीची भरपाई होते का याचेही विश्लेषण कुणी करतांना दिसत नाहीत.

अलीकडच्या काळात दर पडल्याने बाजारात नेवुन विकणे परवडत नसल्यामुळे टमाटर रस्त्यावर ओतुन दिल्याच्या अनेक घटना आहेत, त्या परिस्थितीकडे तटस्थपणी पाहणारा मध्यमवर्ग दरवाढ झाल्यावर मात्र आकांडतांडव करताना दिसतो. त्याच वर्गासाठी देशभरातील बाजारपेठांतुन टमाटर खरेदी करून परवडणाऱ्या दरात विकण्याची वेळ सरकारवर आली. या सर्व परिस्थितीमध्ये एकच प्रश्न उपस्थित होतो आणि त्याचे कुतुहल अनेकांच्या मनात आहे. ते म्हणजे दरवाढीचा फायदा शेतकऱ्यांना झाला का किंवा किती प्रमाणात झाला? कारण अन्य पिकांबाबत असे आढळून येते की, नुकसान होते तेव्हा ते शेतकऱ्यांचे होत असते. परंतु फायदा होतो तेव्हा तो सगळया दलालांचा होत असतो, शेतकरी नामानिराळाच राहतो, आता सुध्दा असा प्रश्न विचारला जात आहे. टमाटर उत्पादक मालामाल… टमाटरने शेतकऱ्यांना केले लखपती… अशा बातम्या व्हायरल होत आहेत आणि लाल टमाटर गुलाबी चित्र दाखविले जात आहे.

या संदर्भातील वस्तुस्थिती समजुन घेण्यासाठी वर्षभराचा आढावा घ्यावा लागतो आणि त्यातून शेतकऱ्याच्या हाती फारसे काही लागले नसल्याचेच दिसुन येते. वर्षभरातील पहिल्या हंगामात एक किलो टमाटरला १० ते १५ रुपये भाव मिळाला. दुसऱ्या हंगामातील ५ ते १० रुपये होता. शेतीच्या फायद्या तोट्याचे गणित बाजारात मिळणाऱ्या दरावर नव्हे तर पिकांसाठी येणारा उत्पादन खर्च आणि मिळणारा दर या गणितावर अवलंबुन असते. एक किलो टमाटरला उत्पादन खर्च सरासरी १३ रुपयांपर्यंत येतो. ती बाजारात नेवून विकण्यापर्यंतचा खर्च धरल्यास विक्रीपर्यंत किलोला १६ ते १७ रुपये खर्च येतो. असे शेतकऱ्यांकडुन सांगण्यात येते. याचाच अर्थ आधीच्या दोन्ही हंगामात शेतकऱ्यांना तोटाच सहन करावा लागला. आधीच्या दोन्ही हंगामात तोटा झाल्याने शेतकऱ्यांनी टमाटरची लागवड कमी केली. बाजारात आवक कमी झाल्याने दर वाढले. एप्रिल महिण्यापासुन उष्णतेची लाट सुरु झाली आणि वातावरणात मोठे बदल झाले.

अन्य भाजीपाल्यासह टमाटर पिकालाही त्याचा फटका बसला, जुन महिण्यात पावसाने ओढ दिली आणि चालू हंगामात २० जुननंतर दरात अचानक वाढ झाली. शेतकरी दरवर्षी टमाटर तीन हंगाम घेत असतात. पहिल्या दोन हंगामात नुकसान झाल्यामुळे तिसऱ्या हंगामात लागवड कमी झाली. हरियाणा, उत्तरप्रदेश, हिमाचल प्रदेश, बिहार या राज्यातुनही शेतकऱ्यांनी या पिकाकडे पाठ फिरवली. त्याचा एकुण परिणाम बाजारावर झाला. एकरी सरासरी उत्पादन आणि तिन्ही हंगामात मिळालेला दर याचे गणित केल्यावर किलोला १७ ते २० रुपये भाव मिळाला.

मात्र ज्या शेतकऱ्यांनी चालू हंगामात टमाटर पन्नास ते साठ रुपयांनी विकला, त्याच शेतक-यांना हा दर मिळाला, ज्यातून त्यांचा जेमतेम उत्पादन खर्च निघाला. ज्यांनी तिसरा हंगाम घेतला नाही त्यांना पहिल्या दोन्ही हंगामात जबर नुकसानच सहन करावे लागले. शेतीमालाला भाव मिळणे आणि शेतकऱ्याचा फायदा होणे याचा सध्याच्या व्यवस्थेत अर्थाअर्थी संबंध नाही. ही स्थिती सुधारून जेव्हा शेतकऱ्याला उत्पादन खर्चावर आधारीत दर मिळेल किंवा बाजारातला थेट फायदा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल. तेव्हा शेतकऱ्यांना बरे दिवस येतील. अन्यथा शेतकऱ्याच्या नशिबी लाल चिखलच राहील.

✒️सुरेश दौलतराव डांगे(संपादक साप्ताहिक पुरोगामी संदेश)मो:-८६०५५९२८३०

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here