Home महाराष्ट्र करिअर मार्गदर्शन एक मास्टर प्लॅन विद्यार्थ्यांसाठी ठरणार दिशादर्शक संत जनाबाई...

करिअर मार्गदर्शन एक मास्टर प्लॅन विद्यार्थ्यांसाठी ठरणार दिशादर्शक संत जनाबाई महाविद्यालयात आयोजन, दहावी-बारावी, पदवी नंतर काय? याविषयी मिळणार मार्गदर्शन

74

 

अनिल साळवे
गंगाखेड (प्रतिनिधी) :-
दहावी-बारावी, पदवीच्या परीक्षा संपल्या की, विद्यार्थ्यांना वेध लागतात महाविद्यालयीन शिक्षण व पुढील करिअरची दिशा ठरविण्याचे. अनेकदा नेमके कोणते महाविद्यालय निवडायचे किंवा कोणत्या करिअरची निवड करायची, याबाबत निर्णय घेताना विद्यार्थी व पालकांचा गोंधळ उडतो किंवा त्यांना पुरेसे मार्गदर्शन मिळत नाही. या काळामध्ये गरज असते ती ठरविलेल्या करिअरबाबत योग्य मार्गदर्शन व माहिती मिळण्याची. यासाठी गंगाखेड विधानसभेचे आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांच्या प्रमुख मार्गदर्शनात व युवा उद्योजक सुनिल भैय्या गुट्टे यांच्या प्रमुख संकल्पनेतून करिअर मार्गदर्शन – एक मास्टर प्लॅन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

गंगाखेड येथील संत जनाबाई शिक्षण संस्थेच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सभागृह येथे येत्या रविवारी ११ जून रोजी संपन्न होणाऱ्या या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून पुणे येथील सुप्रसिध्द करिअर तज्ञ रविंद्र के यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांची ऑनलाईन नावनोंदणी लक्षात घेवून दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी सकाळी १० ते १२ व पदवी आणि पदव्युत्तर पदवीच्या विद्यार्थ्यांसाठी दुपारी २ ते ४ वेळेत अशी दोन सत्रे घेतली जाणार आहेत. त्यामुळे हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी दिशादर्शक ठरणार आहे.

महाविद्यालयांसह इतर अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश मिळविण्यासह दहावी, बारावी, पदवी नंतर शिक्षणाच्या उपलब्ध असलेल्या विविध दालनांची, तसेच पर्यायांची माहिती याशिवाय कला, वाणिज्य, विज्ञान, अभियांत्रिकी, व्यवस्थापन, औषध निर्माणशास्त्र, तंत्रशिक्षण, वैद्यकीय शिक्षण, हॉटेल मॅनेजमेंट, फॅशन डिझायनिंग, कौशल्य शिक्षण, आर्किटेक्चर, माहिती व तंत्रज्ञान यांसह अन्य अभ्यासक्रमांसह परदेशी शिक्षणाच्या उपलब्ध असलेल्या संधींबाबतही सविस्तर माहिती या कार्यक्रमात देण्यात येईल. तसेच विद्यार्थी, युवक-युवती आणि पालक यांच्या प्रश्नोत्तरासाठी विशेष वेळ राखीव ठेवण्यात आली आहे. त्यामुळे अतिशय उत्साहात कार्यक्रम होईल.

तरी गंगाखेड विधानसभा कार्यक्षेत्रातील जास्तीत जास्त विद्यार्थी, युवक-युवती, पालक यांनी कार्यक्रमाचा लाभ घेऊन प्रश्नोत्तरात सहभाग घ्यावा, जेणेकरून आपल्या पाल्यासाठी वेळीच योग्य मार्ग निवडता येईल, असे आवाहन मुख्य आयोजक युवा उद्योजक सुनिल भैय्या गुट्टे यांनी केले आहे.

दरम्यान, नावनोंदणी व अधिक माहितीसाठी कार्यक्रम समन्वयक प्रभाकर सातपुते यांना ९९२१२३७५८५, ८२०८४८०८४६ या मोबाइल क्रमांकावर संपर्क अथवा व्हॉट्सॲप मेसेज करावा, असेही दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here