




मोर्शी तालुका प्रतिनिधी:
छत्रपती शिवाजी महाराजांचा ६ जून १६७४ या दिवशी रायगडावर राज्याभिषेक झाला होता. या महापुरुषाच्या लोककल्याणकारी स्वराज्यातील महत्वाचा दिवस म्हणजेच शिवस्वराज्यभिषेक दिन. हा दिवस स्वराज्याची, सार्वभौमत्वाची, स्वातंत्र्याची प्रेरणा देणारा दिवस आहे. अशा या भूमीपुत्राच्या स्वातंत्र्य दिनाचे महत्व आणखी दृढ होण्यासाठी ६ जून हा दिवस “शिवस्वराज्य दिन” ग्राम पंचायत कार्यालय दापोरी येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
सतराव्या शतकात या महाराष्ट्रात भूमीपुत्रांचे हिंदवी स्वराज्य शिवाजी महाराजांनी स्थापन केले. परकीय आणि स्वकीय अशा जुलमी सत्ताधिशांशी, वतनदारांशी अनेक लढाया, युध्दे लढून या महाराष्ट्र भूमीत स्वराज्याची निर्मिती केली. जुलमी राजवटी संपुष्टात आणण्यासाठी सर्व जातीधर्माच्या अठरापगड बारा बलुतेदार, जिवाभावाचे मावळे एकत्र करुन हा लढा दिला. अनेक किल्ले सर केले. याच दिवशी श्री शिवराज्याभिषेक शकाची निर्मिती करून महाराज शककर्ते ही झाले. तो हा शुभदिन असून महाराजांनी तत्कालीन प्रस्थापित सत्तांना पालथे करून स्वत:च्या सार्वभौम स्वराज्याचा पवित्र मंगलकलश जनतेला अर्पण करुन रयतेची झोळी सुखसमृध्दीने भरली होती आणि याच पवित्र दिवशी शिवकालगणनेला प्रारंभ झाला होता. तो दिवस आता दरवर्षी शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा करण्यात येत असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष तथा ग्राम पंचायत सदस्य रुपेश वाळके यांनी यावेळी केले.
दापोरी ग्राम पंचायत कार्यालयामध्ये सकाळी सर्व पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी यांनी भगव्या स्वराज्यध्वजासह शिवशक राजदंड स्वराज्यगुढी उभारुन त्यास अभिवादन करून राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीताचे गायन करून शिवस्वराज्य दिन मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आला त्यावेळी सरपंच संगीता ठाकरे, उपसरपंच प्रभाकर तायवाडे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षचे तालुका उपाध्यक्ष तथा ग्राम पंचायत सदस्य रुपेश वाळके, ग्राम पंचायत सदस्य शालिनी अंधारे, कामिनी गोळे, वर्षा बिले, सचिन उमाळे, नीलेश अंधारे, वर्षा फलके, राजकुमार कोंडे, मुख्याध्यापक गजानन चौधरी, अंगणवाडी सेविका, अशा वर्कर, विलास वाळके, गोविंद अढाऊ यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवस्वराज्य दिन साजरा करण्यात आला.

