Home सामाजिक  उच्चशिक्षण घेऊनही हाताला काम नाही!-रोजगार निर्मितीकडे लोकप्रतिनिधीचे दुर्लक्ष..?

उच्चशिक्षण घेऊनही हाताला काम नाही!-रोजगार निर्मितीकडे लोकप्रतिनिधीचे दुर्लक्ष..?

48

 

स्पर्धेच्या युगात शिक्षणाला फार महत्व आहे. प्रत्येक पालक आपला पाल्य उच्चशिक्षित व्हावा आणि त्याच्या हाताला काम मिळावे, या आशेवर असतो. तर दुसरीकडे युवक देखील चांगली नोकरी मिळावी यासाठी उच्चशिक्षणाकडे आकर्षित होत आहेत. परिणामी उच्चशिक्षितांचे प्रमाण वाढत चालले आहे. मात्र शिक्षित युवकांच्या हाताला काम मिळत नसल्याने उच्चशिक्षण शाप की वरदान? असा प्रश्न त्यांच्यापुढे निर्माण होत आहे. या गंभीर बाबीकडे आजपावेतो एकाही जनप्रतिनिधीने लक्ष केंद्रीत केले नाही. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भुलथापा किंवा आश्वसना पलीकडे युवकांसह नागरिकांना काहीच मिळत नाही.

स्वातंत्र्याला ७५ वर्षाचा काळ लोटला आहे. स्वातंत्र्यानंतर देशाला शिक्षित बनविण्याचे काम मोठ्या तत्परतेने करण्यात आले. शेतकरी बहुल असलेल्या चिमूर तालुक्यातील बहुतेक भागातही शिक्षणाची दारे उघडली. प्रत्येक पालकांनी आपला मुलगा शिक्षित व्हावा या दृष्टीकोनातून शिक्षणाच्या मंदिरात पाल्यांना पाठविण्याचे काम केले.

कुणी माध्यमिक शिक्षण तर कुणी उच्च माध्यमिक शिक्षण तर काहींनी उच्चशिक्षण घेवून नोकरीसह रोजगाराचे स्वप्न पाहू लागले. उच्चशिक्षित होवुनही हाताला काम मिळणार की नाही? अशी वेळ येणार हे कुणास ठाऊक. हे दिवस अवघ्या स्वातंत्र्याच्या ७५ वर्षात पहावयास मिळु लागले. त्यामुळे सरकारी नोकरी आता केवळ दिवास्वप्न ठरत आहे. दिवसेंदिवस मागासलेल्या चिमुर तालुक्यात बेरोजगारीचे फौज उभी होऊ लागली आहे. त्यामुळे या गंभीर समस्येला घेऊन पालकांसह युवा वर्ग देखील चिंताग्रस्त दिसून येत आहे.

औद्योगीक विकास घडवुन आणण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक महामंडळाची म्हणजेच एमआयडीसीची स्थापना करून फक्त चिमूर, नागभीड येथे प्लॉट पाडलेले आहेत. मात्र या क्षेत्रात युवकांना रोजगार मिळवून देणारी एकही कंपनी तालुक्यात स्थापन झाली नाही.

उच्चशिक्षीत असुनही मुलाच्या हाताला काम नसल्याने रोजगारासाठी युवक भटकंती करीत आहेत. ऐवढेच नव्हे तर अहोरात्र अभ्यास करुनही हाती काहीच लागले नाही. यामुळे उच्चशिक्षीत युवकही आता निराशा व्यक्त करु लागले आहेत. गेल्या अनेक वर्षापासून हव्या त्या प्रमाणात रोजगार निर्मिती झालेली नाही.

परिणामी उच्चशिक्षित असुनही अनेक युवक हाती जे काम मिळेल ते करण्यास तयार दिसुन येत आहेत. ऐवढेच नव्हे तर निराशेपोटी अनेक युवक वाम मार्गाला लागत आहेत. एकंदरीत चिमुर तालुक्यात दिवसेंदिवस शिक्षित युवकांची फौज निर्माण होत आहे. या गंभीर समस्येकडे तालुक्यातील पालक चिंतातुर दिसत असले तरी एकही राजकीय पुढारी याबाबत एक शब्दही बोलताना दिसत नाही. युवकांचा राजकीय कामासाठी वापर करून त्यांना वाऱ्यावर सोडणाऱ्या राजकीय नेत्यांना धडा शिकविण्यासाठी आगामी निवडणुकीचे दृष्टीने विचार व्हावा अशी चर्चा सुरू झाली आहे. *सुयोग सुरेश डांगे, संपादक- साप्ताहिक पुरोगामी एकता मो. 8605592830*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here