Home राजकारण लोकनेते गोपीनाथ मुंडे

लोकनेते गोपीनाथ मुंडे

50

 

कोणताही राजकीय वारसा नसताना, स्वकर्तृत्वाने राजकारणाचे शिखर गाठणारे नेते भारतीय राजकारणात हाताच्या बोटांवर मोजण्याइतकेच असतील यात लोकनेते म्हटले जाणारे एकमेव नेते म्हणजे स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेब. आज ३ जून, आज साहेबांची पुण्यतिथी आजच्याच दिवशी म्हणजे ३ जून २०१४ रोजी साहेब आपल्या लाखो अनुयायांना पोरके करून निघून गेले. १२ डिसेंबर १९४९ रोजी बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील नाथरा गावी एका सामान्य शेतकरी कुटुंबात जमलेल्या गोपीनाथ मुंडे यांच्या वडिलांचे नाव पांडुरंगराव आणि आईचे नाव लिंबाबाई मुंडे असे होते. १९६९ सालीच गोपीनाथ मुंडे यांचे पितृछत्र हरपले. वडीलबंधु पंडितअण्णा यांनी त्यांचे शिक्षण पूर्ण केले. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी ते आंबेजोगाई येथे आले तिथेच त्यांच्यातील नेतृत्व समाजासमोर आले. महाविद्यालयीन निवडणुकीद्वारे त्यांचे नेतृत्व उदयास आले. याच सुमारास त्यांची ओळख भाजप नेते प्रमोद महाजनांशी झाली आणि त्यांच्यात मैत्री निर्माण झाली ही मैत्री पूढे पन्नास वर्षे टिकली. महाजनांनी मुंडे यांच्यातील नेतृत्वगुण हेरून त्यांना अखील भारतीय विद्यार्थी परिषदेशी जोडले. पुढे या जोडीने महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात अनेक आंदोलनात एकत्र भाग घेतला. दोघेही जनसंघाचे पूर्णवेळ कार्यकर्ते बनले. आणीबाणीला विरोध केल्याने गोपीनाथ मुंडे यांना कारावास भोगावा लागला. १९७८ साली मुंडे साहेब जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून निवडून आले त्यानंतर दोन वर्षांनी म्हणजे १९८० साली ते रेणापूर मतदारसंघातून पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही. या दरम्यान त्यांनी भाजपला घराघरात पोहचवण्याचे काम केले. भाजप हा ब्राह्मणांचा पक्ष आहे. ही ओळख खोडून काढण्यासाठी त्यांनी महाराष्ट्रात ‘माधव’ चा प्रयोग केला आणि भाजपला बहुजनांचा पक्ष बनवला. गोपीनाथ मुंडे यांच्या प्रयत्नांमुळेच बहुजनवर्ग भाजपकडे वळला. गोपीनाथ मुंडे हे उत्कृष्ट वक्ते होते. आपल्या धारधार वक्तृत्वाने त्यांनी सभा गाजवायला सुरवात केली. विधिमंडळात असो की विधिमंडळाबाहेर सार्वजनिक सभेत असो मुंडे साहेब आपल्या वक्तृत्वाने श्रोत्यांची मने जिंकत असत. विरोधी पक्षात असूनही महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकप्रिय नेत्यांत त्यांची गणना होऊ लागली. विरोधी पक्षनेते या नात्याने ते सत्ताधाऱ्यांवर तुटून पडायचे. १९९१ ते १९९५ या काळात ते विरोधी पक्षनेते असताना सत्ताधारी कॉंग्रेसपक्षाला त्यांनी सळो की पळो करून सोडले होते. १९९५ साली त्यांनी महाराष्ट्रभर दौरे करून जनमत तयार केले. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळेच १९९५ साली राज्यात युतीचे सरकार आले. या सरकारमध्ये ते उपमुख्यमंत्री बनले शिवाय गृहमंत्रीपदाची जबाबदारी देखील त्यांचावरच होती. गृहमंत्री म्हणूनही त्यांची कारकीर्द गाजली. गृहमंत्री असताना त्यांनी गुन्हेगारांविरुद्ध धडाकेबाज कारवाई केली. पोलिसांना अधिकार दिले. एन्काऊंटर हा शब्द तेंव्हाच रूढ झाला. मुंबईतून गँगवार हद्दपार करण्यासाठी त्यांनी पोलिसांना मोकळीक दिली त्यांच्यामुळेच मुंबईतील गुन्हेगारी टोळ्या नष्ट झाल्या तर काहींनी देशाबाहेर पलायन केले. गोपीनाथ मुंडे हे कुशल प्रशासक तसेच समन्वयक देखील होते भाजप सेना युतीत तणाव निर्माण झाला की ते निवळण्याचे काम गोपीनाथ मुंडेच करायचे. त्यांचे आणि बाळासाहेबांचे खूप जवळचे संबंध होते. पुढे युतीची महायुती करण्याचे कामही त्यांनी केले त्यांच्यामुळेच राजू शेट्टी, रामदास आठवले, महादेव जानकर यासारखे नेते भाजपशी जुळले. २०१४ साली महाराष्ट्रात आणि केंद्रात सत्ता आणण्यासाठी त्यांनी खूप मेहनत घेतली. नरेंद्र मोदींच्या पहिल्या मंत्रिमंडळात ते कॅबिनेट मंत्री बनले. गोपीनाथ मुंडे हे अजातशत्रू व्यक्तिमत्त्व होते. ते भाजपचे असूनही विरोधी पक्षातील नेत्यांशी त्यांचे मैत्रीचे संबंध होते. विलासराव देशमुख आणि छगन भुजबळ यांच्याशी त्यांचे असलेले मैत्रीचे संबंध सर्वश्रुत आहे. २०१४ साली ते जेंव्हा केंद्रात कॅबिनेट मंत्री बनले तेंव्हा संपूर्ण महाराष्ट्राला आनंद झाला मात्र हा आनंद फार काळ टिकू शकला नाही. ३ जून २०१४ रोजी एका अपघातात त्यांचे निधन झाले आणि संपूर्ण महाराष्ट्र शोक सागरात बुडाला. लोकनेते गोपीनाथ मुंडे यांना पुण्यतिथीदिनी विनम्र अभिवादन !

श्याम ठाणेदार दौंड जिल्हा पुणे ९९२२५४६२९५

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here