



उपक्षम रामटेके,(सह संपादक, मो.98909 40507)
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील मूल येथे राज्य परिवहन महामंडळाच्या स्वतंत्र आगार निर्मितीबाबत आवश्यक ती कार्यवाही करावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.
आज सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यासंदर्भात बैठक घेतली. वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार, परिवहन विभागाचे प्रधान सचिव पराग जैन यांच्यासह विभागाचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, विधिमंडळ अधिवेशनाच्या काळात यासंदर्भात राज्य शासनाने सूचना केल्या होत्या. परिवहन विभागाने यातील सर्व बाबी तपासून कार्यवाही करावी, असे सांगितले.
मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितले की, मूल शहर वाढत आहे. त्यामुळे तेथे राज्य परिवहन महामंडळाच्या स्वतंत्र आगाराची आवश्यकता आहे. यासंदर्भात विधिमंडळ अधिवेशनात मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. त्यावेळी राज्य शासनाने सकारात्मक भूमिका घेतली. परिवहन विभागाने तातडीने हा विषय मार्गी लावावा, असे त्यांनी सांगितले.


