Home लेख आत्म कथाकार: दी स्टोरी ऑफ माय लाइफ!

आत्म कथाकार: दी स्टोरी ऑफ माय लाइफ! [डॉ.हेलन केलर पुण्यस्मरण विशेष]

28

 

_डॉ.हेलन ॲडम्स केलर या अमेरिकन लेखिका, सुधारक व प्राध्यापिका होत्या. महाविद्यालयातून पदवीधर होणाऱ्या त्या पहिल्या मूकबधिर व्यक्ती होत्या. हेलन या जन्मजात मूक बधीर नव्हत्या. लोहितांग ज्वर- स्कार्लेट फीव्हर किंवा मस्तिष्कावरण ज्वर- मेनिंजायटिस प्रादुर्भावानंतर त्या अंध आणि बधिर झाल्या. अधिक माहितीसाठी श्री. एन. के. कुमार यांचा हा लेख वाचाच… संपादक._

डॉ.हेलन केलर यांनी बारा पुस्तके आणि अनेक लेख लिहिले आहेत. वयाच्या अकराव्या वर्षी त्यांनी दी फ्रॉस्ट किंग हे पुस्तक इ.स. १८८१ साली लिहिले. मात्र या कथेवर साहित्य चोरीचा आरोप झाला होता. ती कथा दी फ्राॅस्ट फेअरीज या मार्गरेट कॅनबी यांच्या पुस्तकातून घेतली होती. पुढे संशोधनांती कळाले की केलर यांना अर्धचेतनस्मृती झाली होती, म्हणजेच की त्यांना कॅनबी यांची कथा ऐकवली गेली होती. ती त्यांच्या अंतर्मनामध्ये राहिली होती. वयाच्या बाविसव्या वर्षी त्यांनी स्वतःची आत्मकथा दी स्टोरी ऑफ माय लाइफ ही सॅलिव्हन आणि त्यांचे पती जॉन मेसी यांच्या साहाय्याने लिहिली. ही आत्मकथा त्यांच्या वयाच्या २१ वर्षे पर्यंतच्या महाविद्यालयाच्या काळातील असून ती त्यांच्या स्वतःच्या शब्दांत लिहिली आहे. केलर यांनी दी वर्ल्ड आय लिव्ह इन हे पुस्तक इ.स.१९०८ साली प्रकाशित केले. या पुस्तकातून जगाबद्दल काय वाटते हे सांगितले आहे. त्यांची आऊट ऑफ दी डार्क ही सामाजिक विषयांवरील निबंधांची मालिका इ.स.१९१३मध्ये प्रकाशित केली.
डॉ.हेलन केलर यांचा जन्म दि. २७ जून १८८०मध्ये टस्कंबिया, अलाबामा येथे झाला. त्यांच्या आजोबांनी काही दशकांपूर्वी बांधलेल्या एव्ही ग्रीन या घरात त्यांचे कुटुंब राहत होते. हेलनच्या आईचे नाव केट ॲडम्स होते. हेलनच्या वडिलांनी बरीच वर्षे ‘टस्कंबिया नॉर्थ अलबमियन’चे संपादन केले व नंतर काही दिवस ते सांघिक राज्य सेनेचे कप्‍तान होते. हेलनची आजी ही रॉबर्ट ई ली यांची बहीण होती. हेलनची आई केट ही चार्लस ॲडम्स यांची मुलगी होती. हेलनच्या पूर्वजांपैकी एक जण हे झूरिचमध्ये मूक बधिरांसाठीचे पहिले शिक्षक होते. मे १८८८मध्ये केलर यांनी अंधांसांठी पर्किनस संस्थेत प्रवेश घेतला. इ.स.१८९४मध्ये त्यांनी आणि ॲन सॅलिव्हन यांनी न्यूयॉर्कमधल्या बधिरांसाठीच्या राइट ह्यूमसन शाळेत प्रवेश घेतला. तेथे सारा फुलर यांच्याकडून शिक्षण घेतले. सन १८९६मध्ये त्या मॅसेच्युसेट्सला परतल्या. केलर यांनी महिलांसाठीच्या केंब्रिज शाळेत प्रवेश घेतला आणि सन १९००मध्ये त्या रॅडक्लिफ कॉलेजला गेल्या व तेथे त्या ब्रिग्स हॉल, साऊथ हाऊसमध्ये राहिल्या. त्यांचे प्रशंसक मार्क ट्वेन यांनी त्यांची ओळख हेन्री हटलस्टन यांच्याशी करून दिली. त्यांनी व त्यांच्या पत्‍नी एबी यांनी केलर यांच्या शिक्षणाचे पैसे भरले. जेव्हा डॉ.केलरनी जुलै १९३७ साली जपानमध्ये अकीता परगण्याला भेट दिली, तेव्हा त्यांनी हाचीको या इ.स.१९३५ साली वारलेल्या प्रसिद्ध अकीता कुत्र्याबद्दल चौकशी केली. तिने एका जपानी माणसाला सांगितले, की तिलाही तसे कुत्रे हवे आहे; तिला महिन्याभरातच कामिकाझे-गो नावाचा एक कुत्रा देण्यात आला, पण तो विषाणुजन्य रोगाने मेला. जुलै १९३८मध्ये जपानी सरकारने कामिकाझे-गोचा थोरला भाऊ केंझन-गो नावाचा आणखी एक कुत्रा त्यांना भेट म्हणून दिला. हेलर यांनी नेलेल्या या कुत्र्यांमुळे अमेरिकेत अकीता कुत्र्यांबद्दल जागरूकता निर्माण झाली.
ॲनी मेन्सफील्ड सॅलिव्हन यांचे सहकार्य हेलन केलर यांच्या जीवनात लाभले. हेलनचे शिक्षण झाल्यानंतरही त्या तिच्याबरोबर काही काळ राहिल्या. ॲन यांचा विवाह जॉन मेसी यांच्याशी इ.स.१९०५ साली झाला. त्यांची तब्येत इ.स.१९१४ नंतर उतरत गेली. ॲन सॅलिव्हन यांचा मृत्यू सन १९३६ साली झाला. त्यापूर्वी त्या कोमात होत्या. मृत्यूसमयी त्यांचा हात केलर यांच्या हातात होता. त्यांच्या मृत्यूनंतर थाँप्सन आणि केलर या दोघी कनेक्टिकट येथे निवास करू लागल्या. पॉली थाँप्सन यांना हेलनच्या घराची काळजी घेण्यासाठी नेमले होते. मूकबधिर लोकांबरोबर संवाद साधण्याचा अनुभव नसलेल्या अशा त्या एक साधारण तरुणी होत्या. हेलन त्यानंतर ॲन आणि जॉन या दोन्ही सहकाऱ्यांबरोबर फॉरेस्ट हिल्स, क्वीन्स येथे राहण्यास गेल्या व त्यांनी तिथून अमेरिकन फाऊंडेशन फॉर दी ब्लाईंड सुरू केले. सन १९५७ साली थाँप्सनला हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांची तब्येत खालावली. सन १९६० साली त्यांचा मृत्यू झाला. इ.स.१९६१मध्ये हेलन केलर यांना हृदयविकाराचा झटका आला. शेवटच्या दिवसात त्या त्यांच्या घरातच होत्या. दि.१४ सप्टेंबर १९६४ रोजी राष्ट्रपती लिंडन बी.जॉन्सन यांनी हेलन केलर यांना अमेरिकेमधील सर्वश्रेष्ठ नागरी सन्मान असलेले प्रेसिडेन्शियल मेडल ऑफ फ्रीडम दिले. इ.स.१९६५मध्ये त्यांची नॅशनल वीमेन्स हॉल ऑफ फेममध्ये निवड झाली. केलर यांनी नंतरचे आयुष्य अमेरिकन फाऊंडेशन या अंध लोकांच्या संघटनेसाठी निधी जमवण्यात खर्ची घातले. दि.१ जून १९६८च्या रात्री आर्कन रीज, ईस्टर्न, कनेक्टिकट येथील घरात झोपेतच त्यांचा मृत्यू झाला.
!! पुरोगामी संदेश परिवारातर्फे स्मृतिदिनी त्यांना व त्यांच्या समाजसुधारक कार्यांना विनम्र अभिवादन !!


श्री. एन. के. कुमार से.नि.अध्यापक.
गडचिरोली, भ्र. ध्व. ७७७५०४१०८६.

Previous articleनव्या युगाची वटपौर्णिमा हातात स्मार्ट मोबाईल असणाऱ्या महिलांना जाहीर आव्हान
Next articleश्री संत रोहिदास दिंडी क्र. २४ या दिंडीचे आषाढी एकादशी निमित्त मुंबईहून ते पंढरपुरकडे पायी प्रस्थान माझ्या वडिलांची मिराशी गा देवा। तुझी चरणसेवा पांडुरंगा ॥ !! जय जय राम कृष्ण हरि !!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here