Home लेख कष्टकरी श्रमिकांचा जेष्ठ सहकारी: कॉ. मार्शल भाऊ संसारे

कष्टकरी श्रमिकांचा जेष्ठ सहकारी: कॉ. मार्शल भाऊ संसारे

117

 

क्रांतिकारी विचारांचा कोणताही वारसा नसतांना स्वतःच्या हिमतीवर आणि भि. र. बावके यांच्या सहकार्याने शेतकरी, कष्टकरी आणि तमाम नाही रे वर्गाचा आधारवड बनलेला आमचा कॉम्रेड 22 वर्षांपूर्वी शांत झाला.
या बावीस वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांच्या नंतर चळवळीतील एकही दिवस असा गेला नसेल की त्यांची आठवण कोणी काढली नसेल. कष्टकरी श्रमिक आणि शेतमजूर यांच्यासाठी उभे आयुष्यपणाला लावून लढणारा क्रांतिकारी कॉम्रेड म्हणजे कॉ. मार्शल भाऊ संसारे…. मार्शल भाऊ चा आवाज ऐकला की तमाम शेतकरी, कष्टकरी एकजुटीने त्यांच्या हाकेला ओ देत, पाहिजे त्या ठिकाणी हजर राहात आणि त्यांच्या लढ्याला बळ देत.
हा लढा मुळातच कष्टकरी,श्रमिक आणि शेतमजुरांसाठी असल्याने त्यासाठी वेगळ्या अवतनांची गरज त्यांना पडत नसे. आणि म्हणूनच त्यांनी उभे केलेले अनेक लढे,चळवळी,आंदोलने यशस्वी झालेले दिसून येतात. आज सुखा समाधानने शेती कसत असलेल्या शेतमजुरांना त्यांची आठवण निश्चितच येतं असेल. ज्या शेतामध्ये पूर्वीची पिढी मजूर म्हणून राबली,त्या शेतात आज त्यांच्या कुटुंबातील मुलं स्वतःची म्हणून शेती करत आहेत. हा लढा यशस्वी होण्यासाठी कॉम्रेड भि.र. बावके यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक आंदोलन या सर्वांनी केलें.त्यांचेच फळ म्हणुन किमान कसण्यासाठी तरी जमीन त्यांना अधिग्रहित झाली आहे.
कॉम्रेड मार्शल संसारे म्हणजे एक दिलखुलास व्यक्तिमत्व. चळवळीतील अनेकांना घरी बोलावून आहे ती चटणी भाकर खाऊ घालुन विचारांचे चार शब्द पेरीत राहाणारा हा माणूस….तसा लवकरच गेला. त्यामुळे चळवळी सोबतच कुटुंबीयांचा आधारवड संपला.
रस्त्यावर उतरून आंदोलन करणारे आता फारच कमी लोक राहिलेले असुन अशावेळी कॉ मार्शल भाऊ संसारे यांची आठवण कार्यकर्ते नेहमीच काढत असतात. काहीं दिवसापूर्वी ॲड. सुभाष लांडे पाटील, ॲड. बंशी सातपुते आणि ॲड सुधीर टोकेकर नगर वरून येऊन गळनिंब ता. श्रीरामपूर येथील आजारी असणाऱ्या राष्ट्रपती पदक प्राप्त कॉ. पांडुरंग शिंदे यांना भेटायला निघाले होतें. सायंकाळ पाच नंतरची वेळ असल्याने त्यांनी मला संपर्क केला आणि मी पण त्यांच्यात सामिल झालो. प्रवास सुरू झाला.आम्हीं सर्व एकत्रपणे या भागात मा.श्री.अरुण कडू पाटील हे जेव्हां खासदारकी साठी कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार होतें त्यावेळीं फिरलेलो होतो. तेंव्हा मुक्कामी श्रीरामपूर येथील चटई च्या असणाऱ्या लाल बावटा कामगार युनियन च्या कार्यालयांत असत. त्या ठिकाणी कॉ.मार्शल भाऊ संसारे असत.आणि नियोजनाचा महत्वाचा भाग ते सांभाळत असत. कोणत्या गावात कोणत्या कार्यकर्त्याला भेटायचं याची यादीच ते तयार करून देत. त्यावेळचे त्यांचें सहकारी कोल्हार येथील कॉ. एल. पी. दातिर, कॉ. भीमाशंकर पानसरे, कॉ पांडुरंग शिंदे, कॉ. श्रीधर आदिक सर्वच माणसं आपला विचार पुढे नेण्यासाठी प्रयत्नशील असत. स्वत:चा कोणताही विचार न करता केवळ संघटना, पक्ष, विचार प्रणाली याचाच विचार ती मंडळी करत असत.प्रचाराच्या फेरीत अनेकदा सायंकाळच्या वेळी देवळाली प्रवरा येथील संसारे वस्तीवर आंबी स्टोअर वर जात असत. कॉ मार्शल भाऊ संसारे घरी आल्यावर सर्वांची जेवणाची व्यवस्था करायला सांगत. ऐनवेळी घरच्यांची विशेषता: बाईंची धावपळ होई. पण कधी त्यांनी कुरकुर केली नाहीं. त्यांचं घर म्हणजेच शेतकरी,कष्टकरी चळवळीच केंद्रच जणु. कॉम्रेड सुभाष लांडे यांच्या या आठवणी जागृत झाल्या आणि येताना त्या वस्तीवर भेट द्यायचं ठरलं पण उशीर झाल्याने ते शक्य झालं नाही. असो.
आता त्यांचे चिरंजीव कॉम्रेड शरद संसारे शेतमजूर, कष्टकरी, श्रमिकांच्या चळवळीमध्ये कार्यरत आहेत. या नाही रे वर्गाला आधार देण्याचं काम ते आता करत आहेत.
आज धावपळीच्या युगामध्ये
दुसऱ्यांना देण्यासाठी कोणाकडेही वेळ नाही आणि दुसऱ्याचे अश्रू पुसण्याचेही कष्ट कोणी घेत नाही, अशावेळी कॉ. मार्शल भाऊ संसारे यांच्या विचाराची ज्योत पेटती ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. कॉ. मार्शल भाऊ संसारे यांना लाल सलाम!
सुनील गोसावी,
संस्थापक, सचिव,
शब्दगंध साहित्यिक परिषद, महाराष्ट्र राज्य मो. 99210 09750

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here