



अनिल साळवे, प्रतिनिधी
गंगाखेड (प्रतिनिधी) :-
नुकतीच झालेली कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक फार निर्णायक ठरली होती. आरोप-प्रत्यारोपाच्या फैरीने वातावरण चांगले तापले होते. अटीतटीच्या त्या निवडणुकीत विद्यमान आ.डॉ.रत्नाकर गुट्टे आणि महाविकास आघाडी अशी सरळ लढत झाली होती. त्यात महाविकास आघाडीने बाजी मारली होती. त्यामुळे भाजप, शिवसेना, मित्र मंडळ पुरस्कृत आ.डॉ.गुट्टे समर्थक पॅनलला केवळ ८ जागांवर समाधान मानावे लागले होते. तर राष्ट्रवादी, काँग्रेस, ठाकरे गट पुरस्कृत माजी आ.डॉ.केंद्रे समर्थक महाविकास आघाडी पॅनलला स्पष्ट बहुमत मिळाले होते. त्यामुळे डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात विजयी सभा सुध्दा झाली होती.
मात्र, सभापती निवड वेळी अतिशय चाणक्षपणे विरोधी गटातील ३ संचालकांना आपल्या गोटात वळविण्यात आ.डॉ.गुट्टे यांना यश आले आहे. त्यामुळे साहेबराव भोसले सभापती तर संभाजीराव पोले यांची उपसभापती म्हणून निवड झाली आहे. तालुक्यातील या राजकीय खेळीमुळे विरोधकांना आ.डॉ.गुट्टे यांनी ‘दे धक्का’ केले आहे. तसेच महाविकास आघाडीची ‘वज्रमूठ’ खिळखिळी केली आहे. विरोधी गटात सभापती उपसभापती कोण होणार? याच्या बैठकांचा जोर सुरू असताना चाणाक्षपणे आ.डॉ.गुट्टे यांनी साहेबराव भोसले, सुशांत चौधरी, मनीकर्णिकाबाई घोगरे यांना आपल्या गटात समील करून माजी आ.डॉ.केंद्रे यांच्या मनसुबे उधळवून लावले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीच्या गोटात कमालीची शांतता पसरली आहे. परिणामी, आ.डॉ.गुट्टे यांनी जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात बेरजेच्या राजकारणाचे उदाहरण घालून दिले आहे.
निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर तालुक्यातील राजकीय जाणकारांनी आ.डॉ.गुट्टे सभापती ठरवतील, असे भाकीत केले होते. मात्र, माजी आ.डॉ.केंद्रे गाफील राहातील, असे कोणालाही वाटले नव्हते. शेवटी आ.डॉ.गुट्टे यांना राष्ट्रवादीच्या घडळ्याचे काटे बंद पाडले आहेत. त्यामुळे आगामी नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी वचपा काढण्यासाठी नवी रणनीती आखण्याची शक्यता आहे.
आ.डॉ.गुट्टे यांनी टाकलेला डाव यशस्वी झाल्यामुळे आनंदीत झालेल्या गुट्टे समर्थकांनी विजयी पदयात्रा काढून गुलालाची उधळण केली. यावेळी आ.डॉ.गुट्टे यांच्यासह नवनिर्वाचित सभापती, उपसभापती, सर्व संचालक, राष्ट्रीय समाज पक्ष, आ.डॉ.रत्नार गुट्टे काका मित्र मंडळाचे सर्व पदाधिकारी, आजी-माजी लोकप्रतिनिधी, सरपंच, सदस्य, शेतकरी, व्यापारी आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, आ.डॉ.गुट्टे यांची हि खेळी सोशल माध्यमांमुळे सर्वत्र पसरली आहे. त्यामुळे किंगमेकर, जांयट किलर, आमचा नेता पवारफुल्ल, तुम्ही नादच केलाय थेट, सरकार तुम्ही केलंय मार्केट जाम, आपला हात भारी अशी आशय असणारे रिल्स, मिम्स, स्टेटस, पोस्ट व्हायरल होत आहेत.
महाविकास आघाडीत ‘शुकशुकाट’
आ.डॉ.गुट्टे यांना राजकीय दणका दिल्याने महाविकास आघाडीची अवस्था ‘गड आला पण सिंह गेला’ अशी झाली आहे. त्यामुळे माजी आ.डॉ.केंद्रे यांच्या कार्यालयासह महाविकास आघाडीच्या गोटात शुकशुकाट निर्माण झाला आहे.


