Home चंद्रपूर शेतकऱ्यांसाठी ‘ढेंन्चा’ हिरवळीचे खत-बियाणे 75 टक्के अनुदानावर उपलब्ध

शेतकऱ्यांसाठी ‘ढेंन्चा’ हिरवळीचे खत-बियाणे 75 टक्के अनुदानावर उपलब्ध

68

उपक्षम रामटेके, (सह संपादक, मो. 98909 40507)
चंद्रपूर, दि. 22: खरीप हंगाम 2023 ला सुरुवात झाली असून जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत ढेंन्चा हे हिरवळीचे खत बियाणे 75 टक्के अनुदानावर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करण्यात आले आहे. या योजनेअंतर्गत प्रति शेतकरी 40 किलो (दोन बॅग) ढेंन्चा बियाणे देण्यात येणार आहे. याची मुळ किंमत 2800 रुपये असून 75 टक्के (2100रु.) अनुदान वजा करता शेतकऱ्यांनी 25 टक्के रक्कम म्हणजेच 700 रुपये वर्गणी कृषी विभाग, पंचायत समिती, यांच्याकडे जमा करून सदर बियाणे प्राप्त करून घ्यावे.
ढेंन्चा या द्विदल पिकाचे उत्पादन भात शेतीमध्ये पानथळ, क्षारयुक्त, चोपन तसेच आम्लयुक्त हलक्या अथवा भारी अशा विविध पिकांच्या जमिनीमध्ये घेता येते.
ढेंन्चा लागवड तंत्र: खोल नांगरणी करून वखाराच्या उभ्या आडव्या पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी. चांगला पाऊस पडल्यावर पेरणी करावी. सरत्यानी पेरणी करतांना ढेंन्चा बियाणात माती किंवा रेती मिसळावी. दोन ओळीतील अंतर 30 सें.मी. ठेवावे. हेक्टरी 25 ते 30 किलो बियाणांचा वापर करावा. सेंद्रिय पद्धतीमध्ये रासायनिक खताचा वापर व आंतरमशागत करू नये. पेरणीनंतर 40 ते 45 दिवसात पिकांची 100 ते 125 सें.मी. उंच वाढ झाल्यावर फुले येण्यापूर्वी नांगराच्या सहाय्याने जमिनीत गाडावे.
हिरवळीच्या खताचे फायदे: जमिनीतील सेंद्रिय पदार्थाचे प्रमाण आणि सूक्ष्मजीवांच्या क्रियांची गती वाढते. जलसंधारण क्षमता वाढते, व जमिनीची धूप कमी होते. मातीच्या रचनेत सुयोग्य बदल होतात. हिरवळीचे खत जमिनीच्या खालच्या थरात निघून जाणाऱ्या अन्नद्रव्यांना धरून ठेवण्यास मदत करतात. तसेच नत्रासोबत स्फुरद, पालाश, कॅल्शियम, मॅग्नेशियम व लोहाची उपलब्धता वाढवते. नजीकच्या 3 ते 4 दिवसात चंद्रपूर,महाबीजकडून ढेंन्चा बियाणे पंचायत समितीस्तरावर उपलब्ध होणार आहे.
तरी, जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आपल्या नजीकच्या पंचायत समिती, कृषी विभागाकडून ढेंन्चा बियाणे प्राप्त करून लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांनी केले आहे.

Previous articleसिरोंचातील ‘तांदूळ माफिया’ला आवर कोण घालणार ? – बोगस भरडाई दाखवून शासनाला कोट्यवधींचा चुना
Next articleबाह्ययंत्रणे मार्फत मनुष्यबळ पुरवठ्याने राष्ट्रीय ट्रेंड युनियनचे केले वस्त्रहरण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here