Home महाराष्ट्र जागतिक कासव दिन

जागतिक कासव दिन

58

*२३ मे हा दिवस संपूर्ण जगात जागतिक कासव दिन म्हणून साजरा केला जातो. १९९० पासून हा दिवस संपूर्ण जगात साजरा केला जातो. आपल्या संस्कृतीत कासवाला खूप मानाचे स्थान आहे. हिंदू संस्कृतीत तर कासवाला देवाचे रूप मानले जाते. हिंदू धर्माच्या मंदिराच्या बाहेर तर कासवाची प्रतिकृती आवर्जून असते. देवाचे दर्शन घेण्याआधी भाविक कासवाचे दर्शन घेतात. आपले पूर्वज कासवाचा सांभाळ करत असत. प्रत्येक नदी, विहीर, बारव तलावात कासव वास्तवात असे, पण आज कासवाचे अस्तित्व पणाला लागले आहे. कारण शिकार, व्यापार आणि पाण्याच्या अभावामुळे कासवाचे अस्तित्व पणाला लागले आहे. अनेक दुर्मिळ जातींच्या कासवांचे अस्तित्व नष्ट झाले आहे. आज गोड्या पाण्यातून तर कासवे हद्दपारच झाले आहेत. कासवांचे अस्तित्व आता फक्त समुद्रातच पाहायला मिळते. कासव हा उभयचर प्राणी आहे. पाणी आणि जमीन अशा दोन्ही ठिकाणी कासव राहू शकतो. कासवाचे पोट आणि पाठ खूप टणक असते. समुद्रात राहणाऱ्या कासवाचे सात प्रकार आहेत त्यापैकी भारतात चार प्रकार पाहायला मिळतात. ऑलिव्ह रिडले कासव, ग्रीन टर्टल, हॉक्स बिल टर्टल आणि आणि सागरी कासव हे ते चार प्रकार आहेत. ऑलिव्ह रिडले कासव हे तपकिरी रंगाचे असून ते महाराष्ट्र आणि ओरिसाच्या समुद्रकिनाऱ्यावर आढळतात. ग्रीन टर्टल कासव म्हणजे हिरव्या रंगाचे कासव हे पूर्व आणि पश्चिम किनाऱ्यावर आढळतात. हॉक्स बिल टर्टल म्हणजे चोची सारखे तोंड असलेले कासव अंदमान निकोबारच्या बेटावर आढळतात तर सागरी कासव हे सर्व समुद्रात आढळतात. समुद्रातील कासवांची देखील आता मोठ्या प्रमाणात शिकार होऊ लागली आहे. कासवांच्या पाठीचा दागिन्यांसाठी वापर केला जातो. तसेच कासवांच्या पाठिपासून ढालीही बनवल्या जातात. चामड्याच्या तसेच शोभेच्या वस्तू बनवण्यासाठी कासवांच्या त्वचेचा वापर केला जातो. काहीजण आपल्या घरात शोभेसाठी कासव पाळतात. या सर्व कारणांनी कासवांची शिकार होते. कासवांची शिकार बेकायदेशीर असूनही कासवांची शिकार होते हे विशेष. कासवांचे संवर्धन करण्यासाठी वेळास येथे कासव संवर्धन केंद्र उभारण्यात आले आहे. वेळास येथे दरवर्षी कासव महोत्सवही आयोजित केला जातो. सिंधुदुर्ग जिल्ह्यात ऑलिव्ह रिडले कासवांचे प्रजनन आणि संवर्धन होते. कासवांचे आयुष्य १०० ते १५० वर्ष इतके असते. मात्र शिकारीमुळे अनेक कासवे अकालीच मरण पावतात. कासवांचे अस्तित्व जमीन आणि पाण्यातील जीवनसाखळीसाठी अत्यंत महत्वाचे आहे. कासवांचे अस्तित्व टिकणे ही काळाची गरज आहे. जर पृथ्वीवरून कासवांचे अस्तित्व नष्ट झाले तर त्याचा पर्यावरणावर मोठा परिणाम होऊ शकतो. कासव हा वन्यजीव असल्याने त्याला घरात बंदिस्त करणे, त्याची हत्या करणे, शिकार करणे हे वन्यजीव कायद्यानुसार गुन्हे आहेत त्यामुळे असे गुन्हे करताना कोणी आढळल्यास त्याची पोलिसांकडे तक्रार करणे हे देशातील नागरिकांचे कर्तव्य आहे. कायद्याचे अस्तित्व टिकवण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणे, कासवांचे संरक्षण आणि संवर्धन करणे हाच जागतिक कासव दिन साजरा करण्यामागचा उद्देश आहे. हा उदेश यशस्वी व्हावा असे वाटत असेल तर प्रत्येकाने कासवांचे संरक्षण आणि संवर्धन करायला हवे.

श्याम ठाणेदार, दौंड जिल्हा पुणे ९९२२५४६२९५

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here