बीड जिल्हा प्रतिनिधी – नवनाथ आडे,9075913114
शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु त्यांच्या या निर्णयाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोरदार विरोध केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना यावेळी अश्रू अनावर झाले. मुंबईतील वाय बी सेंटरमधील सभागृहात कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करुन निवृत्तीचा निर्णय मागे घेण्याची विनंती केली. यावेळी सभागृहात एकच गोंधळ पाहायला मिळाला. विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना आवरण्याचा प्रयत्न केला. आपापल्या जागेवर बसण्याचं आवाहन केलं. परंतु कोणीही मंचावरुन खाली उतरण्यास नकार देत तिथेच ठाण मांडून बसले.
शरद पवारांचं आत्मचरित्र ‘लोक माझे सांगाती’ च्या सुधारीत आवृत्तीचे आज प्रकाशन झालं. त्यावेळी बोलताना शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होत असल्याची घोषणा केली. “संघटनेबाबत पुढे काय करायचं याबाबत मी एक समिती स्थापन करणार असून यात सदस्य निर्णय घेतील, असं शरद पवार यांनी सांगितलं.
शरद पवार काय म्हणाले?
________________________________
“24 वर्षे मी पक्षाचा अध्यक्ष म्हणून काम करतोय. कुठेतरी थांबायचा विचार सुद्धा केला पाहिजे. माणसाला अधिक मोह असू नये. तुम्हाला अस्वस्थता कदाचित वाटेल. पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त व्हायचा निर्णय मी आज घेतला आहे,” असं शरद पवार यांनी म्हणाले. तसंच “मी कुठेही असलो तरी सकाळपासून संध्याकाळपर्यंत मी उपलब्ध राहिन हे आश्वस्त करतो. जनतेचे प्रेम आणि विश्वास हाच माझा श्वास आहे,” असं शरद पवार यांनी सांगितलं.
आताच निवृत्तीचा निर्णय मागे घ्या : कार्यकर्त्यांसह प्रमुख नेत्यांची विनंती
________________________________
दरम्यान, शरद पवार यांच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. शरद पवार यांनी निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी कार्यकर्त्यांकडून केली जात आहे. महाराष्ट्राचा बुलंद आवाज, शरद पवार, शरद पवार अशी घोषणाबाजी यावेळी करण्यात आली. यावेळी कार्यक्रत्यांना अश्रू देखील अनावर झाले. इतकंच नाही तर धनंजय मुंडे यांनी शरद पवार यांच्या पाया पडून निवृत्तीचा निर्णय मागे घेण्याची विनंती केली. याशिवाय ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनीही आमच्या भावना लक्षात घेऊन आताच निवृत्तीचा निर्णय मागे घ्यावा अशी विनंती केली.




