✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)
चिमूर(दि.9एप्रिल):-कश्यप वंशीय बारई समाज हा ओबीसी प्रवर्गात येत असून हा समाज आर्थिक, सामाजिक, राजकीयदृष्ट्या वंचित घटक आहे. शासन व प्रशासन ओबीसी समाजाची जातीनिहाय जनगणना करण्यास टाळाटाळ करीत आहे. त्यामुळे बारई समाजासह संपूर्ण ओबीसी समूहाला घटनात्मक अधिकार मिळत नाहीत. त्यामुळे आपल्या समस्या सोडविण्याकरीता ओबीसी चळवळीत सक्रीय होवून संघटीतरित्या संघर्ष करणे आवश्यक असल्याचे मत प्रा. राम राऊत यांनी व्यक्त केले.
श्री वखागुरु गुरुजी महाराज देवस्थान लोकार्पण सोहळ्यात चिमूर येथील केसलापूर तांडा परिसरात आयोजीत कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून प्रा. राम राऊत बोलत होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन चिमुर विधानसभा क्षेत्राचे आमदार बंटी भांगडीया यांचे हस्ते करण्यात आले.
यावेळी उद्घाटकीय भाषण करताना आ. भांगडीया म्हणाले, बारई समाज हा हिंदु धर्माचा महत्वाचा घटक आहे. या समाजाची प्रगती होणे आवश्यक आहे. सामाजिक एकता जोपासण्याकरीता माणुसकी जिवंत असणे आवश्यक आहे असे सांगुन त्यांनी उमा नदीचे पुलापासून देवस्थानपर्यंत सिमेंट काँक्रीटचा रस्ता एक वर्षाचा आत तयार करून देण्याचे आश्वासन दिले.
यावेळी मंचावर बारई समाज चिमुरचे अध्यक्ष सतीश वनकर, सुरेश गोहणे, गजानन गोरे, शामराव वालजुकर, गजानन बोरने, श्रीराम भंडारी, किशोर भोज, मनोहर रायपुरकर, नरेंद्र स्वान, सौरभ पतरंगे, जीवन पतरंगे, दत्तु पतरंगे, रमेश वनकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी देवस्थान बांधकामाकरिता १ लाख रुपये व बांधकाम दरम्यान नियमित श्रमदान करणारे दत्तु पतरंगे यांचा सत्कार करण्यात आला. दरम्यान बारई समाजाच्या वतीने वखागुरु गुरुजी महाराज व शहीद बालाजी रायपुरकर यांच्या प्रतिमेसह चिमूर शहरात भव्य शोभायात्रा काढण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन झुरमुरे गुरुजी, प्रास्ताविक मंगेश सहारे यांनी केले. तर उपस्थितांचे आभार मिलिंद मिसार यांनी मानले. कार्यक्रमाला बारई समाजातील महिला व पुरुष बहुसंख्येने उपस्थित होते.




