Home महाराष्ट्र अमरावती जिल्ह्यातील शेतकर्‍यांना दिवसा १२ तास वीज केव्हा मिळणार ?

अमरावती जिल्ह्यातील शेतकर्‍यांना दिवसा १२ तास वीज केव्हा मिळणार ?

200

🔹मुख्यमंत्री साहेब, शेतीसाठी रात्रीची नको पण दिवसा वीज देता का ?

✒️मोर्शी(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

मोर्शी(दि.8जानेवारी):-विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर व भंडारा या जिल्ह्यांमध्ये शेतकर्‍यांना कृषिपंपासाठी दिवसा १२ तास थ्री फेज वीजपुरवठा करण्याबाबत निर्णय घेतला असून विक्रमी संत्रा उत्पादनासाठी प्रसिद्ध असणाऱ्या अमरावती जिल्ह्याला या निर्णयातून वगळल्यामुळे अमरावती जिल्ह्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांवर अन्याय करण्यात आला आहे. बाकी जिल्ह्यांप्रमाणे अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिवसा १२ तास थ्री फेज वीज देण्याचा निर्णय शासनाने तत्काळ घ्यावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष तथा ग्राम पंचायत सदस्य रुपेश वाळके यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पठऊन केली आहे.

अमरावती जिल्ह्यातील मोर्शी वरूड चंदुर बाजार, अचलपूर, चिखलदरा, धारणी तालुक्याचा संपूर्ण भाग हा सातपुडा पर्वताला लागून असून अमरावती जिल्ह्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळेस शेतात काम करताना वन्यप्राण्यांचा धोका उद्भवतो. यावर्षी जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे. आता वीज दिवसा मिळत नसल्याने बहुतांश शेतकरी संकटात आहेत. यावर्षी अमरावती जिल्ह्यात अतिवृष्टीने मोठ्या प्रमाणात संत्रा, मोसंबी, सोयाबीन, कापूस, तूर, यासह इतर पिकांचे नुकसान झालेले आहे. नुकसान भरपाई काढण्याकरिता संत्रा पीक, तसेच कापूस, गहू, भाजीपाला पिकाला नियमित ओलित होणे आवश्यक आहे.

मोर्शी वरुड तालुका आधीच ड्राय झोन मध्ये असून पाण्याची पातळी १००० ते १५०० फूट खोलीवर गेली असल्यामुळे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना पाण्यासाठी भटकावे लागत आहे , पावसाचे प्रमाण कमी झाल्याने पिकांना पाण्याची चांगलीच कमतरता भासत आहे. अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांना महावितरण कंपनीने रात्रीच्या सुमारास वीज पुरवठा सुरु केल्याने शेतकरी त्रस्त झाले असून वाघ, बिबट्या, रानडुकरे आदी जंगली प्राणी व तत्सम संकटामुळे शेतकरी हैराण झाला आहे. ही सर्व परिस्थिती लक्षात घेता कृषी पंपासाठी दिवसा १२ तास वीज पुरवठा करण्याची मागणी ग्राम पंचायत सदस्य रुपेश वाळके यांनी शासनाकडे केली आहे.

अमरावती जिल्ह्याचा जास्तीत जास्त भाग हा सातपुडा पर्वताला लागून असल्यामुळे रात्रीच्या वेळेस ओलित करताना वन्यप्राण्यांचा धोका मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे विदर्भातील ५ जिल्ह्यांप्रमाणे अमरावती जिल्ह्याचा समावेश केल्यास निश्‍चितच शेतकर्‍यांना फायदा होईल. त्यामुळे अमरावती जिल्ह्यातील कृषिपंपांना दिवसा 12 तास थ्री फेज वीज पुरवठा करण्याबाबत राज्य सरकारने तत्काळ निर्णय घेऊन अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा द्यावा.– रुपेश वाळके ग्राम पंचायत सदस्य.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here