Home महाराष्ट्र निवडणूक हरले पण वचननामा नाही विसरले

निवडणूक हरले पण वचननामा नाही विसरले

234

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी,म्हसवड)मो:-9075686100

म्हसवड(दि.5जानेवारी):-नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत अनेक उलटफेर पाहायला मिळाले,बऱ्याच ठिकाणी नैसर्गिक तर अनेक ठिकाणी अनैसर्गिक युत्या होऊन मोडतोडीच्या सत्ता स्थापन झाल्या. प्रत्येक पॅनल ने आपले उमेदवार अन जाहीरनामा उत्साहात जाहीर केला होता. तसं पाहता सत्ता आल्यावर जाहीरनामा पूर्ण केलेला क्वचित पाहायला मिळतो, पण माण तालुक्यात एका गावात अलिखित राजकीय परंपरांना छेद देत अनेक नवीन मानके स्थापित झालीत.

जनसहयोग सामाजिक संस्थेच्या पाठिंब्याने नरवणे ता माण येथे युवा पिढीने परिवर्तन पॅनल च्या माध्यमातून निवडणुकीत उतरण्याचे ठरवले होते, दिग्गज पक्षांप्रमाणे याही पॅनल ने आपला जाहीरनामा घोषित केला होता. जाहीरनाम्यात केलेल्या स्पष्ट उल्लेखानुसार त्याच तारखेला ते वचन पूर्ण करण्याचे काम जनसहयोग सामाजिक संस्थेने आधार मार्केटप्लेस इंडियाच्या प्रा. लि. च्या माध्यमातून पूर्ण केले आहे.

सत्ता येवो अथवा न येवो पण गावात मोफत महा ई सेवा केंद्र सुरू करून त्याद्वारे विद्यार्थ्यांना लागणारे शासकीय दाखले व ग्रामस्थांना मोफत शासकीय ऑनलाइन सेवा देण्याची घोषणा जनसहयोग सामाजिक संस्थेने केली होती, त्या घोषणेला पूर्णत्वास नेताना जनसहयोग सामाजिक संस्थेद्वारे सुरू असलेल्या आधार मार्केटप्लेस इंडिया प्रा. लि. उद्योगसमूहाच्या कार्यालयात या महा ई सेवा केंद्राचे नुकतेच उद्घाटन गावच्या नवनियुक्त सरपंच सौ मालन नंदकुमार मासाळ व कु मंगल गणपत काटकर यांचे शुभहस्ते करण्यात आले.
यावेळी संस्थेच्या संचालिका करिश्मा सूरज मुलाणी, लजिना मज्जीद डांगे आणि रेहाना अब्दुल मुलाणी उपस्थित होत्या.

निवडणुकीत पराभव जरी झाला असला तरी जनतेच्या समोर जी वचने घेऊन गेलो ती वचने पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे पॅनल प्रमुख किरण चव्हाण यांच्या वतीने सांगण्यात आले.यावेळी संस्थेचे अध्यक्ष जावेदखान मुलाणी, सचिव सुरज मुलाणी, मज्जीद डांगे, सूर्यकांत काटकर,अमजद मुलाणी आदिल मुलाणी व ग्रामस्थ उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here