
आज मी एक वेगळ्या विषयावर आपल्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहे, कदाचित बहुतेकांना याची फारशी जाणीव झालेली नसावी पण हा लेख वाचल्यावर मात्र त्यांना, त्याची जाणीव नक्कीच होईल अशी मला पूर्ण खात्री आहे. विषयाचा आशय येणाऱ्या विस वर्षानंतर समाजात कोणते बदल संभवतात याचा आहे.
तर विषय असा आहे आज जी पिढी साधारण दहा ते वीस या वयोगटात आहे, ज्यांना आपण टिनएज म्हणतो अशा वयातल्या मुलांना भविष्यात एक फार मोठ्या परिवर्तनाला तोंड द्यावे लागणार आहे.
आजच्या, साधारण चाळीस वर्षाच्या वरची पिढीला, घर काम करण्यासाठी अर्थात..! धुणे, भांडी, झाडू-पोछा आणि डस्टिंग या कामासाठी बाई मिळत आहे आणि या पिढीचे आयुष्य त्यांच्यासोबतच निभले आहे. पण एक बाब तुमच्या लक्षात आली आहे का? आज ज्या महिला आपल्या घरी झाडू पोछा करत आहेत, त्यांची मुले शिकून सुशिक्षित बनली आहेत, उज्वल भारतासाठी ही एक नक्कीच अभिमानाची गोष्ट ठरली आहे, पण त्याचबरोबर हेही लक्षात घ्या, की, ही सुशिक्षित मुले, तुमच्या मुलांच्या घरी, घरकाम करण्यासाठी उपलब्ध असणार नाहीत.
विस वर्षाच्या आतील मुलांना, त्यांच्या संसारात घर कामासाठी पर्याय शोधावा लागेल, म्हणजे काय?
एक, तर त्यांना स्वतःच घरात धुणे, भांडी, झाडू-पोछा, ही कामे करावी लागतील. दुसरा पर्याय, या सर्व कामासाठी अधिकृत एजन्सी कडून भाडे तत्वावर, तासाच्या बोलीवर लोक बोलवावे लागतील, ज्यांचे दर तासावर ठरतील, जे बहुतेकांना परवडणार नाहीत.
तिसरा पर्याय, जसे ऐशीच्या दशकात वॉशिंग मशीनने घरात प्रवेश केला, तसे आता डिश वॉशर खरेदी करावे लागतील आणि पोछा करण्यासाठी मोपींग रोबो घ्यावे लागतील. थोडक्यात काय तर राहणीमानात अमुलाग्र बदल होणार आहे आणि त्याची सुरुवात पालकांनी आत्तापासूनच करायला पाहिजे. पालकांनी मुलांच्यावर तसे संस्कार करणे गरजेचे होणार आहे.
अडचण ही आहे, की सद्य स्थितीत, आपल्या घरी, घरकाम करण्यासाठी महिला आहे, त्यामुळे टिनएज पिढी, अशी कामे करण्यास किती वेळ लागतो, ते करण्यासाठी कौशल्य असायला हवे, त्यातून शरीराला कोणता वेगळाच त्रास होतो वगैरे बाबीपासून पूर्णपणे अनभिज्ञ आहे.
या लेखाची रुपेरी बाजू ही आहे की मागील तीन दशकात वॉशिंग मशीन कंपन्या जश्या वाढल्या, अगदी तसेच भविष्यात डिश वॉशर आणि मॉपिंग रोबोट बनविणाऱ्या कंपन्यांना सुगीचे दिवस राहणार आहेत. त्यासाठी टिनएज पिढीतील मुलांनी या व्यवसायाकडे लक्ष द्यावे आणि अतिशय सोफेस्टीकेटेड मशीन्स बनवण्यासाठी संशोधन करण्याची आवश्यकता आहे. अगदी त्याच बरोबर टेक्निशियन म्हणून ही मशिन्स दुरुस्त करण्याचे कौशल्य प्राप्त करणे आवश्यक ठरणार आहे.
थोडक्यात काय तर पाश्चिमात्य जगात जसे सर्वांना आपल्या घरी स्वतःचे कपडे, भांडी आणि केरपोछा हे स्वतःच करावे लागते अगदी तसेच भारत देशात येणाऱ्या विस वर्षानंतर करावे लागणार आहे आणि त्याची तयारी सर्वांनीच आतापासून करावी म्हणजे या वेगळ्या वाटणाऱ्या संकटाला समर्थपणे तोंड देता येईल.
परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे, आणि त्याला सर्वांना सामोरे जावे लागणार आहे. एकत्र कुटुंब पद्धती एकेकाळी लोप पावली, त्याचे फायदे तोटे कमी अधिक प्रमाणात मागील पिढीतील सर्वांनी पाहिले. या स्थितंतरातही घरकामासाठी बाई-माणूस मिळाले, पण येणार काळ वेगळा असेल.
सद्य स्थितीत आपण सहा दिवस घरी जेवतो, आणि बदल म्हणून रविवारी हॉटेल मध्ये जेवायला जातो. पुढच्या पिढीतील नवरा-बायको कदाचित आठवड्यातील सहा दिवस सकाळ-संध्याकाळ बाहेर जेवतील, आणि बदल म्हणून रविवारी घरी स्वयंपाक करतील.
आताच्या चाळिशी- पन्नाशीत असणाऱ्या पिढीला हे स्थितंतर पहावे लागेल, आणि त्यांनी, विशेषतः महिलांनी त्यावर नाके मुरडणे टाळावे, आणि आमच्या काळी असे नव्हते वगैरे घासून गुळगुळीत झालेली वाक्ये उच्चारू नयेत. मी म्हणेन, त्यांनी सुद्धा या परिवर्तनाचा भाग बनावे, तरच त्यांचे उर्वरित आयुष्य समाधानाचे जाईल.
✒️विजय लिमये(मो:-9326040204)
