Home Education अब्जावधी आकाशगंगांचा समूह: दीर्घिका!

अब्जावधी आकाशगंगांचा समूह: दीर्घिका!

128

[दीर्घिका संशोधन दिवस विशेष]

हबल एडविन पॉवेल हे अमेरिकन ज्योतिर्विद व खगोल भौतिकीविद होते. आकाशगंगेबाहेरील- गांगेय बाह्य ज्योतिषशास्त्राचे ते संस्थापक मानले जातात. त्यांनी दीर्घिकांचे- तारामंडलांचे शोध लावले व त्यांचे वर्गीकरण केले. तसेच ते प्रसरणशील विश्व या विश्वाविषयीच्या प्रतिकृतीचा पहिला पुरावा देणारे ज्योतिर्विद आहेत. अधिक माहिती श्री एन. कृष्णकुमार जी. यांच्या या लेखात वाचा… संपादक.
हबल यांचा जन्म दि.२० नोव्हेंबर १८८९ रोजी मार्शफील्ड, मिसूरी, अमेरिका येथे झाला. शालेय विद्यार्थी असताना ते हुशार होतेच, शिवाय त्यांना खेळांतही रस होता. मात्र त्यांना शिकागो विद्यापीठातील ज्योतिर्विद जॉर्ज एलरी हेल यांच्या प्रेरणेने ज्योतिषशास्त्र विषयाची आवड निर्माण झाली. याच विद्यापीठात त्यांनी गणित व ज्योतिषशास्त्र या विषयांतील पदवीपूर्व पदवी मिळविली. तसेच तेथे ते उत्कृष्ट मुष्टियोद्धा म्हणूनही प्रसिद्ध होते. मात्र पदवी संपादन केल्यानंतर त्यांनी ज्योतिषशास्त्र व कसरतीचे खेळ यांतील लक्ष काढून घेतले आणि ऑक्सफर्ड विद्यापीठात र्‍होड्स स्कॉलर म्हणून कायद्याचे अध्ययन सुरू केले. कायद्याची बीए पदवी सन १९१२मध्ये मिळविल्यावर ते केंचुकी येथे वकिली करू लागले.

तथापि वर्षभरातच ते वकिली व्यवसायाला कंटाळले. अनेक विषयांत गती असलेल्या हबल यांनी अखेरीस ज्योतिषशास्त्रात काम करण्यावर लक्ष केंद्रित करावयाचे ठरविले. ते शिकागो विद्यापीठ व त्याची विस्कॉन्सिन येथील यर्कीझ वेधशाळा येथे परत आले. तेथे त्यांनी एडविन ब्रांट यांच्या मार्गदर्शनाखाली आकाशगंगेतील नवतारे आणि तेजस्वितेत बदल होणारे चल तारे- नवतारा व अतिदीप्त नवतारा यांचा अभ्यास केला. हबल यांनी ज्योतिषशास्त्रातील पीएचडी पदवी सन १९१७मध्ये मिळविली. पहिल्या महायुद्धात भाग घेतल्यानंतर ते कॅलिफोर्नियातील पॅसाडीनालगत असलेल्या मौंट विल्सन वेधाशाळेत दाखल झाले. तेथे त्यांनी आकाशगंगेबाहेरच्या ज्योतिषशास्त्रीय आविष्कारांशी निगडित संशोधन करण्यास सुरुवात केली. त्यांनी दि.३० डिसें.१९२४ रोजी आकाशगंगे खेरीज इतर दीर्घिकाही अस्तित्त्वात असल्याचे जाहीर केले.

आपल्या सुर्यकुलात असणारा सूर्य हा एक मध्यम आकाराचा तारा आहे. अशा आपल्या सूर्याएवढ्या अंदाजे सुमारे १०० अब्ज ताऱ्यांच्या समुहास आकाशगंगा असे म्हणतात. याचा आकार प्रचंड मोठा असतो. अशा अंदाजे सुमारे १०० अब्ज आकाशगंगांच्या समुहास दिर्घिका असे म्हणतात. अशा १०० अब्ज दिर्घिका या ब्रम्हांडात असण्याची शक्यता आहे. यावरुन ब्रम्हांड किती प्रचंड मोठे आहे, याची आपल्याला कल्पना येईल. आकाशगंगा या कोट्यवधी तारे असलेल्या दीर्घिकेत सूर्यही आहे. मात्र आकाशात दिसणाऱ्या सर्व अभ्रिका आकाशगंगेचा भाग नाहीत, हा शोध हबल यांनी सन १९२२-२४ या काळात मौंट विल्सन वेधशाळेतील निरीक्षणांद्वारे लावला. त्यांनी १,३०० खगोलीय क्षेत्रे निवडून शेकडो छायाचित्रे घेतली. विशिष्ट अभ्रिकांमध्ये १२ सेफीड चल तारे असल्याचे त्यांना आढळले. सेफीड हा आवर्ती चल ताऱ्यांचा उपगट असून त्यांचा तेजस्वीपणा काळानुसार स्थिर राहत नाही आणि त्यांच्या तेजस्वीपणातील बदलाचा आवर्तकाल त्यांचा अंगभूत माध्यम- सरासरी तेजस्वीपणाशी निगडित असतो.

हबल यांनी मौंट विल्सन वेधशाळेतील २५४ सेंमी दूरदर्शकाद्वारे घेतलेल्या वेधांवरून व आढळलेल्या ताम्रच्युतींवरून पर्यायाने दूर जाण्याच्या गतीवरून अंतर, भासमान प्रत व निरपेक्ष प्रत यांच्यातील परस्परसंबंधाचा उपयोग केला. सेफीड तारे लाखो प्रकाशवर्षे अंतरावर म्हणजे आकाशगंगेच्या पलीकडचे असल्याचे निश्चित झाले. ज्या अभ्रिकांमध्ये हे सेफीड तारे आहेत त्या प्रत्यक्षात आकाशगंगेहून भिन्न अशा दीर्घिकाच असल्याचे त्यांनी दाखवून दिले. उदा.देवयानी अभ्रिकेतील एम-३१ ही दीर्घिका आकाशगंगेच्या फारच बाहेर म्हणजे साडेसात लक्ष प्रकाशवर्षे इतकी दूर आहे. उलट आकाशगंगेचा व्याप फक्त एक लक्ष प्रकाशवर्षे एवढा आहे. हा शोध त्यांनी १९२४मध्ये घोषित केला व त्यामुळे ज्योतिर्विदांना विश्वाविषयीच्या त्यांच्या कल्पना तपासून पाहणे भाग पडले.

आकाशगंगेबाहेरच्या या दीर्घिका शोधून काढल्यावर लवकरच हबल यांनी सन १९२६मध्ये या दीर्घिकांचे त्यांच्या आकारानुसार वर्गीकरण करण्याचे आणि त्यांचे तारकीय घटक व त्यांच्या तेजस्वीपणाचे आकृतिबंध यांच्या समन्वेषणाचे कामही सुरू केले. त्यांनी दीर्घिकांचे १) विवृत्ताकार, २) साध्या चक्रभुजीय, ३) दंडयुक्त चक्रभुजीय आणि ४) रचनारहित हे चार प्रमुख वर्ग केले- संदर्भ ज्योतिषशास्त्र. दीर्घिकांचा अभ्यास करताना त्यांनी पुढील दुसरा लक्षणीय शोध १९२७मध्ये लावला. या दीर्घिका उघडपणे आकाशगंगेपासून दूर जात आहेत आणि त्या जितक्या अधिक दूर असतात तितक्या अधिक वेगाने दूर जात आहेत. या शोधाचे असंख्य मतितार्थ- अटकळी वा अन्वय होते. दीर्घकाळ विश्व स्थिर अवस्थेत असल्याचे मानले जात होते. या शोधामुळे विश्व प्रसरण पावत असल्याचे दिसून आले. त्यांनी दीर्घिकांची गती व त्यांचे अंतर यांचे गुणोत्तर हा स्थिरांक असेल अशा प्रकारे विश्व प्रसरण पावत असल्याचे शोधून काढले. या स्थिरांकाला त्यांच्या नावावरून हबल स्थिरांक हे नाव पडले. विश्व प्रसरण पावत असल्याचे हबल यांचे मत बरोबर होते. मात्र त्यांनी गणिताने काढलेले हबल स्थिरांकाचे मूल्य बरोबर नव्हते.

कारण त्यावरून आकाशगंगेची प्रणाली इतर सर्व दीर्घिकांपेक्षा अधिक मोठी आहे आणि पृथ्वीच्या अंदाजाने काढलेल्या वयापेक्षा संपूर्ण विश्व लहान आहे, असा चुकीचा अर्थ निघत होता. तथापि नंतर ज्योतिर्विदांनी त्यांचे निष्कर्ष पुन्हा तपासून पाहिले व त्यामुळे हबल यांच्या सिद्धांतांचा बचाव झाला. यामुळे विश्व १०-२० अब्ज वर्षे स्थिर त्वरेने प्रसरण पावत असल्याचे चित्र निर्माण झाले.

हबल यांनी दिलेली हॅली व्याख्याने- ऑक्सफर्ड विद्यापीठ, सन १९३४; सिलिमन व्याख्याने- येल विद्यापीठ, सन १९३५ आणि र्‍होड्स मेमोरियल व्याख्याने प्रसिद्ध आहेत. रेड शिफ्टस् इन दि स्पेक्ट्रा ऑफ नेब्युली- सन १९३४ आणि दि हबल ॲटलास- संपा.ॲलन रेक्स सँडेज, सन १९६१ ही त्यांची प्रसिद्ध पुस्तके आहेत. ज्योतिषशास्त्रात त्यांनी केलेल्या कामगिरीमुळे त्यांना अनेक मानसन्मान व पुरस्कार मिळाले होते. उदा.अमेरिकेतील बर्नार्ड, ब्रूस व फ्रँक्लिन ही सुवर्ण पदके तसेच रॉयल ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचे सुवर्ण पदक- सन १९४० आणि ऑक्सफर्डच्या क्वीन्स कॉलेजचे फेलो, शिवाय पृथ्वीभोवतीच्या कक्षेत स्थापित केलेल्या दूरदर्शकाला त्यांच्या सन्मानार्थ हबल अवकाश दूरदर्शक- हबल स्पेस टेलिस्कोप हे नाव देण्यात आले. हबल यांचे दि.२८ सप्टेंबर १९५३ रोजी सान मारीनो, कॅलिफोर्निया, अमेरिका येथे निधन झाले. त्यांची कामगिरी जगाला वेडावणारी ठरली, हे येथे उल्लेखनीयच!

!! पुरोगामी न्यज परिवारातर्फे दीर्घिका संशोधन दिनाच्या सर्व खगोल प्रेमींना हार्दिक हार्दिक शुभेच्छा !!

✒️श्री. एन. कृष्णकुमार जी. (से.नि.अध्यापक)अवकाश निरीक्षक व लेखक.मु. पिसेवडधा, ता. आरमोरी.जि. गडचिरोली, मो. ७७७५०४१०८६

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here