(कर्मवीर दादासाहेब गायकवाड स्मृतिदिन विशेष)
दलितांच्या उद्धारासाठी कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांनी आपले सर्व आयुष्य वेचले. महाडचा सत्याग्रह व नासिकचा काळाराम मंदिरप्रवेश सत्याग्रह यांत ते आघाडीवर होते. त्यावेळी त्यांना निर्दय मारपीट सहन करावी लागली व तुरुंगातही जावे लागले होते. त्यांच्या स्मृतींना उजाळा श्री कृष्णकुमार गोविंदा निकोडे गुरूजी देत आहेत…
भाऊराव कृष्णराव गायकवाड ऊर्फ दादासाहेब गायकवाड हे भारतीय राजकारणी, समाजसेवक आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे विश्वासू सहकारी होते. ते डॉ.आंबेडकरांचा वारसा लाभलेल्या भारतीय रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष होते, तसेच पक्षाच्या केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य होते. मुंबई विधानसभेचे सदस्य- आमदार, लोकसभा सदस्य व राज्यसभा सदस्य- खासदार म्हणून त्यांनी कार्य केलेले आहे. डॉ.बाबासाहेबांच्या अनेक कामांत दादासाहेबांचा सहभाग होता. दि.२ मार्च १९३०च्या वेळी डॉ.आंबेडकरांना दादासाहेबांची खुप मदत झाली. अस्पृश्यांच्या मंदिर प्रवेशासाठी दादासाहेबांच्या नेतृत्वाखाली आणि बाबासाहेबांच्या पुढाकाराने दिलेल्या लढ्याचा एक भाग म्हणजे हा सत्याग्रह होता. काळाराम मंदिर हे नाशिक मधील प्रसिद्ध रामाचे मंदिर आहे. त्यांच्या मानसन्मानार्थ – • कर्मवीर पद्मश्री दादासाहेब गायकवाड पुरस्कार हा महाराष्ट्र शासनाद्वारे २००२पासून दिला जाणारा पुरस्कार आहे.
दादासाहेबांच्या नावाने महाराष्ट्र राज्य सरकारची कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजना या नावाची एक योजना सन २००४पासून सुरू आहे. सन २०१२साली तिचा लाभ ३८ भूमिहीनांना झाला होता. मात्र त्यापूर्वी केवळ २५० लोकांना जमिनी मिळाल्या होत्या. • भारत सरकारने गायकवाडांना इ.स.१९६८मध्ये पद्मश्री हा पुरस्कार दिला. • नाशिकमध्ये एका सभागृहाला दादासाहेब गायकवाड सभागृह नाव दिले आहे. • मुंबईत अंधेरीभागात दादासाहेब गायकवाड सांस्कृतिक केंद्र नावाची संस्था आहे. • दादासाहेब गायकवाड यांचा परिचय करून देणारी एक १३ मिनिटांची डॉक्युमेंटरी फिल्म सुद्धा तयार केली आहे.
भाऊराव कृष्णराव गायकवाड हे विश्वरत्न महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे ज्येष्ठ सहकारी, दलित समाजाचे नेते व सुधारक होते. ते सर्वसामान्य लोकांत दादासाहेब या नावाने ओळखले जात.दादासाहेबांचा जन्म नासिक येथे दि.१५ ऑक्टोबर १९०२ रोजी एका गरीब कुटुंबात झाला. तेथील सरकारी माध्यमिक शाळेत त्यांचे शिक्षण झाले. त्यानंतर डॉ.आंबेडकरांसमवेत त्यांनी दलितोद्धाराच्या कार्यास सुरुवात केली. सन १९४२ ते ४६ या काळात ते सरकारी नोकरीत होते. त्यांनी जालंदर व कुरुक्षेत्र येथे निर्वासितासांठी खास अधिकारी म्हणूनही काम केले. नासिकच्या ज्ञानविकास केंद्र या शिक्षणसंस्थेचे तसेच नागपूरच्या डॉ.आंबेडकर महाविद्यालयाचे ते अध्यक्ष होते. अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष, तसेच पक्षाच्या केंद्रीय कार्यकारिणीचे ते सदस्य होते. प्रबुद्ध भारत या साप्ताहिकाच्या संपादक मंडळाचे अध्यक्ष तसेच मुंबई येथील शेड्यूल्ड कास्ट्स इंप्रूव्हमेंट ट्रस्टचे ते विश्वस्त व सदस्य होते. नासिक, नागपूर, पुणे, मुंबई आदी ठिकाणच्या अनेक सार्वजनिक संस्थांशी ते या ना त्या प्रकारे निगडित होते.
ते मुंबई विधानसभा तसेच लोकसभा यांचे सदस्य होते. लोकसभेत रिपब्लिकन पक्षाच्या गटाचे नेतेही राहिले होते. नंतर त्यांची राज्यसभेवर निवड झाली. सन १९५३मध्ये त्यांना भूमिविषयक सत्याग्रहात तुरुंगवास भोगावा लागला. त्यानंतर त्यांनी भूमिहीनांना भूमी मिळावी, म्हणून मोठे आंदोलन सुरू केले होते. त्यांनी विश्वरत्न डॉ.आंबेडकरांसोबत बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. त्यांच्यासोबत प्रथमपासून त्यांनी आघाडीवर राहून काम केले. त्यांच्या गुणांची आणि नेतृत्वाची अनेक वेळा कसोटी लागली. डॉ.बाबासाहेबांचे एक ज्येष्ठ, विश्वासू व कर्तबगार सहकारी म्हणून त्यांचा लौकिक होता. साधी राहणी, मनमिळाऊ स्वभाव, विशुद्ध चारित्र्य, प्रखर ध्येयनिष्ठा, प्रभावी वक्तृत्व, अन्यायाविरुद्ध झगडण्याची जिद्द इत्यादी गुणांमुळे त्यांचे नेतृत्व आदरणीय ठरले.
सन १९६८ साली भारत सरकारने त्यांना पद्मश्री देऊन त्यांच्या कर्तृत्वाचा व समाजसेवेचा गौरव केला. त्यांच्या कार्यरत जीवनामुळेच लोक त्यांना कर्मवीर ही उपाधी लावत होते. दि.२९ डिसेंबर १९७१ रोजी दिल्ली येथे अशा या थोर समाजसुधारक दादासाहेबांचे निर्वाण झाले.
!! पुरोगामी न्युज परिवारातर्फे स्मृतिदिनी त्यांना व त्यांच्या अविस्मरणीय कार्यांना मानाचा लवून मुजरा आणि पावन चरणी लेखरुपी ही शब्दसुमने !!
✒️श्री कृष्णकुमार गोविंदा निकोडे गुरूजी(थोर पुरुषांच्या प्रेरणादायी चरित्रांचे गाढे अभ्यासक)मु. रामनगर वॉर्ड नं.२०, गडचिरोली.जि. गडचिरोली, मधुभाष- ७७७५०४१०८६.
इमेल- nikodekrishnakumar@gmail.com