
✒️कराड(पुरोगामी न्युज नेटवर्क)
कराड:दि.26डिसेंबर ):- ” स्वतःवर विश्वास ठेवा. आत्मविश्वासाने कोणतेही कार्य करा. आपल्या अनेक चांगल्या गुणांचा समुच्चय असतो. ते ओळखा. कोणत्याही प्रसंगात संधी शोधली तर सापडते. दुर्दम्य ईच्छाशक्ती आणि आत्मविश्वास असेल तर अशक्य असणाऱ्या गोष्ठी साध्य करता येतात. संतांनी जगण्याचे तत्वज्ञान शिकवले. आणि समाजसुधारकांनी महाराष्ट्राला प्रबोधनाची दिशा दिली. आपण आपल्या मातीतला संस्कार विसरता कामा नये.” असे प्रतिपादन मा. अँड श्री भारत मोहिते यांनी केले. ते मौजे तासवडे येथे वेणूताई चव्हाण कॉलेज कराडच्या कनिष्ठ विभागाच्या राष्ट्रीय सेवा योजना श्रम संस्कार शिबिरात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी मा. श्री भगवान शिंदे हे होते. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून मा. अँड श्री पृथ्वीराज कदम हे उपस्थित होते.
मा. अँड श्री पृथ्वीराज कदम शिबिरार्थीना ग्राहक कायदा याविषयी मार्गदर्शन करताना म्हणाले की, ग्राहक आणि विक्रेता यांच्यामध्ये आपुलकीचे नातेसंबंध असावेत. जर ग्राहकांची फसवणूक झाली तर ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे न्याय मागता येतो. वस्तु व सेवा घेताना ग्राहकांनी काळजीपूर्वक तपासून घ्याव्यात. ऑनलाईन खरेदी करताना विशेष दक्षता घ्यावी. कायद्यानुसार खोट्या व दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींवर दंडात्मक कारवाई करता येते. आता हॉस्पिटल सेवा देखील ग्राहक कायद्याखाली आल्या आहेत. ग्राहकांनी कोणत्याही आमिषाला बळी पडू नये. फसवणूक झाल्यास दोन वर्षांपर्यंत आपणास न्यायालयाकडे दाद मागता येते.”
यावेळी कार्यक्रम अधिकारी प्रा. केशव महाले यांनी प्रमुख पाहुणे व अध्यक्ष यांचा सत्कार केला.
या कार्यक्रमा तासवडे गावच्या सरपंच सौ. भारती शिंदे, अधिकराव शिंदे, तसेच प्रा. संतोष बोंगाळे, प्रा. आत्माराम मुळीक तसेच प्रा. एस. बी. राठोड यांची आवर्जून उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक धीरज गुजर यांनी केले. तर पाहुण्यांचा परिचय ओंकार खबाले याने करून दिला. सूत्रसंचालन कु. वैष्णवी मोठे हिने केले तर कार्यक्रमाचे आभार कु. सिद्धिका मुजावर हिने मानले
