Home महाराष्ट्र चिमुकल्यांचा जीव वाचवणाऱ्या धाडसी शिक्षकाचा सन्मान….

चिमुकल्यांचा जीव वाचवणाऱ्या धाडसी शिक्षकाचा सन्मान….

84

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

परभणी(दि.24डिसेंबर):- मागील दोन दिवसापूर्वी जिंतूर तालुक्यातील गडदगव्हाण वाडी येथील अंगणवाडी मध्ये पोषण आहार शिजवताना अचानक गॅस सिलेंडरला आग लागली. काही क्षणात अंगणवाडीची वर्ग खोली धुराने भरून गेली. अंगणवाडीत शिक्षण घेणारी चिमुकले घाबरून आरडा-ओरडा करायला लागले. अंगणवाडी कर्मचारी प्रचंड तळमळीने या संकटातून चिमुकल्यांना बाहेर काढण्याचा कसोशीने प्रयत्न करू लागल्या. पण त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही. सर्व परिसरात या अचानक लागलेल्या आगीमुळे गोंधळ उडाला. जो तो आपापल्या परीने प्रयत्न करू लागला. कुणाचेही अंगणवाडीमध्ये जाऊन त्या अडकलेल्या बालकांना सोडवण्याची हिंमत होत नव्हती.

इतक्यात त्याच रस्त्यावरून जाणाऱ्या शारदा विद्यालय आडगाव बाजार येथे कार्यरत असणाऱ्या श्री प्रवीण राठोड या धाडसी तरुण शिक्षकाला ही घटना निदर्शनास आली. घटनेचे गांभीर्य आणि चिमुकल्यांचा जीव धोक्यात आहे हे बघून आपल्या स्वतःच्या जीवाची पर्वा न करता हे धाडसी शिक्षक थेट अंगणवाडीत शिरले. मोठ्या प्रयत्नाने बाल चिमुकल्यांना आणि अंगणवाडी कर्मचाऱ्यांना या संकटातून बाहेर काढले. हे करताना ते थोड्या प्रमाणात जखमी झाले. तरीही आपल्या दुखापतीची तमा न बाळगता त्यांनी सुखरूप सर्व चिमुकल्यांना वर्गाबाहेर काढून त्यांचा अमूल्य जीव वाचवला.

सदर घडलेल्या घटनेबद्दल आडगाव बाजार परिसरात आणि संपूर्ण तालुक्यात श्री प्रवीण राठोड यांच्या धाडसी कृत्याचे भरभरून कौतुक होत आहे. संकट प्रसंगी मदतीला धावून जाणे हे त्यांचे मानवी कृत्य खरोखर प्रत्येकासाठी अनुकरणीय आहे. या घटनेची दखल घेत अत्यंत संवेदनशील मनाचे तसेच गुणग्राहक स्वभाव असणारे, सातत्याने प्रेरणादायी विचार आपल्या आचरणात उतरवणारे गटशिक्षणाधिकारी श्री गणेशजी गांजरे साहेब यांनी घडलेला सर्व प्रकार जाणून घेतला. श्री प्रवीण राठोड सर यांच्या धाडसी कृत्यामुळे घडणारा अनर्थ टळला आणि चिमुकल्यांचा जीव वाचला. याबद्दल त्यांनी गटशिक्षणाधिकारी कार्यालयाकडून श्री प्रवीण राठोड सर आणि शारदा विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री राठोड सर या दोन्ही संवेदनशील व्यक्तिमत्त्वाचा उचित सन्मान केला. त्यांच्या धाडसी कृत्याचे भरभरून कौतुक केले. अशाच प्रकारे आपल्या शाळेच्या परिसरात शिकणाऱ्या सर्व बालगोपालांबद्दल आपल्या स्वतःच्या लेकराएवढी काळजी, आपुलकी, जिव्हाळा आणि माया प्रत्येक शिक्षकांनी केली पाहिजे. तसेच असा प्रकार कुठेही घडणार नाही यासाठी सर्वांनी सतर्क राहिले पाहिजे. याविषयी त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.

यावेळी श्री सर्जेराव पोले सर, श्री दिनकर घुगे सर, श्री शंकर चव्हाण सर, श्री पांडुरंग भांबळे सर, श्री विकास सातभाई सर, श्री रत्नाकर जोशी सर, श्री गायकवाड सर, श्री चव्हाण सर, श्री मयूर जोशी, श्री स्वामी सर यांच्यासह मोठ्या प्रमाणात शिक्षक बांधव उपस्थित होत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here