Home Education जामनेर पळासखेडा येथे पोलीस भरती शिबिरात ४००+ विद्यार्थ्यांचा सहभाग…

जामनेर पळासखेडा येथे पोलीस भरती शिबिरात ४००+ विद्यार्थ्यांचा सहभाग…

78

🔹स्वतःची कुंडली स्वतः तयार करा;पीएसआय अमोल देशमुख

✒️जामनेर(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

जामनेर(दि.12डिसेंबर):– येथील पळासखेडा बु. उन्नती नगरमध्ये सुरेशचंद्र धारीवाल कॉलेजच्या मैदानावर पोलीस भरती मार्गदर्शन शिबीर उत्साहात संपन्न झाले. या शिबिरात लेखी पेपर, मैदानी चाचणी व परीक्षा मार्गदर्शन यामध्ये नोंदणीकृत ४०० पेक्षा अधिक विद्यार्थांनी सहभागी होऊन शिबिराचा लाभ घेतला.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, आज पळासखेडा बु. येथे सकाळी ८:३० ते १० च्या दरम्यान लेखी परीक्षा तद्नंतर मैदानी चाचणी घेण्यात आली. विद्यार्थी व विद्यार्थिनींचा लक्षणीय सहभाग त्यांच्या मनाची जिद्द आणि चिकाटी दाखवण्यासाठी पुरेसा होता. अनवाणी पायाने रनिंग करून पहिल्या येणाऱ्या आसमा तडवी या स्फूर्तीकन्याने दाखवून दिले की, या शर्यतीत आम्ही देखील कुठेच मागे नाहीत?आयोजकांनी भावी पोलिसांसाठी खिचडी व केळ्याच्या मेनू उपलब्ध करून दिला होता. मध्यान्ह भोजनाचा आस्वाद घेतल्यानंतर मार्गदर्शन सत्राला सुरवात झाली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक अक्षरा अभ्यासिका पळासखेडा बु. चे संस्थापक अध्यक्ष तथा फॉरेन्सिक युनिट जळगांव चे योगेश वराडे यांनी केले. ९/११/२०११ रोजी सुरू झालेल्या अक्षरा अभ्यासिकेच्या माध्यमातून हे आज ९ वे मार्गदर्शन संपन्न होत असून ग्रामीण भागातील मुलांना शहराच्या तोडीस तोड मार्गदर्शन मिळावे हा यामागील शुध्द हेतू आहे. मागील ११ वर्षांपासून अक्षरा अभ्यासिकेची टीम स्पर्धा परीक्षा देण्याऱ्या विद्यार्थ्यांसाठी दीपस्तंभ म्हणून कार्य करतेय. आम्ही सर्व डिपार्टमेंट मध्ये कार्यरत असून देखील हे सर्व करतोय कारण तुम्ही घडले पाहिजे, असे प्रतिपादन योगेश वराडे यांनी केले. कार्यक्रमाचे अतिथी अमित माळी ( बिनतारी संदेश विभाग जळगांव ) यांनी अक्षरा अभ्यासिकेच्या सर्व परिवाराचे तोंडभरून कौतुक केले.

डिपार्टमेंट मध्ये दाखल होण्यासाठी परीक्षा महत्वाची असली तरी नोकरी करणं ही सुध्दा दैनंदिन परीक्षा असल्याचं मत अमित माळी यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे मुख्य वक्ते विकल्प ऑर्गनायझेशन धरणगाव चे कार्याध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मणराव पाटील यांनी परीक्षेचे नियोजन कसे करावे? अभ्यास कसा करावा? मराठी व्याकरणातील महत्वाच्या काही क्लुप्त्या सांगितल्या. पोलीस दलात रुजू झाल्यानंतर तुमच्यामधील माणूस जागता ठेवा. मुलींनी रडायला नाही तर लढायला शिकलं पाहिजे तसेच मुलांनी आई वडिलांची सेवा करून देशसेवा केली पाहिजे, असे मत लक्ष्मणराव पाटील यांनी मांडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेले नवनियुक्त पोलीस उपनिरीक्षक ( PSI ) अमोल देशमुख यांनी त्यांचा संघर्षमय प्रवास विद्यार्थांसमोर ठेवला. आठव्या वर्षी वडील गेल्यानंतर ज्यांनी वडिलांप्रमाणे माझा सांभाळ केला ते लक्ष्मण पाटील (बापमाणूस) यांचे स्वप्न होते की मी पोलीस दलात अधिकारी झालो पाहिजे.

सामाजिक कार्य करतांना आणि असे उपक्रम राबवितांना असंख्य अडचणींना तोंड द्यावे लागते. डिपार्टमेंटल पीएसआय पदाची परीक्षा पास झालो परंतु ज्यांच्या स्वप्नासाठी झटत होतो परंतु तो बापमाणूस मला सप्टेंबर २०२२ मध्ये सोडून गेला हे सांगतांना अमोल देशमुखांना अश्रू अनावर झाले. मी नेहमी स्वतःला सांगत असायचो की मी पीएसआय होणारच आणि झालो सुध्दा. तुम्ही सर्व सांगायचे की दादा तुम्ही पीएसआय बना; मी तुमचं स्वप्न पूर्ण केलं आता तुम्ही माझं स्वप्न पूर्ण करा. “स्वतःची कुंडली स्वतःच तयार करा आणि स्वतःच्या आयुष्याचे शिल्पकार बना”, असे प्रतिपादन अमोल देशमुख यांनी केले. लेखी परीक्षेत प्रथम, द्वितीय व तृतीय येणाऱ्या मुलामुलींना मान्यवरांच्या हस्ते रोख बक्षीस देऊन मनोबल उंचावण्यासाठी प्रयत्न करण्यात आला.

कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी म्हणून माय माती फाउंडेशन च्या अध्यक्षा प्रभावती पाटील, माऊली द्वारकाधिश फौंडेशन जळगाव चे अध्यक्ष विनोद वाघ, सचिव योगेश सुतार, बहुजन क्रांती मोर्चाचे जिल्हा संयोजक राजू खरे (पळासखेडा बु.), उज्वला सोनवणे (साठे), पूजा पाटील (जामनेर), सुभाष गायकवाड (इंडियन आर्मी), विजय बुंदेले (SP office) यांच्यासह अक्षरा अभ्यासिकेचे सदस्य तसेच पोलीस दलातील कर्मचारी संजय खंडारे, संदीप वानखेडे, आकाश मोहने, गोविंद सुरवाडे, भूषण सोनवणे, रमेश खोडपे, निखिल महाजन, प्रविण पांगुळ, सरवर तडवी आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अक्षरा अभ्यासिकेचे सदस्य पंकज शेळके, शुभम बाविस्कर, विठ्ठल पांगुळ, गणेश पाटील, महेंद्र कुंभार, परेश भोई, गणेश बिल्लोरे, धनराज सोनवणे, अंकित शेजोळे, सुनिल मगरे, संदीप पवार, अक्षय जाधव आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश वराडे यांनी तर आभार प्रदर्शन संजय खंडारे यांनी केले.

अन्याया विरूद्ध आवाज उठवणे गुन्हा आहे का?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here