Home Education मानवी मूल्यांच्या संवर्धनाची नैतिक जबाबदारी कोणाची?

मानवी मूल्यांच्या संवर्धनाची नैतिक जबाबदारी कोणाची?

206

आज संपूर्ण भारतीय जनता भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि राष्ट्रनिर्माते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या महान कार्याला स्मरून विचार मंथन करताना दिसत आहे. एका व्यक्तीच्या आयुष्यात त्याला जे शक्य असते त्याहूनही कैक पटीने महान कार्ये त्याच्या हातून होतात तेंव्हा अशी व्यक्ती असामान्य,महान ठरते. बाबासाहेब यामुळेच महान ठरतात. शिवाय एक व्यक्ती म्हणून स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाला विविधांगाने विकसित करणारी माणसे जगात दुर्मिळ असतात. कोणी तत्वज्ञानात, कोणी खेळात, कोणी एखाद्या बाबतीत जगात अव्वल स्थानी पोहचतो.

पण तत्वज्ञान, साहित्य, विधी, भाषा, भुगोल, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, मानववंशशास्त्र , स्थापत्य अभियांत्रिकी, जलनीती नियोजन, कामगार धोरण, शेती, राजनीती, इत्यादी क्षेत्रात अव्वल स्थानी पोहोचणारे; संगीत, विनोद, प्राणी प्रेम, पर्यटन, पोशाख, वाकचातूर्य, इत्यादी बाबतीत रुची असणारे डॉ बाबासाहेब आंबेडकर हे जगातील अद्वितीय महान व्यक्तित्व या भारताने पाहिले आहे याचा खरे तर प्रत्येक भारतीयाला प्रचंड अभिमान आहे. सोबतच, त्यांनी स्वातंत्र्य, समता, बंधुता ,न्याय, लोकशाही, धर्मनिरपेक्षता, स्त्रि पुरुष समानता या आदर्श मानवी मूल्यांचा मोठ्या हिमतीने पुनर्स्थापनेचा प्रयत्न केला हे अधिक अभिमानास्पद आहे.

पण कोणत्याही मानवी समाजात मानवी आणि अमानवी तत्वांचे अस्तित्व असतेच! त्यामुळे मानवी मूल्यांचा विरोध करणारी अमानवी जमात त्यांच्या महान कार्य आणि व्यक्तित्वाला हेटाळण्याचा प्रयत्न करणार हे स्वाभाविक आहे. प्रश्न हा उरतो की, आदर्श मानवी मूल्ये संवर्धित करण्याबाबत अनुयायी म्हणानारांची आज भूमिका काय असायला हवी ?व्यक्तिचे विचार अमर्त्य असतात हे पूर्ण सत्य नाही हे सांगताना खुद्द बाबासाहेबांनीच ‘अनुयायांनी विचारांचा प्रचार प्रसार केला नाही तर विचार सुद्धा मर्त्य ठरतात’ हे सांगून ठेवलेलं आहे.

आज आम्हां भारतियांना स्वातंत्र्य, समता, बंधुता ,न्याय, लोकशाही, धर्मनिरपेक्षता, स्त्रि- पुरुष समानता या आदर्श मानवी मूल्यांचा भारतीय संविधानाच्या माध्यमातून वारसा मिळाला आहे. अगदी संविधानाला समजून न घेता दोष देणाराला सुद्धा न्याय देणाऱ्या मानवी मूल्यांचा आदर्श आमच्या समोर आहे. मात्र अमानवी, विषमतावादी जमात जिला बाबासाहेबांनी ” ब्राह्मणवाद आणि भांडवलशाही” म्हटलेलं आहे; त्यांनी पद्धतशीरपणे, संघटितपणे, सातत्याने, षडयंत्रपूर्वक मानवी मूल्यांचा विध्वंस मांडलेला आहे. अश्यावेळी आम्हीं काय करावे या चिंतेत आणि गोंधळलेल्या स्थितीत आमचा बहुजन समाज दिसतोय. शिवाय अनैतिक झालेल्या प्रिंट, इलेक्ट्रॉनिक, आणि सोशल मीडियाच्या प्रभावाने निराश झालेले तथाकथित विचारवंत, अनुयायी, कार्यकर्ते पाहून आश्चर्य वाटते .

“आत्मविश्वासासारखी दुसरी शक्ती जगात नाही” असे सांगणाऱ्या बाबासाहेबांचे अनुयायी निराश होऊच शकत नाहीत आणि जे निराशेने ग्रस्त आहेत ते फुले आंबेडकरी विचारांचे वारस कसे असू शकतात ?जे आत्मविश्वासू आहेत तेच मानवी मूल्ये संवर्धित करू शकतात. जे आत्मविश्वासू आहेत त्यांच्यापुढे अनेक प्रश्न आहेत.

तसे पाहिले तर प्रत्येक सजग भारतीयाला विविध प्रकारची चिंता असणे स्वाभाविक आहे. ते त्याच्या समाजाप्रती, देशाप्रती असणाऱ्या प्रामाणिकपणाचे लक्षण आहे. पण आज त्यातील प्राधान्याने कोणते मुद्दे हाती घ्यावेत याचा विचार महत्वाचा आहे.खरे तर प्रासंगिक आणि सातत्याने सोबत घेण्याच्या मुद्द्यांची चर्चा देशभर सुरू आहेच; प्रश्न आहे वर्गीकरणाचा!

बेरोजगारी, महागाई, पाणी टंचाई, महिला सुरक्षितता, शिक्षण, भ्रष्टाचार, जाती विद्वेष, धार्मिक विद्वेष, भाषा – प्रांतवाद , इत्यादी समस्या आमच्या समोर दिसतात तर दुसरीकडे आदर्श संविधानिक मानवी मूल्ये संवर्धनाचा प्रश्न आहे.समस्या या परिणाम असतात. समस्यांचे मूळ खूप घातक असते. त्यामूळे आपला भर मूळ उखडून टाकण्यावर अधिक असायला हवा. हे मूळ कोणते ? डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनीच ‘ब्राह्मणवाद आणि भांडवलशाही’ हे सर्व समस्यांचे मूळ सांगितलेलं आहे.अर्थात हे विषारी मूळ उखडण्याचे साधन भारतीय संविधानिक मानवी मूल्ये आहेत हे कोणीही नाकारू शकत नाही. त्यामुळे आजच्या घडीला समस्यांची चर्चा करताना प्राधान्याने भारतीय संविधान काय आहे, भारतीय संविधानामुळे भारतात झालेल्या अमुलाग्र बदल, संविधानाच्या लाभार्थ्यांच्या मनात संविधानाप्रती सन्मान, सोबतच त्यातील मानवी मूल्यांच्या संवर्धनाचा विचार जागृत करणे हा मुख्य मुद्दा असायला हवा. अर्थात देशभर त्या दृष्टीने प्रत्येकजण प्रथक का असेना प्रयत्न करताना दिसतो आहे ही आशादायक बाब आहे.

आत्मवश्वासू लोकांनी भारतीय संविधान सन्मान, सुरक्षा, संवर्धन यासाठी प्राधान्याने प्रचार प्रसार करताना धाडसाने, खुलेपणाने, सातत्याने, तयारीने समाजजीवनात जाण्याची हीच वेळ आहे.
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत 1950 पासून या देशाला अखंड ठेवत भारतीय संविधानाने इथल्या प्रत्येक क्षेत्राला विकसित केल्याची माहिती जनमानसात गेल्यास संविधान काय आहे हे भारतीयांनी स्पष्टपणे समजेल.अगदी सकाळी झोपेतून उठल्यापासून प्रत्येक भारतीयाच्या पाणी, वीज, रस्ते, शाळा, आरोग्य, रोजगार, मान सन्मान इत्यादी संबंध येतो. हे कार्य भारतीय संविधानाच्या निर्देशाने चालते हीच बाब जनतेला समजवायला हवी. रात्रीची सुखाची झोप घेताना भारतीय संविधानाने निर्धारित सुरक्षा यंत्रणा आमचे रक्षण करत असते हे कुणीही का दुर्लक्षित करावे ?

लोकप्रतिनिधी रस्ता, वीज, पाणी, आरोग्य, रोजगार इत्यादि बाबी भारतीय संविधानाच्या मार्गदर्शनानुसार करतात. स्वच्छेने, व्यक्तिगत आवडी प्रमाणे काहीही करण्याची लोकप्रतिनधींला मोकळीक कुठे असते ? त्यासाठी संविधानिक कसोट्या ठरलेल्या आहेत.
लोक कल्याणाचा जगातील सर्वांत आदर्श दस्तऐवज म्हणून सारे जग भारतीय संविधानाकडे पाहते.वास्तविक संविधान निर्माणसमयी प्रत्येक क्षणी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची भुमिका निर्णायक ठरली. ते अधिकाधिक आदर्श होण्याकामी त्यांची भुमिका कणखर ठरली. त्यामुळे भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून बाबासाहेबांना जग ओळखते. मात्र हे संविधान “आम्हीं भारतीय लोकांनी” लिहिले, स्विकारले, अमलात आणले आहे. ते तयार करण्यात हिंदू महासभेचे शामाप्रसाद मुखर्जी जसे होते तसे डॉ पंजाबराव देशमुख सुद्धा होते. त्यामुळे आम्हीं सर्वांनी लिहीलेले, मान्य केलेले, स्विकारलेले भारतीय संविधान सर्वांचे ठरते, तसेच त्याचा सन्मान, सुरक्षा, संवर्धन करण्याची जबाबदारी सुद्धा सर्वांची ठरते याची जाणीव प्रत्येकाला करून देण्याची आमची जबाबदारी आहे.

स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, लोकशाही ,धर्मनिरपेक्षता ही आदर्श मानवी मूल्ये कुठे फ्रान्स मध्ये उगवत नाहीत. ती सर्वत्र असतात. खरे तर हि मूल्ये तथागत बुद्ध, महावीर, छत्रपति शिवाजी महाराज, राष्ट्रपिता जोतिबा फुले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, पेरियार, जन नायक बिरसा, इत्यादी महानवांच्या विचार आणि कार्यातून आलेली आहेत. हि मूल्ये परदेशातून घेतली म्हणणारांना ‘छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेल्या स्वातंत्र्याच्या मूल्यांचा अनादर करताय ‘ असा खडा सवाल करण्याची धमक आम्ही दाखवण्याची वेळ आहे हे समजून घेवूया!

दिनांक 25 नोव्हेंबर 1949 रोजी अहवाल सादर करताना डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हटले होते की,” जर घटना राबवणारेच वाईट वृत्तीचे असतील तर एखादी घटना कितीही उत्कृष्ट असली तरी ती बद्ध रुपयाप्रमाणेच ठरणार ! त्याचप्रमाणे घटना राबविणारे चांगल्या वृत्तीचे असतील तर एखादी घटना कितीही टाकाऊ असली तरी ती उपकारकच ठरेल ! घटनेच्या स्वरूपावरच घटनेची अंमलबजावणी सर्वस्वी अवलंबून असते असे नाही .” आजच्या घडीला घटनेच्या यशा अपयशाचे खापर ती राबवणार यांच्यावर येते.
पुढे बाबासाहेब असे म्हणतात की,” आपल्या देशात अनेक राजकीय पक्ष व तत्व प्रणाली यांचाही एकच गोंधळ उडालेला आहे. अशा परिस्थितीत भारतीय जनता देशास अग्रस्थानी मानून तत्व प्रणाली यांना दुय्यम स्थानी मानेल की तत्त्वप्रणालीसच देशाच्या डोकीवर ठेवेल ? याचे उत्तर मला माहीत नाही. मात्र एवढे निश्चित की, जर देशापेक्षाही तत्त्वप्रणाली श्रेष्ठ मांनण्यात आली तर पुन्हा एकदा आपल्या देशाचे स्वातंत्र्य धोक्यात येईल. आणि ते परत कधीही मिळणार नाही.”
पण याप्रमाणे क्रांती कधी होणार? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराचे राष्ट्र घडवण्यासाठी आज संघटित प्रयत्न, भक्कम सामाजिक संघटनेची नितांत गरज आहे. आज भारतामध्ये विविध संघटनांच्या गर्दीमध्ये प्रत्येक जण स्वतःला श्रेष्ठ मानण्यात धन्यता मानताना दिसतो आहे .अशावेळी उद्दिष्टाला प्रमाण मानून चालणाऱ्या संघटनांची निवड महत्त्वाची ठरते .व्यक्ति कितीही मोठी असली तरी तिच्या चरणी आपले सर्वस्व गहाण ठेवू नका, हा विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपणास दिला आहे. मात्र आज व्यक्ती तितक्या संघटना असे चित्र पाहायला मिळते. कोणतीही व्यक्ती म्हणजे संघठन अशी जर धारणा असेल तर त्याला संघठन म्हणता येत नाही. ती त्या व्यक्तीची टोळी असू शकते. मात्र जे संघठन कुणा एका व्यक्तीच्या नावाने न ओळखता संघटनेच्या नावाने ओळखले जात असेल तर ते खरे संघटन होय. त्यामुळे या देशात अशा संस्थायीकरण झालेल्या संघटना सोबत आत्मविश्वासू अनुयायांनी जुळले जाणे अत्यावश्यक आहे. यातच क्रांतीची बीजे दडलेली आहेत.

भारतीय संविधानाच्या पायावर आदर्श राष्ट्रनिर्मितीचा संकल्प हेच या महापरिनिर्वाण दिनाचे अभिवादन ठरेल !

✒️लेखक:-एम. डी. चंदनशिवे, शिरताव, ता. माण, जि. सातारा (इतिहास अभ्यासक, सामाजिक विचारवंत) मो. 9766423235
संकलन – सचिन सरतापे (प्रतिनिधी, म्हसवड) मोबा.9075686100

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here