Home महाराष्ट्र कर्ते समाज सुधारक – सत्यशोधक महात्मा जोतीराव फुले स्मृतिदिन विशेष

कर्ते समाज सुधारक – सत्यशोधक महात्मा जोतीराव फुले स्मृतिदिन विशेष

156

✒️संकलन:-आबासाहेब राजेंद्र वाघ, धरणगाव(मो:-९४२२९४१३३३)

महात्मा ज्योतिराव फुले
जन्म : ११ एप्रिल १८२७
मृत्यू : २८ नोव्हेंबर १८९०

महात्मा जोतीराव फुले यांचा जन्म ११ एप्रिल १८२७ रोजी पुणे येथे झाला. जोतीबांच्या आईचे नाव चिमणाबाई तर वडिलांचे नाव गोविंदराव असे होते. जोतीबा लहान असतानाच त्यांच्या आईचे निधन झाले. गोविंदराव शेती व फुलांचा व्यवसाय करत असत. त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली होती. गोविंदरावांनी जोतीबास वयाच्या सातव्या वर्षी पहिल्या वर्गात टाकले. जोतीबा अत्यंत बुद्धिमान होते. त्यामुळे शाळेत त्यांनी आपला वेगळा प्रभाव निर्माण केला. गोविंदरावांकडे असलेल्या ब्राह्मण कारकुनाने जोतीबा शाळेत गेल्यास बिघडेल, शेती बुडेल, फार मोठे नुकसान होईल, अशी भिती घातल्यामुळे गोविंदरावांनी जोतीबाची शाळा बंद केली. १८४० मध्ये गोविंदरावांनी जोतीबाचे लग्न सावित्रीबाईंशी लावून दिले. सावित्री ही सातारा जिल्ह्यातील नायगाव येथील खंडोजी नेवसे पाटील यांची सर्वगुण संपन्न कन्या होती. जोतीबांच्या फुलबागेशेजारी मुस्लीम समाजातील गफार बेग मुन्शी राहत होते. गफार बेग आणि ख्रिश्चन असलेले लिजीट साहेब यांच्या अभ्यासपूर्ण चर्चा जोतीबा ऐकत आणि अधूनमधून चर्चेत सहभागीही होत असत.

शाळेत न जाणारा हा मुलगा प्रचंड बुद्धिमान आहे, ही बाब या दोघांच्याही लक्षात आल्यानंतर त्यांनी गोविंदरावांची भेट घेतली व जोतीबाला परत शाळेत पाठवण्यासाठी आग्रह धरला. त्यामुळे १८४१ ला जोतीबांचे शिक्षण पुन्हा सुरू झाले. ब्राह्मण कारकून असलेल्या व्यक्तीमुळे बंद पडलेले जोतीबाचे शिक्षण मुसलमान गफार बेग मुन्शी आणि ख्रिश्चन लिजीट साहेब यांच्यामुळे पुन्हा सुरू झाले. जोतीरावांना मराठी, इंग्रजी, हिंदी, संस्कृत, उर्दू, मोडी अशा अनेक भाषा अवगत होत्या. महात्मा जोतीराव फुले यांचे शिक्षण संपल्यावर त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारी एक घटना घडली. आपल्या ब्राह्मण मित्राच्या लग्नाच्या वरातीतून कर्मठ ब्राह्मणांनी त्यांना अपमानित करून हाकलून दिले. या घटनेचा त्यांच्या मनावर खोलवर परिणाम झाला. माझी ही अवस्था असेल तर सामान्य लोकांचे काय हाल असतील ? या गोष्टीचा अभ्यासू व चिकित्सक असलेले जोतीराव विचार करू लागले. पवित्र कुराण व हजरत महंमद पैगंबर या बाबत जोतीरावांना आत्यंतिक आदर होता. यातूनच महंमद पैगंबरावर त्यांनी पुढे प्रदीर्घ पोवाडा लिहिला. हिंदू धर्मातील मनुस्मृती संहितेनुसार निर्माण झालेली चातुवर्ण्य व्यवस्था व जातिव्यवस्था हेच हिंदू धर्मातील विषमतेचे खरं कारण असल्याचे त्यांच्या लक्षात आले आणि शिक्षण हाच यावर उपाय आहे, याची जाणीवही त्यांना झाली. बहुजन समाजाची अवनती का झाली याचे वर्णन करताना जोतीबा म्हणतात ,

“विद्येविना मती गेली ।
मतीविना निती गेली ।
नितीविना गती गेली ।
गतीविना वित्त गेले ।
वित्ताविना शूद्र खचले ।
एवढे सारे अनर्थ एका अविद्येने केले ।।

” महात्मा जोतीराव फुले यांनी १ जानेवारी १८४८ मध्ये भारत देशातील पहिली मुलींची शाळा सुरू केली. मुली शिकल्या तर धर्म बुडेल असं सांगून सनातनी ब्राह्मण मंडळींनी शाळा बंद पाडण्यासाठी जोतीबांना त्रास द्यायला सुरू केला. गोविंदरावांना जोतीरावांना घरातून हाकलून देण्यास भाग पाडले. उस्मान शेख यांनी जोतीरावांना आश्रय दिला. याच उस्मान शेख यांच्या भगिनी फातिमा शेख या पुढे सावित्रीबाईंसोबत मुस्लीम समाजातील पहिली शिक्षिका म्हणून शाळेत शिकवण्याचे काम करू लागल्या. महात्मा जोतीरावांनी शिक्षणासोबत प्रबोधनाचे काम सुरू केले. मेळा, जलसे, नाटके उभे करून समाजप्रबोधन करू लागले. तृतीय रत्न हे नाटक व शेतकऱ्याचा आसूड हे पुस्तक त्यांनी लिहिले. शेतकरी व समाजामध्ये जागृतीचं काम सुरू केले. जातिभेद निर्मुलन व अस्पृश्यता निर्मुलनाचं काम जोतीरावांनी सुरू केलं. अस्पृश्यांसाठी शाळा सुरू केल्या.

अनाथ बालकांसाठी बाल सुधारगृह चालवले. संकटात सापडलेल्या काशीबाई नावाच्या ब्राह्मण समाजातील महिलेला आत्महत्या करण्यापासून परावृत्त केलं. तिला आधार दिला. तिला झालेलं मूल पुढे दत्तक घेतलं, त्याचं नाव यशवंत ठेवलं आणि त्यास डॉक्टर बनवलं. भ्रूणहत्या, बाल सुधारगृह अशी कामे सुरू केल्यामुळे सनातनी मंडळींचा विरोध प्रखर वाढलेला होता. परंतु विरोधाला न जुमानता जोतीरावांचे कार्य अविरतपणे चालूच होते. केशवपनासारखी वाईट प्रथा बंद करण्यासाठी त्यांनी न्हाव्यांचा संप घडवून आणला. विधवा पनुर्विवाहाला उत्तेजन दिले. इंग्रजी आपली जागतिक भाषा, ज्ञानभाषा म्हणून इंग्रजी शिकण्याला प्रोत्साहन दिले. महात्मा फुले यांनी समाजामध्ये पसरलेल्या अज्ञान व गरिबीचं कारण हे धर्मातच असल्याचे ओळखले होते. धर्माने स्त्री व शूद्रांना वेद वाचण्याचे अधिकार नाकारले होते. तुकोबांनी जसे अभंग लिहिले तसे जोतीबांनी अखंड लिहिले. सिंधू संस्कृतीचा शोध १९२५ मध्ये लागला परंतु त्यापूर्वीच १८५० ते १८९० या कालखंडात भारतीय मूळ संस्कृती सिंधू संस्कृती ही अतिशय विकसित व प्रगत असलेली कृषी संस्कृती आर्यांनी कशी उध्वस्त केली याचं यथार्थ वर्णन जोतीरावांनी केले .

आर्यांच्या इराणी नाही भेदाभेद । घ्यावा हाच शोध । वेदामध्ये ॥१ ॥ गोंड – भिल्ल – क्षेत्री होते मूळ धनी । इराणी मागूनी । आले येथे ॥२ ॥ धिंगाणा मांडिला । आर्य भटोबांनी । स्वदेशाभिमानी । रक्षू गेले || ३ || यज्ञभंग केले । झोडीले लुटीले ।
दस्यू नाव दिले । ब्राह्मणांनी ॥४ ॥

चार्वाक, बुद्ध, महावीर, कबीर, बसवेश्वर, चक्रधर, नामदेव, तुकाराम यांच्याप्रमाणे जोतीबांनी धर्मचिकित्सा सुरू केली होती.

आमच्या देशीचे अतूलस्वामी वीर । होते रणधीर । स्मरू त्यास ॥ धृ ॥ बळीस्थानी आले शूर भैरोबा । खंडोबा – जोतीबा । महासुभा ( म्हसोबा ) ||१|
सदगुणी पुतळा राजा मूळ बळी । दसरा दिवाळी । आठविती || २ || क्षेत्रिय भार्या इडापीडा जावो । बळी राज्य येवो । अशा कां बा म्हणती?३॥
आर्यभट आले । सूवर्ण लुटीले । क्षेत्रीदास केले । बापमत्ता ॥४ ॥
वामन का घाली बळी रसातळी ।
प्रश्न जोती माळी । करी भटा ॥५ ॥

छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक कामगिरीचा शोध या देशात सर्वप्रथम महात्मा जोतीराव फुले यांनीच घेतला. इ.स. १८६९ ला रायगडावर जाऊन सर्वप्रथम जोतीराव फुलेंनी शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली. समाधीची जागा साफसूफ करून, धुवून त्यावर फुले वाहिली. समाधीचं पूजन केले. पुण्यामध्ये १८७० ला आपल्या सहकाऱ्यांसोबत भव्य शिवजन्मोत्सव सुरू केला. कुळवाडी भूषण हा छत्रपती शिवाजी महाराजांवरील प्रदीर्घ पोवाडा लिहून प्रकाशित केला. यातूनच प्रेरणा घेऊन गुरूवर्य कृष्णराव केळूस्कर यांनी शिवरायांवरील मराठीतील पहिले शिवचरित्र लिहून प्रकाशित केले. थोडक्यात जगातील पहिली शिवजयंती सुरू करण्याचा मान जोतीबांना जातो. छत्रपती शिवाजी महाराजांनी वैदिक व्यवस्था झुगारून देत २४ सप्टेंबर १६७४ रोजी अवैदिक पद्धतीने दुसरा राज्याभिषेक करून घेतला. सर्व विधी ब्राह्मणेत्तरांकडून पार पाडले. मदारी मेहतर या मुसलमान व्यक्तीने राजसिंहासन साफसूफ करून त्याचे पूजन केले. बहुजन समाजाला धार्मिक अधिकार दिल्याची ही ऐतिहासिक घटना. या दिवसाचे महत्व लक्षात घेऊन महात्मा जोतीबा फुले यांनी २४ सप्टेंबर १८७३ रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. याच माध्यमातून सत्यधर्माची घोषणा केली. सत्यधर्मात एकूण ३३ कलमे आहेत. जोतीबा – सावित्रीस मूलबाळ नव्हते. तेव्हा जवळच्या नातेवाईकांनी दुसऱ्या लग्नाचा आग्रह धरला.

यावर सावित्रीमध्ये दोष असेल तर मी दुसरे लग्न करेन ; पण जर माझ्यात दोष आढळला तर तुम्हाला सावित्रीचे दुसरे लग्न लावून द्यावे लागेल. अशी अट घातल्यामुळे पुन्हा कोणी जोतीरावास दुसऱ्या लग्नाचा आग्रह केला नाही. एक आदर्श पती म्हणून जोतीराव जगले. भारत देशात मुला – मुलींना शिक्षण घेण्याचा अधिकार महात्मा जोतीराव फुले व सावित्रीमाई फुले यांनी मिळवून दिला. जोतीबा एक उत्तुंग व्यक्तिमत्व होते. त्यांची साहित्यसंपदा प्रचंड मोठी आहे. तृतीयरत्न हे १८५५ च्या सुमारास जोतीरावांनी लिहिलेलं मराठी भाषेतील पहिले नाटक होय. याचाच अर्थ जोतीराव हे मराठी भाषेतील आद्य नाटककार होते. गावातील ब्राह्मण जोशी शेतकरी कुटुंबास कसं फसवतो यावर हे नाटक आधारित आहे. ‘ब्राह्मणांचे कसब’ , ‘शेतकऱ्याचा आसूड’ , सार्वजनिक सत्यधर्म’ , अशा महत्वपूर्ण ग्रंथाची निर्मिती जोतीबांनी केली. जोतीबांकडे वडिलोपार्जित श्रीमंती होती. तसेच त्यांनी ‘पुणे कमर्शियल अँड कॉन्ट्रॅक्टींग कंपनी’च्या नावाने एक बांधकाम कंपनीही सुरू केलेली होती.

या माध्यमातून आलेला पैसा, वडिलोपार्जित संपत्ती, देणग्या हा सर्व पैसा त्यांनी शिक्षण आणि समाजकार्यावर खर्च केला. महात्मा जोतीराव फुले पुण्यात राहत असताना त्यांच्या घराचा क्रमांक ३९५, गंजपेठ असा होता. फुलेंचं तत्वज्ञान ज्या घरात जन्माला आले ती चौकट भारतात निर्माण व्हावी यासाठी भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटना तयार करताना त्यात ३९५ कलमे घातली. एवढे महात्मा फुलेंचे महत्व आहे. अशा या महान कर्ते समाजसुधारकाचे २८ नोव्हेंबर १८९० रोजी निधन झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here