Home Education उच्च वर्णीय व्यवस्थेचा कर्दनकाळ-राष्ट्रपिता महात्मा फुले

उच्च वर्णीय व्यवस्थेचा कर्दनकाळ-राष्ट्रपिता महात्मा फुले

197

आधुनिक भारताचे आद्यक्रांतीकारक देशाचे पहीले आणि खरे राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले. तसही व्यवस्थेने, प्रसारमाध्यमांनी महात्मा जोतीबा फुले यांच्या विचारावर, क्रांतीवर कधी सखोल जाऊन विचाराचे मंथन घडवून आणलेच नाही. परंतु कोंबडा आरवला नाही म्हणून सुर्य उगण्याचे थांबत नाही. तीच बाब महात्मा फुले यांच्या बाबतीत घडली. महात्मा फुले यांची क्रांती व विचार समाजापर्यंत जाऊच नये म्हणून अनेक प्रयत्न झाले परंतु काही प्रामाणिक आणि अभ्यासु लोकांमुळे आजही महात्मा फुलेंची क्रांती व विचार समाजामध्ये जिवंत आहे. काही ठिकाणी महात्मा फुलेंचा उल्लेख फक्त स्त्रिशिक्षणाचे उद्धाते एवढाच करून स्रियांसाठी शिक्षणाची सोय करून दिली अशा ओझरत्या ओळीमध्ये वर्णन केले जाते. परंतु महात्मा फुलेंची क्रांती ही कोणत्याही पुस्तकात बंदिस्त होऊ शकत नाही. महात्मा फुले स्रि शिक्षणाचे उद्धाते होतेच. त्यांनी स्रियांच्या शिक्षणासाठी जिवाची बाजी लावली पण पहिलांसाठी शिक्षणाची द्वारे खुले करून स्रियांसाठी शैक्षणिक क्रांती केली. परंतु याची जाणीव आजच्या शिकलेल्या स्रियांना नाही.

महात्मा फुले क्रांतीमा सावित्रीमाई फुले यांच्या बद्दल आजच्या शिकलेल्या, पुढारलेल्या, आस्था वा आपुलकी राहली नाही कारण त्यांनी कधी जोतीबा फुले यांना वाचले ऐकले नाही आणि व्यवस्थेने महात्मा ज्योतिबा फुले स्रियांपर्यंत पोहचू दिले नाही. महात्मा फुलींनी फक्त शैक्षणिक क्षेत्रातच क्रांती केली नाही तर अनिष्ट रुढी परंपरा, जातीय भेदभाव, पुरोहीतांची वर्षानुवर्षे चालत आलेली गुलामी, पाखंड, अंधविश्वास आणि शेतकऱ्यांच्या शोषणा विरुद्ध क्रांती करून उच्च वर्णीयांच्या विषमतावादी, शोषणवादी, अज्ञान आणि पाखंडवादी व्यवस्थेला सुरुंग लाऊन समतावादी, विज्ञानवादी, बुद्धीप्रामाण्यवादी व्यवस्था निर्माण करून बहुजन समाजाचा उद्धार केला. *महात्मा फुलेंच्या लिखाणात शुद्र हा शब्द वारंवार येतो, आणि शुद्राला शुद्रांची जाणीव नाही म्हणून आजही ते माणसिक गुलाम आहेत. नेमके शुद्र म्हणजे कोण समजून घेऊ. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शुद्र असे चार वर्ण होते, ब्राह्मण हा सर्वश्रेष्ठ वर्ण तो सर्वांना माहिती आहे. आजही ब्राह्मण आहेत.

दुसरा क्षत्रिय तर परशुरामाने तेवीस वेळा पृथ्वी निक्षत्रिय केली म्हणजे क्षत्रियांचा नाश केला याला सत्य माणले तर पृथ्वीवर क्षत्रिय शिल्लकच नाहीत, तिसरा वर्ण वैश्य म्हणजे व्यापार करणारा म्हणजेच मारवाडी, राहीला चौथा वर्ण म्हणजे शुद्र तर शुद्र म्हणजे अठरा पगडजाती, बारा बलुतेदार आणि तेरा आलुतेदार म्हणजे शुद्र. पण आज बहुतांश भारतीय समाज ज्यांना शुद्र समजतो थोडक्यात महार मांग यांना शुद्र समजतो परंतु महात्मा फुले यांनी यांनी अतिशुद्र म्हणून संबोधले कारण याची दखल ब्राम्हणी व्यवस्थेने आणि इतिहासाने सुद्धां घेतली नव्हती. थोडक्यात शुद्र म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय, आणि मारवाडी सोडून ईतर सर्व.

उच्च वर्णीयांनी शुद्रांना माणसिक गुलाम बनवून माणवाचे नैसर्गिक हक्क अधिकार हिरावून घेतले होते. नैसर्गिक साधन संपतीचा वापर सुद्धां शुद्र आपल्या मर्जीने करू शकत नव्हते. थोतांड, पाखंड रचुन त्याच्या कथा सांगुन समाजामध्ये अंधविश्वास निर्माण करण्याचे काम पुरोहीतांकडुन म्हणजे उच्च वर्णीयांकडून होत असे. सामाजिक क्रांती घडून माणसिक स्वातंत्र्य मिळवायचे असेल तर ब्राम्हणांच्या अनिष्ट रुढी प्रथा परंपरा झुगारून देणे आवश्यक आहे म्हणून त्यांनी कर्मठ विषमतावादी ब्राह्मण व ब्राम्हण्यवादी व्यवस्था यावर प्रखर भाष्य करून प्रबोधन केले.
*बामनी कावा, समजून घ्यावा*
*आहेत आकलेचे खबरदार*
*शहाणे ठग आरपार*

*ब्राम्हणाचे येथे नाही प्रयोजन*
*द्यावे हाकलून, ज्योती म्हणे*
अशा प्रकारे ब्राम्हण व त्यांच्या कर्मठ आणि विषमता वादी कृतीला महात्मा फुले यांनी नाकारले. ब्राह्मण निर्माण विषमतावादी व्यवस्था थोतांड, पाखंड यावर सुद्धा महात्मा फुले यांनी सडकून आसुड ओढले.
*भुता देवांचे थोतांड,एकची जाहले*
*मुख्य देव तो कळेना, कशास काहीच मिळेना*
*एकास एक वळेना, अनावर*
शुद्र लोकांना अनेक देवांची निर्मिती करून देवा धर्मात गुंतवून शिक्षणा पासून दुर ठेवले. देवांचा फायदा शुद्रांना कधी झाला नाही पण देवांमुळे पोरोहीत जगला हे वास्तव सत्य सर्व प्रथम महात्मा फुले यांनी मांडले. देवा धर्मामुळे समाज अज्ञानी आणि अंधविश्वासु बनला धर्माच्या निर्मीतीने माणुस माणसापासुन दुर गेला. माणसाला देव कधी पावला नाही. आणि देव आणि माणूस यांच्या मध्ये मध्ये करणारा मात्र कधी उपाशी मेला नाही म्हणून महात्मा फुले लिहतात…
*रडू लागे शेजाऱ्याशी, आसु नाही डोळे पुसी*
*मोल घेई रडू लागे,बहुरुपी आणि सोंगे*
*सर्वसाक्ष जगत्पती, त्याला नको मध्यस्थी*
*विटाळसा तोडी ताल, करी पुजा घेई मोल*
*मुढा देऊनिया थाप, पापी करीतो बा जप*
*भोदु भट शुद्रांघरी,देई थापा पोटभरी*
*ऐका जोतीबाचा सार, घाला देवावर भार*

महात्मा फुले यांनी तेव्हा मांडलेले मत आजही तंतोतंत बरोबर ठरतात. आजही हिच परिस्थिती आहे. जन्मापासून मरेपर्यंत वेगवेगळ्या देवाची पुजा अर्चा, कर्मकांड घडवून आणले जाते आणि हे करताना दक्षिणा स्वरूपात सर्व काही दान दिले जाते. अंधविश्वास आणि थोतांड आजही देशात एवढे आहे की शाळा गरिब आणि मंदिरे श्रीमंत आहेत. आणि मंदिराचा पैसा आजही बहूजन समाजाला मिळत नाही. भुलथापा, पाखंड सांगुन समाजाला आजही भुलविण्याचे काम सुरू आहे. आणि हे भुलथापा चे काम अविरत सुरू राहुन आपली सोय कायम रहावी म्हणून काही धर्म मार्तंड, कर्मठ लोक महात्मा फुलेंचे नाव सुद्धा घेत नाहीत.

अनिष्ठ रुढी परंपरा झुगारून मानवाच्या सर्वागीण विकासाचे संस्कार महात्मा फुले यांनी रुजवले. सतीप्रथा बंद करून विधवा पुर्नविवाहास प्राधान्य देऊन घडवून आणले. पतीच्या निधनानंतर केशवपन केले जायचे ती प्रथा बंद करून महिलांमध्ये स्वाभिमान निर्माण करून दिला. आतंरजातीय विवाह घडवून समाजामध्ये नवीन आदर्श निर्माण करून दिला. काशीबाई नावाची एक ब्राह्मण बाई जी विधवा होती, विधवा ब्राह्मण काशीबाई गरोदर राहील्या गरोदर राहीलेल्या काशीबाई जिवन संपविण्याच्या तयारी मध्ये असताना एका ब्राह्मण बाईला जिवनाचा आधार देऊन तिला जगण्यासाठी बळ दिले. तिची व्यथा बघून महात्मा फुले यांनी विधवा गरोदर महिलांसाठी बालहत्या प्रतिबंध गृहाची निर्मिती करून विधवा महिलांचे पालनकर्ते जोतीबा फुले बनले. काशीबाई यांनी एका मुलाला जन्म दिला आणि त्याच मुलाला दत्तक घेऊन महात्मा फुले यांनी त्याला डॉक्टर बनवले आणि हेच डॉक्टर म्हणजे डॉ यशवंत फुले होय. वेद हे काल्पनिक गोष्टी चा प्रसार करून समाजामध्ये चुकीची माहिती पसरवतात म्हणून त्यांनी वेदाला झुगारले. कोणत्याही प्रकारचा अवतार महात्मा फुले यांना मान्य नसल्याने त्याने वारंवार अवतार व वेद नाकारून बुद्धीप्रामाण्यवाद समजामध्ये रूजवला.

स्पृश्य अस्पृश्यता ही समाजाला लागलेली किड आहे पुरोहितांनी निर्माण केलेली अस्पृश्यता ही माणसाला पाणी पिण्याचा अधिकार नाकारत होती म्हणून महात्मा फुले यांनी अस्पृशांसाठी स्वतः च्या घरातील पाण्याचा हौद रिकामा करून, समता प्रस्थापित करून धर्माच्या ठेकेदारांच्या छातीत लाथ मारली. धर्माच्या नावाखाली लोकांना अज्ञानी ठेऊन त्यांना माणसिक गुलाम बनवणे हे काम निच आणि नितीहीन आहे असे महात्मा फुले यांना वाटायचे. माणसाला दुय्यम आणि हिन समजणारे ग्रंथ आणि रुढीपरंपरा महात्मा फुले यांनी कधीच मान्य केल्या नाहीत. उलट भुलथापा, दक्षिणा, यावर त्यांनी नेहमीच आसुड ओढून विषमतावादी आणि निच व्यवस्थेला फटकारले.

*विद्याहीन, शुद्र पाहुणी*
*हळुच कसा गांठीतो त्याला*
*लागतो पोथ्या वाचायला*
पोथ्या पुराण वाचुन लोकांकडून अर्थ अर्जन करणारे लोक समाजाला वर्षानुवर्षे अज्ञानात ठेवले जाते. आजही लोक शिकले पण सुज्ञ आणि सज्ञान झाले असे नाही कारण महात्मा फुलेंचा आसुड त्यांना कळालाच नाही. धर्म फक्त एक पाखंड आहे आणि पुरोहिताच्या उदरनिर्वाहासाठी चे साधन आहे म्हणून त्यांनी धर्मावर सुद्धा आसुड ओढून समाजाला जागृत केले. पण समाज आजही झोपलेला आहे. कारण आजही त्यांचीच व्यवस्था काम करत आहे.
*चांडाळास, उष्टे देण्यास*
*मनाई धर्मी, ब्राम्हणास*
*पाप जोडे देता तुम्हास*
*काय तुझा धर्म, कळु दे रे वर्म*
*भिक्षा शुद्राची खातोस*
*कोणता धर्म तुझा खास*

असा सवालच व्यवस्थेला करून उच्च वर्णीयांची व्यवस्था नाकारणारे महात्मा जोतिबा फुले हे निर्भिड क्रांतिकारक होते. महात्मा फुले यांना प्रत्येक ठिकाणी उच्चवर्णीय व्यवस्था चालवणाऱ्या लोकांकडून विरोध झाला, गृहत्याग करावा लागला, महात्मा फुले यांना मारण्यासाठी मारेकरी पाठवले, वडिलांचे अंत्यसंस्कार करण्यापासून दूर ठेवले, महात्मा जोतिबा फुले स्रियांना शिक्षण देत होते त्यांना अडवणारे, महिला शिक्षणाला विरोध करणारे लोक आजही समाजा मध्ये जिवंत आहेत, आणि बहुतांश लोकांना महात्मा फुलेंची क्रांतीच माहिती नाही. आज आधुनिक भारताची जडणघडण करणाऱ्या महात्मा जोतीबा फुले यांचा स्मृती दिन, त्यांच्या स्मृतीदिनी त्यांच्या कार्यास व क्रांतीस नमन.
*************************************
✒️विनोद पंजाबराव सदावर्ते(रा. आरेगाव ता. मेहकर)मो:-९१३०९७९३००
*************************************

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here