Home महाराष्ट्र मी कसा आहे..?

मी कसा आहे..?

335

आपल्याच देशातल्या एका सुप्रसिद्ध उद्योगपतींची ही कहाणी आहे.एक दिवस हे उद्योगपती सकाळी तयार होऊन कामाला जाण्यासाठी निघाले होते. तेवढ्यात त्याच्या समोर घरमालक येऊन उभा राहिला. “आज कसं येणं झालं..?” उद्योगपतींनी त्या माणसाला विचारले. कामाच्या नादात ते विसरून गेले होते की,समोर त्यांचा घरमालक उभा आहे. घरमालक विनम्रपणे म्हणाला,”मी भाडं वसूल करायला आलो आहे. दर महिन्याला तुम्ही पाठवता. यावेळेला कामाच्या गडबडीत राहून गेलेलं दिसतं.”

उद्योगपती वरमले आणि म्हणाले, “हे घ्या तुमचं घरभाडं.उशीर झाल्याबद्दल क्षमा करा.” एवढे बोलून उद्योगपतींनी खिशात हात घालून पैसे काढले व घरमालकाला दिले.घरमालक उद्योगपतींलना म्हणाला,” तुम्ही एवढे मोठे उद्योगपती असून भाड्याच्या घरात राहता,याचे मला आश्चर्य वाटते.” यावर उद्योगपती हसले व म्हणाले, “मी कोण आहे यापेक्षा मी कसा आहे याला महत्त्व आहे. माझ्या काही तत्त्वांमुळे मी भाड्याच्या घरात राहतो.” घरमालक काही समजला नाही. तो भाडे घेऊन निघून गेला.

हा प्रसंग त्या उद्योगपतींचा ड्रायव्हर पाहत होता. उद्योगपती गाडीत बसले व आपल्या परदेश प्रवासासाठी तिकीट काढायला एका एअरलाईनच्या ऑफिसात गेले. तिथे बरीच गर्दी होती. उद्योगपती एका सामान्य माणसासारखे रांगेमध्ये उभे राहिले.तेवढयात एअरलाईनच्या काही कर्मचाऱ्यांनी त्यांना पाहिले, ते घाईने पुढे आले आणि म्हणाले,”सर, तुम्ही रांगेत का उभे आहात..? आम्ही तुमचे तिकीट काढून तुम्हाला आणून देतो. तुम्ही समोरच्या सोफ्यावर आरामात बसा. तुम्ही रांगेत उभे राहून आम्हाला लाजवू नका.”
उद्योगपती म्हणाले, “आत्ता मी उद्योगपती म्हणून इथे उभा नाही, तुम्ही एवढी धावपळ करण्याची आवश्यकता नाही. ‘उद्योगपती’ हे माझ्या नावासमोर लावलेले विशेषण आहे. मी कोण आाहे यापेक्षा मी कसा आहे? हे अधिक महत्त्वाचे आहे.” एअरलाईनचा स्टाफ हे उत्तर ऐकून चकित झाला.

तिकीट काढून उद्योगपती आपल्या ऑफिसकडे निघाले. रस्त्यात त्यांना अनेक माणसे धावतपळत आपापल्या कार्यालयाकडे जाताना दिसली. त्यांना लाज वाटली की, आपण एवढ्या अलिशान गाडीमधून एकटे प्रवास करीत आहोत. सामान्य माणसे मात्र किती कष्टाने ऑफिसला पोहोचतात. त्या दिवसापासून त्यांनी आपल्या गाडीत लोकांना लिफ्ट द्यायला सुरुवात केली. लिफ्ट मिळालेल्या लोकांचा आनंद पाहून उद्योगपतींना समाधान वाटायचे.

एके दिवशी हे उद्योगपती परदेश प्रवासासाठी निघाले होते. त्या दिवशी एक प्रसंग घडला. हवाई सुंदरीच्या हातून त्यांच्या अंगावर चुकून पेय पडले. त्यामुळे ती घाबरली. तिने पाणी व कपडा आणून त्यांचा ड्रेस स्वच्छ केला. ती त्यांना ओळखत असल्याने तिने शतदा त्यांची क्षमा मागितली. तिला भीती वाटत होती की, या चुकीबद्दल तिला शिक्षा घडणार.. उद्योगपतींनी तिच्याकडे पाहिले व तिला विचारले, “तू माझ्या अंगावर काय सांडलेस ?'” हवाई सुंदरी भीत भीत म्हणाली, “माझ्या हातून तुमच्या कपड्यांवर फळांचा रस सांडला, मला क्षमा करा.उद्योगपती हसले व म्हणाले, “पुढच्या वेळेला माझ्या अंगावर सोडा, व्हिस्की सांड”. उद्योगपतींचे बोलणे ऐकून हवाई सुंदरी खुदुकन हसली. तिच्या मनावरचा सगळा ताण एका क्षणात उतरला.असे अनेक प्रसंग उद्योगपतींच्या ड्रायव्हरने पाहिले होते. त्याची उत्सुकता चाळविली गेली. तो उद्योगपतींना म्हणाला, “साहेब, तुम्हाला इतके साधे राहणे व वागणे कसे काय जमते..? आम्ही तर अर्ध्या हळकुंडाने पिवळे होतो. तुम्ही एवढे मोठे उद्योगपती असून तुम्ही किती साधे जगता??”

उद्योगपती म्हणाले, “अरे, मी लहान असताना फार उद्दाम होतो. मला सांभाळायला एक दाई होती. एकदा माझ्या मनाविरुद्ध काही घटना घडली तेव्हा मी तिला चक्क लाथ मारली होती. ते पाहून माझे वडील एवढे संतापले होते की, त्यांनी मला बदडून काढले. ते मला म्हणाले होते, *”तू कोण आहेस हे बिलकूल महत्त्वाचे नाही; पण.. ‘तू कसा आहेस’ हे फार महत्त्वाचे आहे. आयुष्यभर माझे हे वाक्य स्मरत राहा.”

“तेव्हापासून मी वडिलांचे शब्द स्मरत आलो आहे. मला हे पटले आहे की, ‘खरोखरच आपण कोण आहोत’ हे महत्त्वाचे नसतेच. ‘आपण कसे आहोत’ यावर आपली किंमत ठरते. जगात जेवढे थोर पुरुष होऊन गेले, सगळे साधेच होते.”
या उत्तुंग उद्योगपतीचे नाव ..
‘रतन टाटा…’

खरंच, जगात जेवढी उत्तुंग माणसे होऊन गेली ती सगळी बोलायला, वागायला अत्यंत साधी..कुठलीही गुंतागुंत नसलेली.अशी असतात.खरेतर.साधे राहणे हेच कठीण असते. व्यक्तींच्या जीवनाचे आपण अनुकरण करायला हवे.म्हणूनच, “तुम्ही कोण आहा.” हे महत्वाचे नाही, “तुम्ही कसे आहात” हे महत्वाचे आहे.

✒️संकलन: सागर रामभाऊ तायडे(टाटा पॉवर कंपनी सेवा निवृत्त कर्मचारी)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here