




विधवांना सन्मानाने समाजा जगता यावे यासाठी समाजात प्रचलित असलेल्या अनिष्ठ विधवा प्रथेचे निर्मुलन होण्या संदर्भात महाराष्ट्र राज्य सरकारने घेतलेल्या स्त्युत्य निर्णयाचे स्वागतचं करुन, त्याची राज्यात सर्वचं समाज घटकांनी अंमलबजावणी केली पाहिजे. महाराष्ट्र शासनाना निर्णय म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड ग्रामपंचायतीने ५ मे मे २०२२ रोजी विधवा प्रथा बंद करण्या संदर्भात घेतलेल्या क्रांतीकारी परिवर्तनवादी ग्रामसभा ठरावाचं हे यश म्हणावं लागेल. शासनाच्या निर्णयांने अशा कालबाह्य विधवा प्रथा बंद होणार असल्या तरी, त्यांना समाजात मंगल प्रसंगीही सहभागाची अन् सन्मानाची वागणूक मिळून, त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन अन् मानसिकताही बदलली पाहिजे.
जन्म अन् मृत्यू हे माणसाच्या आयुष्यातील कटू सत्य आहेत हे विश्ववंदनीय तथागत गौतम बुध्दांनी २५०० वर्षापुर्वी सांगितले आहे. ज्याला जन्म आहे त्याला मृत्यूही अटळ आहे अन् मृत्यू हा कधीचं स्त्री, पुरुष अथवा जाती धर्मात भेदभाव करत नसला तरी, मृत्यूनंतर स्त्री पुरुषांमध्ये आजही समाजात अनेक ठिकाणी भेदभाव, विषमता दिसून येते, हे पुरुष सत्ताक संस्कृतीचे दळभद्री लक्षण आहे की विकृत सनातनी रुढी परंपरेचा शाप आहे ? महिलांसंदर्भात चालीरीतींना छेद देण्यासाठी अनेक महापुरुष, समाज सुधारकांनी प्रयत्न केले. त्यात त्यांना यश आले असले तरी, समाज सुधारणावादी धोरणांमुळे आपलं अस्तित्व धोक्यात येईल म्हणून इथल्या व्यवस्थेला काही सुधारना मान्य नव्हत्या असे दिसून येते.
एखाद्या व्यक्तीचे निधन झाल्यास त्या व्यक्तीच्या पत्नीची एखाद्या विधवा महिलेकडून वेणी फणी करुन, केसात फुलांचा गरजा घातला जातो, मळवट भरुन माहेरुन आणलेली नवीन साडी असेल तर ती परिधान केली जाते, मंगळसुत्र घातले जाते, ओटी भरुन पतीला तिरडीवर ठेवल्यानंतर त्याच्या पायाजवळ बसविले जाते अन् काही वेळातचं तिचा मळवट पुसला जातो, मंगळसुत्र काढले जाते, हातातील बांगड्या फोडल्या जातात.. सर्व मनाला न पटणाऱ्या अघोरी कृती केल्या जात होत्या. जी मुलगी जन्मापासून कुंकू अथवा टिकली लावते, तिच्या लग्नानंतर तिच्या पतीचे निधन झाले म्हणून तिचे कुंकू पुसण्याचा कोणाला काय अन् कोणी अधिकार दिला होता ? किंवा तिचा शृंगार उतरविण्याचे कारण तरी काय ? तिच्या पतीचे निधन झाले तर त्यात तिचा काय दोष आहे ? कोणत्याही घरगुती किंवा सार्वजनिक कार्यक्रमात तसेच इतर ठिकाणी अक्षरशः तिला गौण, दुय्यम स्थान देणे, त्यांना सर्वचं बाबतीत निर्बंध घालणे योग्य आहे का ? पतीच्या निधनानंतर महिलेचे हक्क हिरावून घेऊन उर्वरित आयुष्यात समाजाची अवहेलना सहन करावे लागत असेल तर ते माणुसकीच्या कोणत्या कक्षेत बसते ? मात्र, त्याच ठिकाणी एखाद्या व्यक्तीच्या पत्नीचे निधन झाल्यास तो विधूर होतो पण त्याला कोणतीही बंधने नसतात. त्याला सर्व काही अधिकार अन् माफ असते.
चालीरीती, रुढी परंपरा पुर्वीपासून चालत आल्या आहेत म्हणून डोळेझाक करुन त्या पुढे चालू ठेवणे किंवा स्विकारणे योग्य आहेत का ? एखादी गोष्ट योग्य आहे की अयोग्य हे आपण कधी ठरविणार आहोत की नाही ? चालीरीती, रुढी परंपराबाबत आपण कधी चिकित्सक बनणार आहोत की नाहीत ? धार्मिक श्रध्दा अन् श्रध्दांवर आधारीत चालीरीती, रुढी परंपरा संदर्भात आपण डोळस कधी होणार ? श्रध्दा अन् अंधश्रध्दा म्हणजे काय ? बदलत्या परिस्थितीनुसार आपण आपल्या कपड्यात, राहणीमानात बदल करतोचं ना ? मग, कालबाह्य रुढी परंपरांचे निर्मुलन करण्यासाठीही सर्वांना पुढाकार घ्यायला काय हरकत आहे ? समाज परिवर्तनाची, समाज सुधारणाची परिभाषा बदलायची असेल तर, मनुवादी चौकट मोडावीचं लागेल.
अशिक्षित नव्हे तर सुशिक्षित समाजही परंपरागत, रुढीवादी धार्मिक संस्कार अन् अंधश्रध्देच्या पाशातून आज मुक्त होतांना दिसत नाही. स्वातंत्र्याच्या ७३ वर्षानंतरही भारतात विषमतावादी दृष्टिकोन आजही मोठ्या प्रमाणात दिसून येतो. विषमतावादी मुल्यांचा प्रसार, प्रचार अत्यन्त सोज्वळ अन् पध्दतशीरपणे होत आहे. अंधश्रध्देकडून श्रध्देकडे अन् श्रध्देकडून वैज्ञानिक, पुरोगामी तसेच प्रबोधनात्मक, सकारात्मक प्रगल्भ विचारसरणी अंगीकारण्याची आज महाराष्ट्रालाचं नव्हे तर, देशालाही नितांत गरज आहे. त्यामुळे, प्रस्थापित व्यवस्थेचे बळी ठरण्यापेक्षा सुसंस्कृत समाज अन् विज्ञानवादी देश घडविण्यासाठी विधवा प्रथे सारख्या अरिष्ठ, घातक रुढी परंपरेचे सरसकट निर्मुंलन करणे नितांत गरजेचे आहे.
✒️मिलिंद कांबळे(चिंचवलकर)मो:-९८९२४८५३४९




