




तब्बल चार वर्षांनंतर मौजे उदगीर जि.लातूरला माझी आतेबहीण अर्चनाताई गोस्वामी हिच्या घरी जाण्याचा योग आला. योग कशाचा! तो योग माझा आतेभाऊ किरण भारती आणि त्याचीच बहीण म्हणजेच अर्चनाताई या दोघा भाऊ बहिणीने घडवून आणला. म्हणजे त्यांनी खूप आग्रह करून मला माझ्या घरून एकप्रकारे त्यांच्या गाडीत उचलून टाकले. मी पण त्यांच्या आग्रहाला नाही म्हणू शकलो नाही. आता कुठे जायचे म्हटल्यावर सुरुवातीला नकार दाखवावा लागतो. तसा मीही माझा होकारार्थी नकार दाखवला; जो त्यांनी सहज ओळखला. आग्रहाखातिर तथा माझ्या इच्छेनेच, मी दिनांक 15 मे ला मौजे उदगीरला मार्गस्थ झालो; आणि पोहचलोही!
उदगीर म्हणजे केवळ लातूर जिल्ह्यातील एक तालुका नसून व्यापारी दृष्टीने गजबजलेले आणि माणसांनी भरलेले जिल्हा स्तराचे एक मोठे शहर आहे. 95व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामुळे, आता उदगीरची जगाला वेगळी ओळख सांगण्याची गरज नाही. तसा इतिहास सांगायचा झाला तर पानिपतच्या लढाईची सुरुवात उदगीर मधून झाली होती. निजाम व मराठे यांच्यात झालेली 1760 ची प्रसिद्ध लढाई ही उदगीर मध्ये झाली, या लढाईत निजामाचा मराठ्यांनी पराभव घडवून आणला. ज्याचे नेतृत्व मराठा वीर सदाशिवराव भाऊ यांनी केले होते.
उदगीरला ऐतिहासिक तसेच शैक्षणिक वारसा पण लाभलेला आहे. उदगीर हे शिक्षणाच्या बाबतीत पुढारलेले शहर आहे. महाराष्ट्रातील प्रसिद्ध ‘लातूर पॅटर्न’ची सुरुवात पहिल्यांदा ‘श्यामलाल मेमोरियल हायस्कूल’ येथे झाली. नंतर सर्वत्र पसरली. उदगीरमध्ये वैद्यकीय, अभियांत्रिकी, कृषी, विधी महाविद्यालये आहेत. तसेच महाराष्ट्रातील पाच पशुवैद्यकीय महाविद्यालयापैकी एक महाविद्यालय उदगीर मध्ये आहे.
उदगीर शहर हे सुपारी फोडण्याच्या ‘आडकित्ता’ यासाठी प्रसिद्ध आहे( हिरा अडकित्ता). लातूर जिल्ह्यातील सर्वात मोठी बाजारपेठ येथे भरते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे तिरंगा ध्वजाचे कापड उदगीर येथे तयार केले जाते. तसेच उदगीर मध्ये जवळपास 80 दालमिल्स आहेत. व्यावसायिक क्षेत्रात उदगीर अग्रेसर आहे.
उदगीर शहराची आणखी एक ओळख म्हणजे इथले पर्यटन! त्यात उदगीरचा भुईकोट किल्ला, रोकडे मारुती, इच्छापूर्ती हनुमान मंदिर, दुधिया हनुमान मंदिर, हत्तीबेट, साईधाम, सोमनाथपूर मंदिर, हवागी स्वामी मठ, इथली यात्रा आणि मुघलकालीन बांधणी असलेला चोबारा आहे. उदगीर मधील ‘कल्पना सिनेमागृह’ हे मराठवाड्यातील सर्वात मोठे म्हणजे 75 एम.एम. चे सिनेमागृह आहे. बॉलीवूडस्टार जॅकी श्रॉफचे जन्मस्थान उदगीरच!
उदगीरची सर्वात महत्वाची ओळख आणि वैभव म्हणजे इथला निजामकालीन ‘उदयगिरी भुईकोट किल्ला’ होय. इ.स. 1685 ला एका शिलालेखात ‘मुर्तझा निजामशहा’च्या काळात ही इमारत बांधली गेल्याचे म्हटले आहे. या किल्ल्यातच परमपूज्य उदागिर बाबाचे समाधीस्थळ तथा उदगीर मधील आणि लातूर जिल्ह्यातील लाखो श्रद्धालूंचे हे पावन स्थळ आहे. त्या समाधीस्थळाची गेल्या कैक शतकांपासून देखरेख करणारे घराणे म्हणजे ‘गोस्वामी घराणे’ होय! ज्याची आताची पिढी म्हणजे ‘जयेशगीर सतिशगीर गोस्वामी’ होय. (उदागिरबाबा मठसंस्थान,उदगीर, मठाधीश ) म्हणजे माझी आतेबहिण अर्चानाताईचा मुलगा होय.
माझ्या लेखाची खरी सुरुवात इथूनच होते. आता हे उदागिरबाबा मठसंस्थानचे मठाधिश व त्यांचे कुटुंबिय ज्या ठिकाणी राहतात त्या ठिकाणाला ‘उदागिरबाबा मठ’ म्हणतात. हे ठिकाण उदयगिरी किल्ल्यापासून आग्नेयेला साधारणतः 700-800 मीटर अंतरावर असेल. याच ठिकाणी उदागिरबाबाचा निवास होता.
उदागीरबाबाचे जे सुरुवातीला सेवेकरी तथा शिष्य होते, म्हणजे ‘काशीगीर महाराज’ यांपासून शिष्य परंपरा सुरू आहे. उदागीरबाबाच्या जीवंत समाधीनन्तर त्यांच्या मरणोपरांत ही गुरू-शिष्य परंपरा आजतागायत कायम आहे. ज्याचा वारसा जयेशगीर महाराज चालवत आहेत. आता जयेशगीर व त्यांचे कुटुंबीय उदागिरबाबाची मनभावे सेवा करतात. उदागीरबाबाचे समाधीस्थळ किल्ले उदायगिरीमध्ये आहे; तिथे रोज पूजा-अर्चा होत असते. जयेशगीरचे राहण्याचे ठिकाणही हे उदगीरबाबा मठच आहे.
मठ नाहीतर ते एक घर आहे; ज्याचे क्षेत्रफळ जवळपास 12,500 चौ.फु.आहे. जिथे माणसांसोबत पशु,पक्षी, हिरवीगार वृक्षराजी आनंदाने एकमेकांना आधार देऊन एकमेकांच्या सहवासात राहतात. त्यामुळे या घराला देवकाळातील मठाचे स्वरूप प्राप्त होते.
इथे जवळपास 125 प्रकारच्यावर वृक्षराजी आहेत. त्यात सावलीचे घनदाट कडुलिंब असो की सुगंधित फुलांचे गुलाब असो, नाहीतर वेलवर्गीय मधु-मालती, सोबत भाजीपालासह कैक वनस्पतींचा समावेश आहे. इथे जन्म घेणारा माणूस असो की पशु त्याच्या इच्छेनेही बाहेर जाऊ शकत नाही की तो मरू शकतो; इतकी प्रेमळ माणसे या घरात आहे. घरातील प्रत्येक माणूस समान प्रेमाच्या अत्युच्च शिखरावर असून प्रत्येकाचे व्यक्तिमत्त्व व कर्तुत्व वेगवेगळे आहे. अर्चनाताईचा छोटा सुपुत्र घरचा अभियंताच आहे. ज्याला जोडण्यापासून तोडण्यापर्यंत सर्वच जमते. घराचे छत टिपकू दया की त्याला उभारण्याची वेळ येऊ दया सोनू महाराज सदैव अग्रेसरच असतात. जयेशला प्राण्यांबद्दल विलक्षण माया आहे. कबुतर, कैक प्रकारचे पोपट (कॉकटेल पोपट), वेगवेगळ्या रंगीबेरंगी चिमण्या( लवबर्डस चिमण्या), वेगवेगळ्या जातीचे श्वान जे रोट्या, पेडिग्री एकूणच काय माणसे जे अन्न खातात ते खाऊन श्वान असण्याचा आनंद लुटतात; जो त्यांच्या नशिबी आला. इथला एक कबुतर दोन वर्षांनंतरही पुन्हा स्वगृही आला. पक्षांना ना दाण्याची कमतरता आहे ना पाण्याची! राहायला उंचावरती त्यांना ठिकाण आहे. श्वानालाही सुसज्ज निवारा सोनू महाराजच्या कृपेने लाभला आहे.
इथले जांभूळ, पेरू, डाळिंब, आंबा, सीताफळ कधी चाखून पहा! माणसे गोड की फळे? काही कळणारच नाही! इतकी एकमेकांना सोज्वळ,निर्मळ सांगण्याची स्पर्धा-प्रथा आहे. दोन जावा ज्योती-शांता बहिणीच! भाऊ तर भाऊ आहेच, त्यापेक्षा मित्र अधिक आहेत. मग जयेश-तेजस(सोनू) असो की सचिन-किरण असो! मोत्यांचे तेजस्वी खडेच!
यांच्या कुटुंबाविषयी मी का लिहितोय? कारण, व्यापक स्तरावर ते माझे कुटूंबच आहे. आमच्या घरातला प्रत्येक माणूस इथे सालातून एकदा भेट देतोच! आनंद घेतो अन् देतो. जगण्याचा आनंद लुटतो. कुटुंबासाठी झटणे काय असते; हे पाहून तो येतो. चेहऱ्याची दातखिळी इथे आपोआप खुलते; इतके दात हसरे दिसतात. नाराजीचा सूर पार पाण्यात बुडालेला असतो. वर यायचा प्रयत्न जर त्याने केला तर बुडवायला खाली त्याला हाताचा मुक्का घेऊन प्रत्येकजण तत्पर असतो.
घरात नोकर असो की मालक प्रत्येकाचा वाढदिवस साजरा होतो. घरात 10 माणसे असतील तर 15 जणांचा स्वयंपाक होतो, आणि 15 च्या जागी 17 जण कधी खाऊन जातात, ते कळतही नाही. कोणी कोणावरही विनोद करू शकतो; विनोद सहन करू शकतो. मोठ्यांचा आदर आहे, पण भीती अजिबात नाही.
या घरातील सर्वांचे लाडके,सर्वपरिचित, हसरे,निर्मळ, दिलखुलास, खुशमीजाज व्यक्तिमत्त्व म्हणजे किरण महाराज! किरण महाराज म्हणजे माझे आतेभाऊ!(अर्चना ताईचा सख्खा छोटा भाऊ) जे उदागिरबाबाचे पुजारी सोबत तालुका- उदगीरच्या पुजारी संघटनेचे अध्यक्ष आहेत. अर्चना ताईला मदत करण्यासाठी गेल्या दोन दशकांपासून इथे पाय रोवून घट्ट उभे आहेत. लक्ष्मणासारखा भाऊ तुम्ही रामायणात पाहिला असेल तर हा कलयुगातील लक्ष्मणच! जो गावाकडील शेतीवाडी, धंदापाणी, मित्र परिवार, आप्तस्वकीय सोडून बहिणीसाठी ढाल म्हणून उभा राहिला, खडा आहे.
किरण महाराज ज्यांना ओळखत नाहीत, आणि यांना जे ओळखणार नाहीत ते अख्ख्या उदगीर नगरीत सापडणे दुर्मिळच! यांना पाहून ज्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडणार नाही; तो दिसनेही क्वचित! बोलून जो समाधान देऊ शकतो; आणि ज्याच्या सोबत राहण्याने जीवन जगण्याचे औषध मिळते ते किरण महाराज याच घरात राहतात. म्हणून, माणसे राहणे म्हणजे घर नाही, किंवा चार भिंती म्हणजेही घर नाही. जिथे माणसे बोलतात आणि एकमेकांना खुश ठेवण्यासाठी प्रयत्नशील असतात, जिथे वाद व्हायला घाबरतो, जिथे दुःख प्रवेश करण्यासाठी परवानगी घेते; ते असते घर!
घरातील जवळच्या रक्ताची नाती घट्ट सापडणारी कुटुंबीय सापडतीलही! पण, आपले मामा, त्यांची पोरं, आत्या, मावशा यांनाही त्याच ऋणानुबंधात बांधणारी खरी कुटुंबव्यवस्था यांनी बांधून ठेवली आहे.
अर्चनाताई जी पंचेचाळीशितील देखणी स्त्री, जी घराचा खरा पाया आहे. तिचेच हे संस्कार आहेत. जे ऋणानुबंध टिकवायला प्रत्येकाला भाग पाडत आहेत. जिला फक्त देणे माहिती आहे. अन् एवढे देऊन तिने घेतले काहीच नाही; घेतले असेल तर आमचे निख्खळ प्रेम! जे मोठया श्रीमंतालाही लाखो उधळून मिळणार नाही. या आमच्या प्रेमाने जणू ती जगातील सर्वात श्रीमंत स्त्री झाली असेल. तिची दुसरी ओळख म्हणजे ‘झाडांची माय’! तिला माणसे अन् झाडे यात काही फरक वाटतच नाही. घरात वाढणारी फळझाडे, भाजीपाला, फुलांची बाग ही तिनेच फुलवली अन् वाढवली. त्याची ती मालकीण आणि इथल्या आनंदाची खजिनदार ती!
मी एक घर पाहिलं म्हणजे; घरातल्या भिंती पाहिल्या नाहीत. आजकाल घरात अंगण कमी, भिंती जास्त झाल्यात; तिथे मी निव्वळ अंगण पाहून आलो; तिथे हसणारी-हसवणारी वृक्षराजी पाहिली. भिंती होत्या; काही पक्क्या तर काही पडक्या! ज्या पडक्या होत्या त्या सोबतच्या विटेला पक्क्या धरून होत्या. एकमेकींना आधार देत होत्या. जिथल्या समाजात माणसे तुटायला घाईत असतात तिथे भिंतीही सजीवपणाची साक्ष देत होत्या; ते घर मी पाहिले. ऑक्सिजन झाडातून तर घेतलाच पण माणसात प्राण ओतणारी माणसे मी पाहिली.
आता दोन- चार दिवसात मीही माझ्या स्वगृही जाईल, पण इथली ऊर्जा आठवून-आठवून आनंदात जीवन जगणे काय असते, याची मजा इतरांना वाटण्यासाठी यांनी दिलेली शिदोरी पुरवून-पुरवून खाईल!
धन्यवाद!
✒️लेखक:-अमोल चंद्रशेखर भारती(नांदेड)मो:-8806721206
( लेखक अर्चना ताई गोस्वामीचा मामे-भाऊ आहे.)




