Home चंद्रपूर परकी हरद

परकी हरद

199

(आगामी झोडपा या झाडीबोलीतील कथासंग्रहातून )

लगनाचा बोवला अन मांडवडेर जस्यान तसी ऊबी होती . सुतावलेल्या मांडवाचे डार अजून वाराचे होते . सदाच्या आंगाची हरद उतरली नोवती . नानमुकापासून सनासारका गजबजला बाजीरावचा घर आज येकायेकी सुतकी झाला होता . रुकमी दारोट्यातस कपार दाबून हतबल बसली होती . अहिगाच्या मडक्याक येकटक पायत ताराबुडी वेड्यागत सोतासिस पुटरत होती . खाली मान घालून ऊबा सदा आन बाजव बसलेला गजानन जमा झालेल्या लोकाइपुढे काईस बोलत नोहते . सारे कसे स्यांत स्यांत . थोडा येर कोनी आवाज केला नसता तर ती भयानक चुपी पाहून येकाद्याचा जीव जाईल की का , असे वाटत होते . बरा झाला सरपंचाने समजवत मनले , ” गजाननराव झाले ते झाले , सप्पा ठीक होईल . असा दुक करत बसल्याने हाती काय लागनार आहे . जा सर्व जेवन करून घ्या .” जमलेल्या लोकाइला हुकूम सोडत सरपंचाचा आवाज चढला , ” चला न बे सगडे आपापल्या घरी , मांजर जनल्यावानी दाटन करून रायले .” त्याबरोबर येक येक जन आपापल्या घरचा रस्ता धरले . घडीभर थांबून सरपंचइ निगुन गेले . खायला उठलेला अंदार दूर करन्यासाठी रुकमाने लावलेला बल दातकड काढत चिडवत असल्याचा सदाला भास होत हॊता . गजाननला तर मेल्याऊन मेल्याच्या यातना काय असतात याची जान होऊन वेदनेच्या इंगड्या कटाकट चावत होत्या . साऱ्यांची खान्यावरची वासनास उडून गेली . कोनी कोनासी काईइ न बोलता झोपी गेले . दाटलेल्या अंदारापेक्स्या मनातील दुःख अधिक खोल बनत गेले . त्याला कारनइ तसेस होते .

पंचक्रोशीत अगाजलेल्या गजानन पाटलाच्या सदाचे लगन नात्यातल्या बाजीरावच्या राधासी जुडले . गजानन पाटील मंजे तालुक्यातील मातब्बर असामी . जमीनजुमला आन वतनदारी इतकी की हिसोब करता करता दिवानजी थकायचा पन आवक थांबायची नाई . त्यास तोडीचा बाजीराव लानपनचा जिगरी , यातून सोयरीक जुडून आली . सदा दावी नापास असला तरी हिरोवानी रुबाब आन अधिकाऱ्यावर असलेला वचक यापाइ त्याची येगरी वडक तयार झाली होती . बाजीरावची राधा पदवी घेऊन सेयरात रायत असल्याने खेड्यातील जीवन तिला नकोसे वाटे . पन दोन दोस्ताइचा याराना या सोयरकीतून अधिक घट्ट झाला . लानपनी आपल्या हातचा आरनभात येका ताटात सारपुन खानारे इवाई बनताहेत मनल्याव ताराबुडी – गजाननच्या मायले आबार ठेंगणे वाटाले लागले . पिकला पान या सोयरकीने अदिक हिवराकंच बनून टवटवीत दिसू लागला . ‘जुन्याले पडल्या रुन्या , नव्याच्या पडदुन्या ‘ मनाची काई गरज पडली नाई . याचा ताराबुडीला हरिक वाटत होता . नातवाच्या उजवन्याची खुसी लपवता लपत नोयती . खानदानी अधिकारान तिने गावातील बायकांना हाताखाली घेऊन हुकूम सोडत दरन कांडन आन तांदूर दार चोखार पाखार करून घेतले . रुकमाला सोबत पकडत असल्या नसल्या नातलगासाठी अहिराचे कपडेलत्ते घेऊन ताराबुडी लगनाचे तांदूर टाकायला उत्सुक होती .

बाजीरावने राधीसकट सदाला सोन्याने मढवून काढलं .सदासाठी राजदूत फटफटी मंडपात चमकत होती . गजानननेही दंडोकात कोनतीस कसर सोडली नाई . नाचनाऱ्या घोड्याव बसलेल्या सदाच्या वरातीतील बँडबाजा आयकून लोकाइच्या कमरेत लचक भरली नाई त नवल . गुडा सोडून बोहल्यावर आलेल्या सदामोर राधा आली आन दोगाइचा सोबनारा जोडा पाहून दंग झालेल्या पावन्यापरीत ताराबुडी डोक्सीच्या चाराव बोट मोडून गदगद झाली . गजानन अन बाजीराव जोडीने तांदराचा अभिसेक करून लेकरांना आसिर्वाद देत होते . नवाडे -जुने असा कोनतास भेदभाव न करता धुमधडाक्यात लगन लागले . दोन दोस्ताइच्या पिरतीची गोडी पंचपक्वान्नाच्या पंगतीत भरली होती . सुत गुंडलेल्या नवरदेव नवरीला टीका लावत वराडी सुलगन लावत होते . दोनी दोस्ताइचा राबता सरल्या सरत नोयता . झाल पडता कडस वाहून झाला . राधी अन तिच्या मयतरनीच्या डोऱ्यातले पानी थांबता थांबत नोवते . राधीची माय आनंदातइ पोरीच्या विरहाने मुसमुसुन डोरे लालबुंद करून बसली . सोबा पाटलिनने वला झालेला सेव येका हातात पकडून नात्यातल्या मिरेला सवकन मनुन जासाठी नजरेने खून केली , तसी लगबगीने मीरा बॅग भरून तयारीतस गाडीपासी ऊबी रायली . जोडे लपवलेल्या मुलींना सदाने दोन हजार देऊन जोडे पायात लावून द्यायला भाग पाडले . दोन ट्याक्टरात मावेल इतका आलेला अइर भरून सदाचे दोस्त थमसप पेन्यासाठी पैस्याची मागनी करतास गजाननने हजाराची नोट थ्याइच्या हातात ठेवली . सारे कसे धुमधडाक्यात पार पडत होते . बाजीरावने दिवा दिला अन सिदोरी घेऊन गजानन वरात घेऊन गावाकडे निगाला .
लगन लावून गावात आलेली वरात चवकातल्या मारोतीच्या देवरात थांबली . ढोल तास्याच्या गजरात पोराबारांनी नाचत घरावरी पोचाले रातीचे नव वाजवले . तोवरी पावनेपरी इतर तयारीला लागले होते . वरात मांडवात येतास रुकमाने सदा अन राधावरून भाताचे उंडे ववाडुन फेकत कडाकड बोट मोडले . तवरी पावन्या बायकांनी नानोऱ्यासाठी भांडे मांडून चवरंग पाट सजवला होता . नवरदेव नवरीने पाच फेऱ्या मारत भांड्याला सुत गुंडत त्यात हरद अक्स्यदा टाकल्या . पाच बायकांनी सदा अन राधाव परडा धरून आंगोड घातली . सदाने राधाला अलगद उचलत देवाऱ्यापासी नेले अन राधा नवीन कुरात मिसरली . जेवनखान झाले सारे आनंदात झोपी गेले पन मधल्या खोलीत राधा अन तिची सवकन मीरा कोनाले आयकू जानार नाई अस्या दबक्या आवाजात रातभर बोलत बसल्या . दिवस उगवतीक तांबडा फुटला तरी त्या दोगीचा डोरा लागला नोयता .पावन्यांनी गजबजलेले गजानन पाटलाचे घर तोरन पानानी फडफडून हासत होते . रुकमा पूजेच्या सामानाची जुडवाजुडव करण्यात गुतली होती . अयरात आलेल्या सामानाची ठेवरेव करण्यात राबती-मानस जोमाने भिडली . जत्रेसारका रमोजा मांडवघरी ,जसा उरूस भरला पाटलाच्या दारी . पन अजूनइ मधल्या खोलीतल्या कोनट्यातील तकसपोताव बसलेली राधा कोनत्या ईचारात गडून गुमसुम बसली होती . हे तिची सवकन मनुन आलेल्या मिराला न समजल्याने ती बुटारून गेली होती . नवाड्या घरी अबक वाटत असावे की घडून गेलेल्या गोस्टी भुतासारक्या विचारचक्राच्या मानगुटीव बसल्या होत्या .
धोतराचा नवीन खन घेऊन पूजा सांगायला आलेला पुंडलिक बोवा आल्या आल्या केरीच्या पानाने सजवून ठेवलेल्या चवरंगासमोर घट मांडून खारक-सुपारीची नवग्रह मांडनी केली . सजवल्या आरतीतील उदबत्त्या पेटवून पूजेसाठी घाई करणारा पुंडलिक बोवा मंत्र पुटपुटू लागला . पूजेची घटका झाली तरी राधा खोलीतून बायर आली नाई , तसा सदा तिला बोलवायला आत गेला . राधाची बॅग तकसपोतावर ठेवली होती .बाजूला कपडे इकरवाकर पडले होते . लगनात लावलेला स्यालु जमिनिव घोरत कुलरच्या हवेने झलाऱ्या मारत होता . सारा कोपरा न कोपरा नजरेखालून गेला पन राधा अन तिची सवकन मीरा कोटी चवली नाई . मधली खोली फक्त कालच्या राती कोनी दोन नारी कोनट्यातल्या तकसपोताव बसून काहीतरी खुसुरपुसुर करत होत्या , हा इतिहास बनला . सदाची हरद उस्टी होन्याआदी कोनाला तरी पिवरा करन्यासाठी उडून गेली होती . चेयरा पाडून येकटा बायर आलेला सदा काई सांगायच्या आदी ताराबूडीचा अनुभवी सूर साऱ्याइच्या कारजाला भोक पाडत होता . कडसपानी चढन्याआदी सदाची हरद परकी होऊन घरान्यातील इब्रतिला डाग लावून गेली .

(आगामी *झोडपा* या झाडीबोलीतील कथासंग्रहातून )

✒️लक्ष्मण खोब्रागडे(जुनासुर्ला,ता.मूल,जि.चंद्रपूर)मो:-९८३४९०३५५१

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here