Home बीड पाणीटंचाईचे भयाण वास्तव; भाकर नसली तरी चालेल पाणी मिळावं, वयोवृद्धांची आर्त हाक

पाणीटंचाईचे भयाण वास्तव; भाकर नसली तरी चालेल पाणी मिळावं, वयोवृद्धांची आर्त हाक

170

✒️नवनाथ आडे(जिल्हा प्रतिनिधी बीड)मो:-9075913114

बीड(दि.16मे):-जिल्ह्यात पाणी टंचाईच्या झळा सोसताना सर्वसामान्यांला अवकळा आली आहे. पाण्यासाठी भटकंती करून तहान भागवणाऱ्या, बीडच्या वारोळा गाव आणि तांड्यावरील पाणीटंचाईचे भयाण वास्तव समोर आलंय.वाड्या वस्ती तांडा सुधार योजनेअंतर्गत मूलभूत पिण्याच्या पाण्यासाठी, लाखो रुपये खर्च करून राबवलेल्या पाणीपुरवठा योजना कागदावरच आहेत. यामुळे पाण्यासाठी वयोवृद्धांसह गावकऱ्यांना एक ते दीड किलोमिटर पायपीट करावी लागतेय. या अगोदर पाणी पुरवठा योजनेसाठी या गावात तब्बल 90 लाख रुपयांचा खर्च झाला आहे, असं गावकरी सांगतात. आता नव्याने 68 लाख रुपयाच्या जल जीवन मिशन योजनेचं काम देखिल निकृष्ट दर्जाचं सुरु असल्याचा आरोप केला जात आहे.

बीडच्या माजलगाव तालुक्यातील 4 हजार लोकवस्तीच्या वारोळा गावात, जोडतांडा, मार्गादेवी तांडा आश्रमशाळा तांडा, असे तीन तांडे आहेत. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोक राहतात, मात्र आजही वयोवृद्ध लोकांच्या डोक्यावरील हंडा पाहून तळपायाची आग मस्तकाला जाईल. पाण्यासाठी जिवाचा आटापिटा करून हातपंपावर पाणी भरणाऱ्या मातामावल्या ही परिस्थिती आहे, बीडच्या वारुळा गावातील.गावात पाणीपुरवठ्यासाठी 3 विहिरी करण्यात आल्या या विहिरीला पाणी देखील लागले, मात्र आज प्रत्यक्ष या विहिरीचे पाणी सरपंच आणि त्यांच्या नातेवाईकांच्या शेताला जात आहे. गावाला पाणीपुरवठा केला जावा, यासाठी तब्बल 90 लाख रुपये आणि आत्ता सुरू असलेली 68 लाख रुपयाची योजना एवढा पैसा खर्च करूनही. एकीकडे गाव मात्र पाण्यापासून उपाशी असताना, पाणीपुरवठाच्या लाखो रुपयांच्या योजना जिरवून स्वतः तूपाशी राहणाऱ्या लोकप्रतिनिधींवर कारवाई केली जावी, अशी मागणी होत आहे.

वारोळा गावातील जोड तांड्यावरील 65 वर्षीय धुनाबाई पवार यांना, या वयात पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागते आहे, लांबून पाणी डोक्यावर शेंदून आणावं लागतंय. मात्र पाणी आणण्याशिवाय पर्याय नाही, आमच्यासारखे गरीब माणसाकडे नळ योजना आली नाही. मतदानाच्या वेळेला येतात, मात्र आता आमच्याकडे कोणी येत नाही. पाणी घेऊन येताना हंडा घेऊन पडले तर एका माणसाने मला उचलून उभा केल. खूप मोठी परेशानी आहे पाणी मिळत नाही. पाण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी धुनाबाई यांनी केली.

आमच्याकडे सरकारी योजना काही आली नाही. गावातून पाणी आणावं लागतं बैलगाडी जुंपून पाणी घेऊन येतो.. तिथे पाणी मिळत नसेल तर रानमळामधून पाणी आणावं लागतं. परिस्थिती अवघड आहे. पाणी जपून वापरावा लागतो, योजना गावात झाली मात्र आमच्याकडे आली नाही, असं पुतळाबाई पवार यांनी सांगितलं.. डोक्यावरून पाणी आणावं लागतं, हापशाला देखील खूप मोठी गर्दी असते. बराच वेळ पाणी आणण्यासाठी जातो असं गावातील महिलांनी सांगितले.

दोन किलोमीटर वरून जाऊन पाणी आणावं लागतंय. आमच्याकडे पाण्याची काही योजना नाही, त्यामुळे खूप मोठी अडचण आहे. पाणी पुरवठा योजनेचे पैसे आले, मात्र आमच्याकडे पाणी आलेच नाही. दुसऱ्याच्या विहिरीतून शेंदून पाणी आणावे लागते, माझ्या घरामध्ये सात ते आठ लोक आहेत, त्यांना लागणार सर्व पाणी डोक्यावर आणावं लागतं. गावच्या सरपंचाला विचारला तर करू म्हणतात, मात्र आतापर्यंत काहीच योजना केली नाही. असं रामराव पवार यांनी सांगितलं. वारुळा गावात तिन्ही तांडयावर पाणी पुरवठा व्हावी, यासाठी या अगोदर 90 लाख रुपयांची योजना राबवली. मात्र ती निकृष्ट दर्जाची योजना झाल्यामुळे पाणी आले नाही. आता नव्याने नळजोडणी योजनेसाठी 68 लाख रुपयाची योजना सुरू आहे.मात्र त्या ठिकाणी वापरले जाणारे साहित्य यात पाईप हलक्या प्रतीचे वापरला जात असून काम बोगस पद्धतीने सुरू आहे. असा आरोप रमेश राठोड यांनी केला आहे.. गावातील विहिरीला पाणी उपलब्ध असताना या पाणीपुरवठा विहिरीचे पाणी सरपंचाचे नातेवाईक शेतीला वापरत आहेत. असा आरोप देखील गावकऱ्यांनी केला. उपाशी असताना सरपंचाचा शेतीला पाणी हे योग्य आहे का ? असा प्रश्न देखील गावकऱ्यानी उपस्थित केला.

या गावातील पाणीपुरवठा योजना संदर्भात गावचे सरपंच यांना संपर्क केला असता संपर्क होऊ शकला नाही. वारोळा गावात जल जीवन मिशन अंतर्गत सुरू असलेला 68 लाखाच्या पाणी पुरवठा योजने संदर्भात बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांना विचारले असता, मी या योजनेला प्रत्यक्ष भेट देतो, जर चुकीच्या पद्धतीने काम सुरू असेल, तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल. व काम थांबविण्याच्या सूचना देखील देतो, असं सांगितलं.

दरम्यान पाणी टंचाई मिटवण्यासाठी शासन स्तरावरून कोट्यावधीचा निधी पाणीपुरवठा योजनेसाठी दिला जातो. मात्र प्रत्यक्षात अधिकारी आणि गुत्तेदार यांच्या संगनमताने या निधीची वाट लावली जात आहे. तसेच लाखो रुपया पैसा खर्च होऊनही गावात पाणी येत नाही .. परिणामी वयोवृद्ध लहान मुलं व महिलांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागते ..त्यामुळे अशा योजनेचे काम बोगस करणाऱ्यांवर कारवाई केली जावी. अशी मागणी होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here