




“आजचे तापमान 44 अंश सेल्सिअस आहे.” सहज मित्राने मोबाईलवर लोकेशन टाकून पाहिले. घाम तर आधीच येत होता; आणि इतके भयानक तापमान पाहून तो अधिकच वाढायला लागला. मग, सुरू झाली खटपट, या गर्मीपासून कसे वाचावे याची. अर्थात तापमान काय आम्ही लगेच कमी करू शकत नव्हतो. सूर्य आग ओकत होता, आणि पारा तर त्या आगीचा रोजच वाढत होता. फॅन, कुलर काहीपण लावा; उकाडा असह्य होता.
मित्र म्हणाला, “तापमान का वाढत आहे?” मी म्हटले; “हे सर्व ‘ग्लोबल वार्मिंग’चे परिणाम आहेत.” आणि ‘ग्लोबल वॉर्मिंग’ केवळ ‘क्लोरोफ्लूरोकार्बन’ मुळेच होते; एवढेच सीमित नाही. झाडांची उत्तोरोत्तर होणारी कत्तलही या गोष्टीला कारणीभूत आहेच! भरपूर चर्चेअंती हे ध्यानात आले की झाडे लावणे ही काळाची गरज आहे. तसा झाडे लावूया, म्हणून मित्राने सोशल प्लॅटफॉर्मवर मेसेज फॉरवर्ड केला. त्यावरही भरपूर चर्चा झाल्या. मी सांगितलेली उपरोक्त गोष्ट गेल्यावर्षीची आहे. ज्यावर आजही चर्चाच होत आहेत. ऊन वाढले की चर्चा होते, आणि सावली आली की थांबते!
आमच्या इथे प्रत्येक विषयावर चर्चा करायला तज्ज्ञ मंडळी आहेत. सोशल प्लॅटफॉर्मवर तर याचा उत आला आहे. तज्ज्ञही असे जे दुसऱ्या एका तज्ज्ञाचा संदर्भ देऊन आपल्या ज्ञानाचा विस्तार करून स्वतः किती शहाणे हे समजावण्याचा नाहक प्रयत्न करतात. ज्यात प्रत्येकाला अव्वल यायचे असते. मोबाईलचा डेटा नाहीतर बॅटरी सम्पली की चर्चा मंदावते आणि दुसऱ्या दिवशी ऊन खूप, बॅटरी फुल्ल आणि डेटा दणक्यात असतो आणि चर्चा पुनः एकदा जोमात सुरू होते.
काय असते चर्चा?? झाडे लावावी लागतील. झाडांचे खूप महत्व आहे, लोकांत जागरूकता आणावी लागेल. वैगरे,वैगरे! नेतेमंडळी व सामान्य जनतेत खूप असमानता असेल पण एक साम्य आहे, विसरण्याचे! आश्वासने देऊन आणि ऐकून आपण एकदाच विसरतो. जे विसरत नाहीत, ते ध्यानात ठेवूनही काही एवरेस्टला पार करत नाहीत.
म्हणजे हे कसे आहे, लोकांना बहु ज्ञान सांगायचे आणि ज्ञानाचा उपयोग आपण करायचा म्हटले तर वेळकाढूपणा पुढे करायचा. झाडे लावा, झाडे लावा! पण, कोणी लावायचे? लोकांनी! आणि हे लोकं त्या ‘कोई मिल गया’ मधील ‘उडनतष्करी’तुन येणार आहेत का? जादू करायला! नाही येणार ते! लोकं, माणसे जे काही आहेत ते आधी स्वतःपासून सुरू होतात; आणि हे सर्व स्वतः एकत्र होऊन ‘लोकं-जनता’ बनते. म्हणजे माणसे मोजायची पण स्वतःला सोडून. कसा होईल पूर्ण लोकांचा पूर्णांक आकडा तयार! अपूर्णांक गणितीय आकड्यातच असतो असे नाही. आपण ते पुन्हा-पुन्हा नाकर्तेपणा दाखवून पुढे-पुढे आणतो.
व्हाट्सएपवर फालतू विषयावर चर्चा होणे, आणि झाडासारख्या कामाच्या विषयावर चर्चा होणे हे सारखेच फालतू काम. कारण, रिकाम्या चर्चेत जसा टाइमपास होतो, तसे इथे प्रत्यक्षात काही घडतच नसेल तर ते फालतूच की!
म्हणून संदेश देणे, आणि भाषण झोडणे सोडून द्या! पहिला जमाना होता, ऐकणाऱ्यांचा! आता ऐकणारे कमी आणि बोलणारे जास्त झाले; आणि कृती करणारे तर दारिद्र्यरेषेखालील असावेत इतके कमी म्हणजे ही प्रजाती नष्ट व्हायच्या मार्गावर आली आहे. त्यामुळे कृती करणाऱ्या माणसांचे अस्तित्व आहे, हे दाखवायचे असेल तर आधी कृती करा; मगच बोला!
एक झाड लावा; त्याचे संगोपन करा; त्याला वाढवा! मग बोला की दहा झाडे लावले एवढे! ऐकू की आम्ही! संवेदनशील होऊन आणि तुमच्याप्रति निष्ठा व आदर राखून.
एक सांगू शकतो. लोकांना ज्ञानी करायचे असेल तर त्यांचे मरणारे संस्कार वाचवायचे प्रयत्न करा. झाडांची कत्तल म्हणजे खून करण्यासारखे आहे; हे जनमानसाला पटवून द्यावे लागेल. त्यासाठी तुम्ही झाडे लावली का? म्हणून कोणी विचारणार नाही. फक्त, “मी झाडे तोडली नाहीत.” हे अभिमानाने सांगता आले पाहिजे. लोकांनी झाडे लावायची, त्याला कुंपण करायचे, पाणी द्यायचे आणि इतरांनी जनावरांना मोकळे सोडून नासधूस करू द्यायची. ही माणुसकी जीवंत असल्याची नक्कीच खूण नाही; पण कशाचातरी ‘खून’ तर आहेच की! मग हिंदीतील व मराठीतील वेगळा थोडा असतो. म्हणून रक्षक होत असाल तर तेही चांगलेच! क्रिकेटमध्ये फलंदाज धावा काढतो म्हणून जसे त्यांना महत्व आहे तसे विरोधी टीमला धावा काढण्यापासून रोकणाऱ्या फिल्डर्सला पण आहेच की! म्हणून काहीजणांनी झाडांचे रक्षण करणारे फिल्डर्स झाले तरी उत्तम. शेवटी, ज्यांच्यामध्ये जी योग्यता आहे, ते काम करावे. पण, झाडे वाढवण्यासाठी मी काहीतरी केले; याचे समाधान नक्कीच राहील.
आता मी हे का लिहिले? कारण मी माझ्या घरच्या गच्चीवर 50 आणि माझ्या कर्तव्याच्या ठिकाणी 100 झाडे लावलीत. त्याचे संगोपनही करतोय. काही वाढली, काही नाहीत! पण, झाडे लावल्याचे व त्यासोबत आनंदाने दिवस काढत असल्याची मनःशांती आहे. दरवर्षी माझ्या घरी, नाहीतर कोण्याही रँडम गावात काही झाडे लावेल. त्यांचे संगोपन करण्याची जबाबदारी घेईल. मला निसर्गाच्या भरभराटीसाठी जे योगदान देता येईल ते मी नक्कीच देईल. कारण,उद्या मला- “तुम्ही काही केले की नाही?” हे विचारायचे आहे. त्यासाठी आधी माझी योग्यता राहावी लागेल, म्हणून त्यासाठीचे हे होमवर्कच समजा!
याने काय केले? त्याने काय केले?
यात काढले अनेक वर्षे
आता करूया सुरुवात स्वतःपासून
जे मिळतील तितकी वर्ष…!!
✒️लेखक:-अमोल चंद्रशेखर भारती(नांदेड)मो:- 8806721206




