Home महाराष्ट्र गंगाखेड शहरातील प्रभागांची पुनर्रचना प्रभाग क्रमांक चार पासून !

गंगाखेड शहरातील प्रभागांची पुनर्रचना प्रभाग क्रमांक चार पासून !

260

🔹मधूनच केलेले बदल कोणाच्या हितासाठी ? – गोविंद यादव 

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.14मे):-गंगाखेड शहरातील प्रारुप प्रभाग रचनेवर गंभीर आक्षेप नोंदवण्यात आले आहेत. वाढीव सदस्य संख्येच्या निकषांनंतर सर्वच प्रभागांच्या रचनेत बदल अपेक्षीत असताना प्रशासनाने थेट चार क्रमांक प्रभागातून केलेले बदल कोणाच्या राजकीय फायद्यासाठी केले आहेत ? असा सवाल करत कॉंग्रेस तालुकाध्यक्ष गोविंद यादव यांनी हे बदल प्रभाग क्रमांक एक पासून करण्याची मागणी केली आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनतर नगर परिषदांच्या निवडणूकीचा कार्यक्रम पुन्हा सुरू झाला आहे. यात प्रारुप प्रभाग रचनेवर आक्षेप नोंदवून घेतले जात आहेत. गंगाखेड नगर परिषदेच्या प्रारुप प्रभाग रचनेवर प्रभागनिहाय अनेक आक्षेप नोंदवण्यात आले आहेत. मात्र, कॉंग्रेस तालुकाध्यक्ष गोविंद यादव यांनी संपुर्ण शहराच्याच प्रभाग रचनेवर गंभीर आक्षेप घेतला आहे.

यादव यांनी सादर केलेल्या लेखी आक्षेपात अनेक मुद्दे ऊपस्थित केले आहेत. यात म्हटले आहे, की राज्य शासनाने १७ टक्के सदस्य वाढीचा निर्णय घेतल्यानंतर शहरातील सर्वच प्रभाग रचनेत बदल अपेक्षीत होते. परंतू गंगाखेड नगर परिषद प्रशासनाने घाई गडबडीत, कसलेही सर्वेक्षण न करता चुकीची प्रभाग रचना केली आहे. प्रभाग क्रमांक १, प्रभाग क्रमांक २ व प्रभाग क्रमांक ३ हे तीन प्रभाग २०१६ प्रमाणेच ठेवण्यात आले आहेत. तर प्रभाग क्रमांक चार पासून मात्र रचनेत मोठे बदल करण्यात आले आहेत. हे तीन प्रभाग जुन्या पद्धतीने कायम ठेवत प्रभाग चार पासून केलेले बदल कोणाच्यातरी राजकीय फायद्यासाठी केले असल्याचा गंभीर आरोप गोविंद यादव यांनी केला आहे.

गंगाखेड नगर परिषद राज्य सरकारच्या निर्देशांकडे दुर्लक्ष करत असून राज्य शासनाच्या वाढीव लोकसंख्येचे गृहीतक गृहीत धरून प्रभाग क्रमांक १ पासूनच आवश्यक ते बदल करावेत, अशी मागणी गोविंद यादव यांनी केली आहे. ॲड प्रल्हाद डमरे हे याकामी कायदेशीर सहकार्य करीत आहेत.

*चौकट*
*…तर ऊच्च न्यायालयात दाद मागणार – यादव*
प्रशासनाने दिलेल्या मुदतीत या प्रभाग रचनेवर लेखी आक्षेप नोंदवण्यात आला आहे. जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसमोर याची सुनावणी होईल. या सुनावणीतून अपेक्षीत न्याय न मिळाल्यास आपण ऊच्च न्यायालयात दाद मागणार असल्याची माहीती गोविंद यादव यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here