




✒️नवनाथ आडे(जिल्हा प्रतिनिधी बीड)मो:-9075913114
बीड(दि.12मे):-जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्येची घटना अतिशय दुःखद आहे. शेतकऱ्यांचं अतिरिक्त ऊस पूर्णपणे गाळप करण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. शेतकऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलू नये, हात जोडून विनंती करतो एकाही शेतकऱ्याने आत्महत्या करू नये, असे आवाहन बीडचे जिल्हाधिकारी राधा बिनोद शर्मा यांनी, आयोजित पत्रकार परिषदेत केले आहे. आजच्या शेतकरी आत्महत्येच्या घटनेत कारखान्याची काही चूक असेल तर नियमानुसार कारवाई होईल. असा इशारा देखील जिल्हाधिकारी शर्मा यांनी दिला आहे. बीड जिल्ह्यात अतिरिक्त उसाचा प्रश्न पेटला असून कारखाना ऊस घेऊन जात नाही म्हणून, नामदेव जाधव या 30 वर्षीय तरुण शेतकऱ्याने ऊस पेटवून देत फडातीलचं लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.
त्यांनतर बीडचे जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी पत्रकार परिषद घेत, जिल्ह्यातील अतिरिक्त ऊस संदर्भात माहिती दिली. यावेळी शर्मा म्हणाले, की शेतकरी आत्महत्याची घटना दुःखद आहे. मी स्वतः घटनास्थळी गेलो होतो, जिल्हा प्रशासनाकडून दोन दिवसात आर्थिक मदत करणार आहे. शेतकऱ्यांना हात जोडून विनंती आहे आत्महत्या करू नये. 28 फेब्रुवारीला पालकमंत्री यांनी बैठक घेतली होती, बैठकीत अतिरिक्त ऊसावर चर्चा झाली होती. त्याचबरोबर काही दिवसांपूर्वी देखील परळीत बैठक झाली असून पश्चिम महाराष्ट्रातील हार्वेस्टर आणून ऊस गाळप करण्याचा प्रयत्न करत आहोत. 31 मे पर्यंत ऊसाचं एकही टिपरू शिल्लक राहू नये, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तर 5 लाख मेट्रिक टन ऊस शिल्लक राहू शकतो, अशी शक्यता देखील शर्मा यांनी यावेळी व्यक्त केली. दरम्यान, बीड जिल्ह्यात 85 हजार हेक्टरवर उसाची लागवड झाली आहे. त्याचे उत्पादन 55 लाख टन होईल.1 मे पर्यंत 40 लाख टन ऊस गाळप झाला आहे. तर, प्रत्येक दिवसाला 27 हजार 650 मेट्रिक टन ऊस गाळप होत आहे. त्यामुळं आमचे प्रयत्न सर्व ऊस गाळप करण्याचे आहेत. मात्र 5 लाख मेट्रिक टन ऊस शिल्लक राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे देखील यावेळी जिल्हाधिकारी राधाबीनोद शर्मा यांनी म्हटले आहे.




