Home पुणे संतुरचे सूर हरपले!

संतुरचे सूर हरपले!

261

विश्वविख्यात संतूर वादक पंडित शिवकुमार शर्मा यांचे बुधवार दिनांक १० मे रोजी हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने वयाच्या ८४ व्या वर्षी निधन झाले. पंडित शिवकुमार शर्मा यांच्या निधनाने संगीत रसिकांना मोठा धक्का बसला आहे. १३ जानेवारी १९३८ रोजी जम्मू येथे जन्मलेले पंडित शिवकुमार शर्मा यांनी वयाच्या पाचव्या वर्षापासूनच संगीत कलेचे शिक्षण घेतले. त्यांच्या आई उमादेवी यांची अशी इच्छा होती की शिवकुमार यांनी भारतीय शास्त्रीय संगीत संतुरवर वाजवणारे पहिले वादक बनावे. आईच्या इच्छेनुसार त्यांनी वयाच्या १३ व्या वर्षी संतूर वादनाचे धडे गिरवायला सुरवात केली. पंडित शिवकुमार शर्मा यांनी संतूर वादनाची साधना करून त्यावर प्रभुत्व मिळवले आणि आईची इच्छा पूर्ण केली. १९५५ साली त्यांनी संतूर वादनाचा पहिला जाहीर कार्यक्रम मुंबई येथे केला. पहिल्याच कार्यक्रमात त्यांच्या संतूर वादनाने रसिक मोहित झाले. त्यानंतर त्यांनी संतूर वादनाचे अनेक जाहीर कार्यक्रम केले.

संतुरला लोकप्रिय करण्याचे श्रेय त्यांनाच जाते. आता तर संतूर वादक म्हटले की एकच नाव डोळ्यासमोर येते ते म्हणजे पंडित शिवकुमार शर्मा. पंडित शिवकुमार शर्मा यांनी १९५५ साली त्यांनी चित्रपती व्ही शांताराम यांच्या झनक झनक पायल बाजे या गाण्याला संगीत दिले. १९६० साली त्यांनी स्वतःचा एकल गीतसंच प्रसिद्ध केला. १९८० सालापासून त्यांनी सुप्रसिद्ध बासरी वादक पंडित हरिप्रसाद चौरसिया यांच्या साथीने शिवहरी या नावाने सिलसिला, फासले, लम्हे, चांदणी, डर या चित्रपटांना संगीत दिले. त्यांनी संगीत दिलेले हे चित्रपट तुफान हिट ठरले. या चित्रपटातील सर्वच गाणी हिट झाली. संगीतकार शिवहरी ही जोडी हिंदी चित्रपट सृष्टित लोकप्रिय ठरली. आजही या चित्रपटातील गाणी रसिकांच्या ओठावर आहेत. चित्रपटाला संगीत देताना त्यांनी संतूर वादनाची साधना चालूच ठेवली. संतूर आणि शिवकुमार शर्मा हे समीकरणच बनले. पंडित शिवकुमार शर्मा यांच्यामुळेच संतुरला अभिजात संगीताच्या व्यासपीठावर सतार, सरोद आणि सारंगीच्या तोलामोलाचे स्थान मिळाले. त्यांनी संतूर वादनाची केलेली साधना आणि संगीत कलेतील त्यांचे योगदान यामुळे त्यांना पद्मविभूषणसह अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले. केवळ भारतातीलच नव्हे तर विदेशातील अनेक पुरस्कार त्यांना मिळाले.

१९८६ मध्ये संगीत अकादमीच्या पुरस्कारासोबतच १९९१ मध्ये पद्मश्री आणि २००१ मध्ये पद्मविभूषण या मानाच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. १९८५ मध्ये पंडित शिवकुमार शर्मा यांना अमेरिकेतील बाल्टिमोरचे मानद नागरिकत्वही प्रदान करण्यात आले. त्यांच्या निधनाने संगीत कलेचे मोठे नुकसान झाले आहे. संतूर तर अबोल झाली आहे. त्यांच्या निधनाने संतुरचे सूर हरपले असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. पंडित शिवकुमार शर्मा हे वादक म्हणून जितके श्रेष्ठ होते तितकेच ते व्यक्ती म्हणूनही श्रेष्ठ होते. त्यांचा स्वभाव मनमिळावू होता. नव्या पिढीलाही संतूर वादनाची कला आत्मसात व्हावी यासाठी त्यांनी अनेक शिष्य निर्माण केले. संतूर सम्राट पद्मविभूषण पंडित शिवकुमार शर्मा यांना भावपूर्ण श्रद्धांजली!

✒️श्याम ठाणेदार(दौंड जिल्हा,पुणे)मो:-९९२२५४६२९५

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here