



✒️आष्टी प्रतिनिधी(सौ.सरस्वती लाड)
आष्टी(दि.10मे):-महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरण, मुंबई तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण बीड यांचे निर्देशान्ववे, तालुका विधी सेवा समिती आष्टी, वकील संघ आष्टी, यांच्या संयुक्त विद्यमानाने दि. ७ मे २०२२ रोजी दिवाणी व फौजदारी न्यायालय आष्टीचे प्रांगणात राष्ट्रीय लोक अदालत सपन्न झाले.या लोकअदालतीमध्ये प्रलंबित दिवाणी व फौजदारी स्वरूपाचे २४०३ प्रकरणे तसेच १४५७ दाखलपुर्व प्रकरणे ठेवण्यात आलेली होती. त्यापैकी प्रलंबित १३३ दिवाणी आणि ४५ फौजदारी तसेच ३७ दाखलपुर्व प्रकरणे असे एकूण २१५ प्रकरणे निकाली निघाले.
या लोकअदालत मध्ये प्रलंबित व दाखलपुर्व प्रकरणात रूपये ८६ लाख ५० हजार ६६३ रुपये वसूल झांले. या लोकअदालतीमध्ये चार पॅनल करण्यात आले होते. पॅनल प्रमुख म्हणून मा. के. के. माने, अध्यक्ष, तालुका विधी सेवा समिती आष्टी तथा दिवाणी न्यायाधीश क. स्तर आष्टी, मा. व्ही. एन. शिंपी, सह दिवाणी न्यायाधीश, आष्टी मा. कादरी सय्यद जमीर अहेमद, ६ वे सह दिवाणी न्यायाधीश क. स्तर, बीड, मा. सरवरी कादरी अहेमद, ९ वे सह दिवाणी न्यायाधीश क. स्तर, बीड यांनी काम पाहिले.
सदर राष्ट्रीय लोक अदालत मध्ये प्रलंबित दिवाणी दावे, दाखल पूर्व प्रकरणे , बँक कर्ज प्रकरणे, धनादेशाचे प्रकरणे, ग्रामपंचायतची थकबाकी प्रकरणे, घरगुती कौटुंबिक वाद, पोटगी प्रकरणे आणि तडजोड पात्र फौजदारी प्रकरणे सामोपचाराने आपसात तडजोडीने निकाली निघाले. विशेष करून धनादेशाची ३५ प्रकरणे निकाली निघाली.ही लोकअदालत यशस्वी होणेसाठी न्यायाधीश, वकील संघाचे पदाधिकारी संदस्य तसेच ग्रामसेवक, बॅक अधिकारी, पोलीस प्रशासन आणि न्यायालयातील सर्व कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.





