




✒️पंकज रामटेके(घुग्घुस प्रतिनिधी)
🔸भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांचा विद्युत वितरण कंपनीला निवेदनातून इशारा..
🔹येत्या पंधरा दिवसांत समस्या निकाली काढण्याचे अधिक्षक अभियंत्यांचे आश्वासन
चंद्रपूर(दि.9मे):-गेल्या महिन्या भरापासून घुग्घुस शहरात सातत्याने सुरू असलेला विजेचा लपंडाव तातडीचे थांबवून स्थानिकांना होणारा त्रास कमी करावा. अशी मागणी भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी आज अधिक्षक अभियंता श्रीमती संध्या चिवंडे यांना भेटून दिलेल्या निवेदनात केली आहे.
महिन्या भरापासून घुग्घुस शहरात सातत्याने विजेचा लपंडाव सुरू आहे. ऐण उन्हाळ्यातच वारंवार शहराची बत्ती गुल होत असल्याने नागरिकांची लाही लाही होत आहे.घुग्घुस हे औद्योगिक शहर असल्याने येथे वेकोलीसह अनेक मोठ्या कंपन्या आहेत. आणि विजेच्या अशा लपंडावाने त्यांनाही याचा फटका बसत आहे. शहरात पाऊस सदृश स्थिती किंवा कोणतेही वादळ, वावटळ नसतांना सुद्धा केव्हाही विज खंडित होत असल्याने नागरिक संतप्त झाले आहे.त्यामुळे या समस्येला गांभीर्याने घेऊन तातडीने शहराचा वीज पुरवठा सुरळीत करावा अन्यथा स्थानिक विज वितरण केंद्रावर आंदोलन छेडण्यात येईल. असा इशारा बैठकीदरम्यान भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी एमएसईबी प्रशासनाला दिला.
यावेळी बोलताना, घुग्घुसच्या या गंभीर समस्येच्या सोडवणूकीसाठी आम्ही सातत्याने पाठपुरावा करीत आहोत. तसेच या संदर्भातील तांत्रिक कामे जवळपास पूर्ण होण्याच्या प्रक्रियेत आहेत. आणि येत्या पंधरा दिवसांत आम्ही ही समस्या निकाली काढू असे आश्वासन अधीक्षक अभियंता श्रीमती संध्या चिवंडे यांनी दिले.




