Home महाराष्ट्र शेतकरी पीक कर्जावर क्रांतिकारी निर्णयकर्ते!*

शेतकरी पीक कर्जावर क्रांतिकारी निर्णयकर्ते!*

243

[सुधाकरराव नाईक स्मृतिदिन व महाराष्ट्र जलसंधारण दिन विशेष]

जनतेचे लोकप्रिय दिवंगत नेते सुधाकरराव नाईक साहेबांच्या प्रेरणादायी कामगिरीच्या स्मरणार्थ तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी १० मे हा दिवस जलसंधारणाचे जनक सुधाकरराव नाईक यांचा स्मृतीदिवस- जलसंधारण दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासून महाराष्ट्र राज्यात सर्वत्र जलसंधारण दिन म्हणून साजरा केला जातो. पुढील ज्ञानवर्धक माहिती श्री. एन. के. कुमार गुरूजींच्या शब्दात वाचा… संपादक.

पदुष्काळावर मात करण्यासाठी आणि अधिकाधिक कृषी क्षेत्र नियोजनबद्ध सिंचनाखाली आणण्यासाठी क्रांतिकारी व दूरगामी स्वरूपाची धोरणे माजी मुख्यमंत्री व प्रख्यात जलतज्ज्ञ सुधाकरराव नाईक यांनी आखले. आपले संपूर्ण आयुष्य जलसंधारणासाठी वेचणारे ‘पाणीदार माणूस’ म्हणून ही सुधाकरराव नाईक यांची ओळख आहे. पाण्याचे योग्य नियोजन व संवर्धन न झाल्यास महाराष्ट्राचे वाळवंट होईल. हा संभाव्य धोका लक्षात घेऊन शास्त्रीय पद्धतीने पाण्याचे संवर्धन करण्यासाठी सुधाकरराव नाईक यांनी जलसंधारणाची चळवळ सुरू केली. जनतेचे लोकप्रिय दिवंगत नेते सुधाकरराव नाईक साहेबांच्या प्रेरणादायी कामगिरीच्या स्मरणार्थ तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी १० मे हा दिवस जलसंधारणाचे जनक सुधाकरराव नाईक यांचा स्मृतीदिवस- जलसंधारण दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासून राज्यात सर्वत्र जलसंधारण दिन म्हणून साजरा केला जातो.

सुधाकरराव राजुसिंग नाईक यांचा जन्म महाराष्ट्रातील यवतमाळ येथे दि.२१ ऑगस्ट १९३४ रोजी झाला. ते मराठी भारतीय राजकारणी होते. दि.२५ जून १९९१ ते २२ फेब्रुवारी १९९३ या कालखंडात ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री हरितक्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांचे ते पुतणे असून हिमाचल प्रदेशचे ते राज्यपाल सुद्धा होते. जलक्रांतीचे जनक म्हणून सुधाकरराव नाईक ओळखले जातात. सरपंच, पं.स.सभापती, जिल्हा परिषद अध्यक्ष, राज्यमंत्री, कॅबिनेट मंत्री, मुख्यमंत्री आणि राज्यपाल असा त्यांचा राजकीय प्रवास झाला. असे राज्यव्यवस्थेत क्रमश: पहिल्या ते सर्वोच्च स्थानावर विराजमान होणारे ते एकमेव नेते होत. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाला राज्यमंत्री पदाचा दर्जा देण्याचा तसेच शेतकऱ्यांना पिक कर्जाच्या दहा टक्के व्याजदर रकमेवरून सहा टक्के व्याजदर करण्याचा क्रांतिकारी निर्णय सुधाकरराव नाईक सरकारने घेतला. अमरावती विद्यापीठ व रामटेक येथील संस्कृत विद्यापीठाची स्थापना देखील त्यांच्या कारकिर्दीत झाली. देशात पहिल्यांदाच जलसंधारण खात्याची स्वतंत्र निर्मिती करून त्यांनी जलक्रांतीचे बीजे रुजवली. महिला आणि बालकल्याण विभागाची निर्मिती देखील सुधाकरराव नाईक सरकारच्या कारकिर्दीत झाली. मुलींचे शिक्षणाचे प्रमाण वाढीसाठी सुधाकरराव नाईक यांनी मुलींचे शैक्षणिक शुल्क माफीचे तसेच उपस्थिती भत्ता सारखी कल्याणकारी योजना सुरू केली.

पाणी अडवा, पाणी जिरवा या मूलमंत्राचा संदेश देत सुधाकररावांनी महाराष्ट्र सुजलाम सुफलाम तर केलाच, पण त्याचबरोबर राज्यात मोठी जलक्रांती घडवून आणली. दुष्काळ आणि पाणी टंचाईने होरपळणाऱ्या महाराष्ट्राला समृद्ध करण्यासाठी त्यांनी राज्यात जलक्रांतीची बिजे रोवली. स्वतंत्र जलसंधारणाच्या कामांत गती देत राज्याला जलसमृद्ध केले. पाणलोट क्षेत्रात विकास हे नवे सूत्र नाईकांनी प्रभावीपणे वापरले. त्यातूनच जलसंधारण हे खाते निर्माण केले. त्यामुळे वसंत बंधारे व पाझर तलाव, नाला बल्डींग निर्मितीस चालना मिळाली. याबरोबरच महाराष्ट्रात विनाअनुदानीत तत्त्वावर अभियांत्रिकी महाविद्यालय उघडण्याचा निर्णय त्यांनी घेतला. पाहता पाहता महाराष्ट्रात तंत्रशिक्षणाची क्रांती घडून आली. जोपर्यंत मुलगी शिकणार नाही तोपर्यंत समाजाची प्रगती होणार नाही, हे ते जाणून होते. म्हणून त्यांनी मुलींचे शिक्षणशुल्क माफ करण्याचे ठरविले. महिला आणि बाल सुरक्षेचा प्रश्न पाहता त्यांनी स्वतंत्र महिला व बालकल्याण या विभागाची स्थापना केली. जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्य मंत्रीपदाचा दर्जा दिला. त्यामुळे त्यांची संपूर्ण देशभरात प्रशंसा झाली. जलसंधारणाच्या बाबतीत ते अतिशय आग्रही व तज्ञ होते. त्यामुळे त्यांनी पहिल्यांदा स्वतंत्र जलसंधारण खात्याची निर्मिती देखील केली. पाण्यासाठी वेळीच उपाययोजना जर केल्या नाही तर या महाराष्ट्राचे वाळवंट व्हायला वेळ लागणार नाही, असे ते म्हणत. त्यांना जल क्रांतीचे जनक मानले जाते. जागतिक किर्तीचे जलतज्ञ म्हणून ओळखले जाणारे जलनायक सुधाकरराव नाईक यांनी देशात पहिल्यांदाच जलसंधारण‌ चळवळीचा पाया रचला. जलसंधारण परिषदेचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले होते.

जलनायक सुधाकरराव नाईक यांची शाश्वत जलनीती ही सन १९९२च्या कालखंडात देशभर नावारूपाला आली. हिमाचल प्रदेशाच्या राज्यपाल पदाचा राजीनामा देत त्यांनी जलसंधारणाची चळवळ अतिशय सक्षम करून जलसाक्षरतेसाठी पुढाकार घेतला. जलसंधारण अभियानाच्या कोकण दौऱ्यावर असतांना त्यांची उष्माघातामुळे प्रकृती गंभीर झाली. पुढे दुर्दैवाने त्यांची प्रकृती सावरू शकली नाही आणि दि.१० मे २००१ रोजी त्यांचे प्राणपाखरू भुर्रर उडून गेले. जलसंधारण क्षेत्रातील ऐतिहासिक कार्याच्या स्मरणार्थ १० मे हा त्यांचा स्मृतीदिवस महाराष्ट्रात कायम जलसंधारण दिन म्हणून पाळला जाऊ लागला.

!! पुरोगामी संदेश परिवारातर्फे स्मृतीदिनी या पाणीदार माणसाला मानाचा सॅल्युट व जलसंधारण दिनाच्या सर्वांना प्रेरणादायी हार्दिक शुभेच्छा !!

✒️श्री एन. के. कुमार गुरूजी (नि. शिक्षक)[मराठी कवी व लेखक]मु. गडचिरोली, जि. गडचिरोली.फक्त व्हा. नं. ७४१४९८३३३९.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here