



✒️वेंगुर्ला(पुरोगामी न्युज नेटवर्क)
वेंगुर्ला(दि.8मे):- म्युनिसिपल कामगार युनियनच्या वतीने मुख्यमंत्री नामदार उद्धवजी ठाकरे यांना निवेदन देण्यात आले आहे, महाराष्ट्र राज्यातील सर्वात जुनी नगरपरिषद म्हणून नावलौकिक मिळविलेल्या वेंगुर्ला नगरपरिषदेमधील काही अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे वारंवार कंत्राटी कामगारांना कामावरून काढून टाकण्याचे काम चालू असल्याचे आणि वेंगुर्ला नगरपरिषदेच्या कंत्राटी कामगारांना देण्यात येणाऱ्या वागणुकीबद्दल संघटनेच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री यांना कळविण्यात आलेले होते, त्यांच्या कार्याल्यातून मुख्याधिकारी यांना पत्र मिळाल्या नंतर योग्य कारवाई न होता कामगारांना नाहक त्रास दिल्या जात आहे, सदर ठिकाणी कार्यरत अधिकारीवर्गात मानसिक बदल झालेला नाही.
वेंगुर्ला नगरपरिषद मधील अधिकारीवर्गाला जागृत झालेला कंत्राटी कामगार नको असल्याने प्रशासनाने घंटागाडीवर कामगारांची आवश्यकता असताना,कंत्राट वाढविण्याची प्रक्रिया तातडीने पूर्ण केलेली नाही. त्यामुळे ६० कंत्राटी कामगारांवर उपासमारीची वेळ आलेली आहे.उपासमारीची वेळ आलेल्या वेंगुर्ला नगरपरिषद मधील सर्व कंत्राटी कामगारांनी “दोनशे चाळीस दिवसांपेक्षा अधिक काळ कोणत्याही ब्रेक शिवाय प्रत्येक्ष काम केलेले आहे. (वैद्यकीय रजा सोडून) तसेच ‘औद्योगिक विवाद अधिनियम,१९४७’ मधील काही तरतुदी ह्या कामगारांना लागू होत असल्याने, कामबंदी व कामगार कपात करतांना ३ महिने अगोदर तशी माहिती त्या कामगारांना देणे आवश्यक होते परंतु तशी माहिती कंत्राटी कामगारांना देण्यात आलेली नाही.
दि.०२.०५.२०२२ रोजी सकाळी कंत्राटी कामगार कामावर उपस्थित झाल्यावर कंत्राटदाराने कंत्राट समाप्त झाल्याची माहिती त्यांना देली. कंत्राट समाप्त झाल्याची माहिती मिळताच सर्व कंत्राटी कामगार कंत्राटदाराने केलेल्या सुचनेनुसार कार्यालयीन प्रमुख आणि स्वच्छता निरीक्षक यांची भेट घेतली परंतु त्यांनी त्या कामगारांना साफसफाईच्या कंत्राटाला शासनाची मंजुरी मिळत नाही तोपर्यंत दरदिवशी फुकट काम करावे असे सांगितले.अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार कंत्राटी कामगारांनी त्या गोष्टीला संमती दिली. सोबत कंत्राटी कामगारांनी प्रशासनाकडे विनंती केली की, साफसफाई चे काम करत असताना कोणत्याही प्रकारची दुर्घटना त्यांच्या सोबत घडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी वेंगुर्ला नगरपरिषद घेईल असे लेखी किंवा तोंडी सांगावे परंतु ही मागणी मान्य करण्यास संबंधित अधिकाऱ्यांनी नकार दिला.
कर्मचारी कोणत्याही प्रकारची मागणी न करता कामावर हजर होण्यास तयार नसल्याचे दिसून येता नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांनी दमदाटी करून त्यांना कामावर उपस्थित होण्यास सांगत आहेत.
सध्या जी काही दमदाटी कामगारांच्या सोबत घडत आहे त्याची माहिती वेंगुर्ला नगरपरिषदेच्या मा.मुख्याधिकार्यांना नसल्याचे संघटनेला कामगारांकडून समजले आहे. कंत्राटी कामगार मा. मुख्याधिकार्यांना भेटण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु काही अधिकारी कामगारांना त्यांच्यापर्यंत सद्यपरिस्थिती सांगू देत नाहीत.
कंत्राटी कामगारांवर पुर्ण कुटुंबांची जबाबदारी असल्यामुळे त्यांना मिळणाऱ्या मासिक वेतनावर संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह आणि मुलांचे शिक्षण चालत असल्यामुळे वेंगुर्ला नगरपरिषद मधील सर्व कंत्राटी कामगारांना पुन्हा कामावर हजर करून घेण्यात यावे.अशी कामगारांनी आणि विविध पक्षांच्या नेत्यांनी मांगनी केली असता त्यांची दखल घेतली जात नाही.म्हणूनच हे पत्र पुन्हा माननीय मुख्यमंत्री यांना इमेल द्वारे देण्यात आले आहे.उपरोक्त बाबींचा सहानुभूतीने विचार करावा आणि वेंगुर्ला नगरपरिषद मधील कंत्राटी कामगारांवर उपासमारीची वेळ येणार नाही याची काळजी महाराष्ट्र शासनाकडून घेण्यात यावी.असे निवेदन मा. ना.हसन मुश्रीफ कामगार मंत्री, मा.ना.एकनाथ शिंदे नगरविकासमंत्री यांना ही देण्यात आले आहे.


